शास्ते 2
2
बोखीम येथे परमेश्वराचा दूत
1परमेश्वराचा दूत गिलगालाहून बोखीम येथे येऊन लोकांना म्हणाला, “मी तुम्हांला मिसर देशातून काढून तुमच्या पूर्वजांना शपथेवर देऊ केलेल्या देशात आणले; तुमच्याशी केलेला माझा करार मी कधी मोडणार नाही;
2तुम्ही ह्या देशाच्या रहिवाशांशी काही करारमदार करू नका; तुम्ही त्यांच्या वेद्या मोडून टाका, असे मी तुम्हांला म्हणालो होतो; पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. तुम्ही हे काय केले? 3म्हणून मीही म्हणालो, मी त्या लोकांना तुमच्यासमोरून घालवून देणार नाही; ते तुमच्या कुशीला काट्यांसारखे होतील आणि त्यांचे देव तुम्हांला पाश होतील.”
4परमेश्वराचा दूत सगळ्या इस्राएल लोकांना हे म्हणाला तेव्हा त्यांनी मोठा आक्रोश केला.
5त्यांनी त्या स्थळाचे नाव बोखीम (आक्रोश करणारे) असे ठेवले. तेथे त्यांनी परमेश्वराला यज्ञ केले.
यहोशवाचा मृत्यू
(यहो. 24:29-31)
6यहोशवाने इस्राएल लोकांना निरोप दिला तेव्हा ते देशाचा ताबा घेण्यासाठी आपापल्या वतनावर गेले.
7यहोशवाच्या हयातीत आणि यहोशवाच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांनी परमेश्वराने इस्राएलासाठी केलेली महान कार्ये पाहिली होती त्यांच्या हयातीत लोकांनी परमेश्वराची सेवा केली.
8परमेश्वराचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा हा एकशे दहा वर्षांचा होऊन मरण पावला.
9एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील गाश डोंगराच्या उत्तरेस तिम्नाथ-हेरेस येथे त्याच्या वतनाच्या सीमेवर त्यांनी त्याला मूठमाती दिली.
10ती सर्व पिढी पूर्वजांस मिळाल्यानंतर जी नवी पिढी उदयास आली तिला परमेश्वराची आणि त्याने इस्राएलासाठी केलेल्या कार्याची ओळख राहिली नव्हती. इस्राएलांची नीतिभ्रष्टता व शास्त्यांचा अंमल
11इस्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून बआल देवांची सेवा करू लागले.
12आपल्या पूर्वजांचा देव जो परमेश्वर, ज्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्याचा त्यांनी त्याग केला व ते अन्य देवांच्या म्हणजे सभोवतालच्या राष्ट्रांतील देवांच्या नादी लागून त्यांच्या चरणी लागले आणि तेणेकरून त्यांनी परमेश्वराला चीड आणली.
13परमेश्वराचा त्याग करून त्यांनी बआल व अष्टारोथ ह्यांची सेवा केली;
14म्हणून इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला; त्याने त्यांना लुटारूंच्या हाती दिले आणि लुटारूंनी त्यांना लुटले. परमेश्वराने त्यांना त्यांच्या सभोवतालच्या शत्रूंच्या हवाली केले; म्हणून त्यांचा आपल्या शत्रूंसमोर टिकाव लागेना.
15परमेश्वराने त्यांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे जेथे जेथे ते कूच करत तेथे तेथे त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडून त्यांचे अहित होई आणि ते फार संकटात पडत.
16मग परमेश्वर शास्ते उभे करी व ते त्यांना लुटणार्यांच्या हातून सोडवत;
17तरी ते आपल्या शास्त्यांचे ऐकत नसत; ते व्यभिचारी मतीने अन्य देवांच्या नादी लागून त्यांच्या चरणी लागत. त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळून चोखाळलेला मार्ग त्यांनी लवकरच सोडून दिला आणि आपल्या पूर्वजांचे अनुकरण केले नाही.
18जेव्हा जेव्हा परमेश्वर त्यांच्यासाठी शास्ते उभे करी तेव्हा तेव्हा त्या प्रत्येकाबरोबर परमेश्वर असे आणि त्या शास्त्यांच्या हयातीत तो त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातून वाचवत असे; कारण त्यांच्यावर लोक जुलूम करत व त्यांना गांजत; ह्यामुळे ते कण्हत असत; म्हणून परमेश्वराला त्यांची कीव येई.
19तरीपण शास्ता मरण पावला म्हणजे ते पुन्हा उलटून अन्य देवांची सेवा करत व त्यांच्या चरणी लागून आपल्या वाडवडिलांपेक्षा अधिक बिघडत; ते आपला दुराचार व दुराग्रह सोडत नसत.
20तेव्हा इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकून तो म्हणाला, “मी ह्या राष्ट्राच्या पूर्वजांशी केलेला करार ह्याने मोडला आहे आणि माझी वाणी ऐकली नाही.
21म्हणून यहोशवाच्या मृत्युसमयी उरलेल्या राष्ट्रांपैकी कोणालाही मीदेखील येथून पुढे त्यांच्यासमोरून घालवून देणार नाही;
22पण त्यांच्याकरवी मी इस्राएलाची परीक्षा करीन आणि त्यांचे पूर्वज माझ्या मार्गाने चालत होते त्याप्रमाणेच ते चालतात की नाही हे पाहीन.”
23म्हणून परमेश्वराने त्या राष्ट्रांना घालवून देण्याची घाई केली नाही; त्यांना राहू दिले आणि त्यांना यहोशवाच्या हाती दिले नाही.
सध्या निवडलेले:
शास्ते 2: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.