शास्ते 4
4
दबोरा आणि बाराक सीसराचा पराभव करतात
1एहूद मृत्यू पावल्यावर इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले.
2तेव्हा परमेश्वराने याबीन नावाचा कनानाचा राजा जो हासोरात राज्य करत होता त्याच्या हाती त्यांना दिले; त्याचा सेनापती सीसरा हा हरोशेथ-गोयीम येथे राहत असे.
3त्याच्याकडे नऊशे लोखंडी रथ असून त्याने वीस वर्षे इस्राएल लोकांचा अनन्वित छळ केला, म्हणून त्यांनी परमेश्वराचा धावा केला.
4त्या वेळेस लप्पिदोथाची बायको दबोरा संदेष्ट्री ही इस्राएलाचा न्यायनिवाडा करत असे.
5एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामा व बेथेल ह्यांच्या दरम्यान दबोरेच्या खजुरीखाली तिची बैठक असे; इस्राएल लोक तिच्याकडे न्यायनिवाड्यासाठी येत असत.
6तिने अबीनवामाचा मुलगा बाराक ह्याला केदेश-नफताली येथून बोलावून आणले व त्याला विचारले, “तू नफताली व जबुलून ह्यांच्यातले दहा हजार पुरुष बरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे कूच करून जा अशी आज्ञा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने तुला केली आहे ना?
7तो म्हणतो, याबीनाचा सेनापती सीसरा आपले रथ व आपले सर्व लष्कर घेऊन तुझ्याकडे कीशोन नदीपर्यंत येईल असे मी करीन, आणि त्याला तुझ्या हाती देईन.”
8बाराक तिला म्हणाला, “तू माझ्याबरोबर येशील तरच मी जाईन, नाहीतर जाणार नाही.”
9ती म्हणाली, “मी तुझ्याबरोबर अवश्य येईन, पण ह्या तुझ्या स्वारीत तुझी प्रतिष्ठा होणार नाही, कारण परमेश्वर सीसरा ह्याला एका स्त्रीच्या हाती देणार आहे.” मग दबोरा उठली आणि बाराकाबरोबर केदेश येथे गेली.
10बाराकाने जबुलून व नफताली ह्यांना केदेश येथे बोलावले; मग त्याच्यामागोमाग दहा हजार पुरुष निघाले आणि दबोराही त्याच्याबरोबर गेली.
11मोशेचा सासरा1 होबाब ह्याचे वंशज जे केनी त्यांच्यापासून केनी हेबेर हा विभक्त होऊन केदेशाजवळचे साननीम येथल्या एका एला वृक्षाखाली डेरा देऊन राहिला होता.
12इकडे सीसरा ह्याला खबर लागली की, अबीनवामाचा मुलगा बाराक हा ताबोर डोंगर चढून गेला आहे,
13तेव्हा सीसरा ह्याने आपले एकंदर नऊशे लोखंडी रथ आणि हरोशेथ-गोयीम येथून आपल्याजवळचे सर्व लोक कीशोन नदीवर जमा केले.
14दबोरा बाराकाला म्हणाली, “ऊठ, आजच परमेश्वराने सीसराला तुझ्या हाती दिले आहे; परमेश्वर तुझ्यापुढे निघाला आहे ना?” मग बाराक व त्याच्या पाठोपाठ दहा हजार लोक ताबोर डोंगरावरून उतरले.
15परमेश्वराने सीसरा, त्याचे सर्व रथ व सर्व सेना ह्यांचा बाराकासमोर तलवारीने धुव्वा उडवला; तेव्हा सीसरा रथावरून उतरून पायीच पळून गेला.
16इकडे बाराकाने हरोशेथ-गोयीमापर्यंत रथांचा व सैन्याचा पाठलाग केला; आणि सीसराची सर्व सेना तलवारीने पडली; त्यातला एकही वाचला नाही.
17सीसरा मात्र केनी हेबेर ह्याची बायको याएल हिच्या डेर्याकडे पायी पळून गेला; कारण हासोराचा राजा याबीन आणि केनी हेबेराचे घराणे ह्यांचे सख्य होते.
18तेव्हा याएल सीसराला सामोरी येऊन त्याला म्हणाली, “या स्वामी, या इकडे माझ्याकडे! भिऊ नका.” तेव्हा तो तिच्याकडे डेर्यात गेला व तिने त्याला कांबळीखाली लपवले.
19तो तिला म्हणाला, “मला थोडे पाणी प्यायला दे बरे! मला तहान लागली आहे.” तेव्हा तिने दुधाची बुधली उघडून त्याला दूध प्यायला दिले व त्याला झाकले.
20तो तिला म्हणाला, “डेर्याच्या दाराशी उभी राहा आणि कोणी येऊन तुला विचारू लागला की, येथे एखादा पुरुष आहे काय? तर नाही म्हणून सांग.”
21मग हेबेराची बायको याएल हिने डेर्याची मेख आणि हातोडा हाती घेऊन, आणि पाय न वाजवता त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात ती मेख ठोकली; ती आरपार जाऊन जमिनीत रुतली. तो थकून गेल्यामुळे त्याला गाढ झोप लागली होती. अशा प्रकारे तो मेला.
22बाराक सीसराचा पाठलाग करत आला तेव्हा त्याला याएल सामोरी येऊन म्हणाली, “चला, ज्या माणसाचा तुम्ही शोध करत आहात तो मी तुम्हांला दाखवते.” तो तिच्याबरोबर आत जाऊन पाहतो तर सीसरा मरून पडला होता आणि त्याच्या कानशिलात मेख ठोकलेली होती.
23अशा प्रकारे त्या दिवशी कनानाचा राजा याबीन ह्याचा देवाने इस्राएल लोकांपुढे धुव्वा उडवला.
24इस्राएल लोकांची सत्ता कनानाचा राजा याबीन ह्याच्यावर अधिकाधिक वाढत गेली व शेवटी त्यांनी कनानाचा राजा याबीन ह्याचा नाश केला.
सध्या निवडलेले:
शास्ते 4: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.