YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 19

19
एक लेवी आणि त्याची उपपत्नी
1त्या काळी इस्राएलात कोणी राजा नव्हता; तेव्हा एक लेवी एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातल्या मध्यभागात बेथलेहेम येथे उपरा म्हणून राहत असे; त्याने यहूदातील एक उपपत्नी ठेवली होती.
2एकदा रागाच्या भरात ती त्याला सोडून यहूदातील बेथलेहेम यहूदा येथे आपल्या बापाच्या घरी गेली व तेथे चार महिने राहिली.
3नंतर तिची समजूत घालून तिला परत आणावे म्हणून तिचा नवरा, एक नोकर व दोन गाढवे बरोबर घेऊन तिच्या शोधासाठी निघाला. तिने त्याला बापाच्या घरात आणले; त्या मुलीच्या बापाने त्याला पाहिले तेव्हा त्याच्या भेटीने त्याला आनंद झाला.
4त्याच्या सासर्‍याने म्हणजे मुलीच्या बापाने त्याला राहण्याचा आग्रह केल्यामुळे तो त्याच्याकडे तीन दिवस राहिला; ह्याप्रमाणे खाऊनपिऊन त्यांनी तेथे मुक्काम केला.
5चौथ्या दिवशी पहाटेस उठल्यावर त्याने जाण्याची तयारी केली तेव्हा मुलीच्या बापाने आपल्या जावयाला म्हटले, “दोन घास खाऊन ताजेतवाने व्हा व मग निघा.”
6मग त्या दोघांनी बसून न्याहारी केली. मग मुलीचा बाप जावयाला म्हणाला, “कृपया आज खुशीने येथे राहा आणि आणखी एक रात्र मजेत घालवा.”
7जावई जाण्याच्या तयारीत होता, पण सासर्‍याच्या आग्रहामुळे त्याने मुक्काम वाढवला.
8पाचव्या दिवशी जाण्यासाठी तो पहाटेस उठला तेव्हा मुलीचा बाप त्याला म्हणाला, “न्याहारी करून ताजेतवाने व्हा आणि संध्याकाळपर्यंत थांबा.” मग ते दोघे एकत्र जेवले.
9मग जावई आपली उपपत्नी व सेवक ह्यांच्यासह जायला निघाला, तेव्हा मुलीचा बाप म्हणजे त्याचा सासरा त्याला म्हणाला, “संध्याकाळ होत चालली आहे तुम्ही कृपया रात्री येथेच राहा. दिवस सरत आला आहे; येथेच आनंदात राहा. उद्या सकाळी पहाटेस उठून मार्गस्थ व्हा व आपल्या घरी जा.”
10पण तो माणूस त्या रात्री तेथे राहीना; तो उठून मार्गस्थ झाला. तो खोगीर घातलेली आपली दोन गाढवे आणि आपली उपपत्नी ह्यांच्यासह यबूसच्या म्हणजे यरुशलेमेच्या जवळ आला.
11यबूस नगराजवळ ते आले तेव्हा दिवस बराच खाली गेला होता; म्हणून सेवकाने आपल्या धन्याला म्हटले, “चला, आपण यबूसी लोकांच्या ह्या नगरात जाऊन मुक्काम करू.”
12पण त्याचा धनी त्याला म्हणाला, “इस्राएल लोक नसलेल्या परक्यांच्या ह्या नगरात आपण उतरू नये; आपण पुढे गिबा येथे जाऊ.”
13तो आपल्या नोकराला म्हणाला, “चल, आपण जवळच्या एखाद्या ठिकाणी जाऊ; गिबा किंवा रामा येथे रात्रीचा मुक्काम करू.”
14ते पुढे चालले आणि बन्यामिनाच्या गिब्याजवळ येईपर्यंत सूर्य मावळला.
15ते गिब्यात मुक्कामासाठी गेले आणि गावातल्या रस्त्यावर बसले; कारण कोणीही त्यांना आपल्या घरात मुक्कामासाठी ठेवीना.
16इतक्यात एक म्हातारा आपले शेतातले काम आटोपून संध्याकाळचा घरी चालला होता. तो एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातला असून गिबा येथे उपरा म्हणून राहत होता. तेथील लोक बन्यामिनी होते.
17त्या म्हातार्‍याने गावातल्या रस्त्यावर नजर टाकली तेव्हा कोणी प्रवासी तेथे बसला आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. म्हातार्‍याने त्याला विचारले, “तू कोठे निघालास? तू कोठून आलास?”
18तो त्याला म्हणाला, “आम्ही यहूदाच्या बेथलेहेमाहून निघालो आहोत आणि आम्हांला एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशाच्या मध्यभागात जायचे आहे. मी तेथलाच आहे; मी बेथलेहेम-यहूदा येथे गेलो होतो व आता घरी जात आहे; मला येथे कोणीही आपल्या घरात जागा देत नाही.
19आमच्या गाढवांसाठी दाणावैरण आहे, आणि माझ्यासाठी, ह्या आपल्या दासीसाठी व ह्या आपल्या दासांबरोबरच्या नोकरासाठी भाकर व द्राक्षारस आहे. कोणत्याही गोष्टीची उणीव नाही.”
20म्हातारा म्हणाला, “तुझे कल्याण असो. तुला जे हवे ते माझ्याकडे लागले. मात्र रस्त्यात मुक्काम करू नकोस.”
21मग त्याने त्याला आपल्या घरी नेले व त्याच्या गाढवांना वैरण दिली, आणि त्यांनी हातपाय धुऊन भोजन केले.
22ते खुशीत असताना गावातल्या गुंडांनी येऊन त्या घराला गराडा घातला व दार ठोठावून त्या म्हातार्‍या घरमालकाला ते म्हणू लागले, “तुझ्या घरी आलेल्या माणसाला बाहेर काढ म्हणजे आम्ही त्याला जाणू.”
23घरधनी बाहेर जाऊन म्हणू लागला, “छे, छे! बांधवहो, मी हात जोडतो, असले दुष्कर्म करू नका; हा मनुष्य माझा पाहुणा आहे म्हणून असला निर्लज्जपणा करू नका.
24पाहा, येथे माझी मुलगी आहे, ती कुंवार आहे आणि ह्या मनुष्याची उपपत्नीपण आहे; त्यांना मी आता बाहेर आणतो; तुम्ही त्यांची अब्रू घ्या; त्यांच्याशी वाटेल ते करा, पण ह्या मनुष्याशी असले निर्लज्जपणाचे काम करू नका.”
25तरी ती माणसे त्याचे ऐकेनात. मग त्या माणसाने आपल्या उपपत्नीला धरून त्यांच्याकडे बाहेर नेऊन सोडले; त्यांनी तिच्याशी रात्रभर कुकर्म केले आणि पहाट होईपर्यंत तिचे हालहाल केले. पहाट झाल्यावर त्यांनी तिला सोडले.
26पहाटेस ती स्त्री आपला नवरा ज्या घरी होता तेथे येऊन उजाडेपर्यंत दाराशी पडून राहिली.
27सकाळी तिच्या नवर्‍याने उठून घराचे दरवाजे उघडले व मार्गस्थ व्हावे म्हणून तो बाहेर आला, तेव्हा त्याची उपपत्नी दाराशी पडलेली व तिचे हात उंबरठ्यावर असलेले त्याच्या दृष्टीस पडले.
28तो तिला म्हणाला, “ऊठ, आपण जाऊ;” पण ती काही उत्तर देईना. तेव्हा तिला गाढवावर घालून तो आपल्या गावी गेला.
29घरी आल्यावर त्याने सुरी घेऊन आपल्या उपपत्नीला धरून तिचे शरीर कापले, आणि बारा तुकडे करून इस्राएलाच्या सर्व प्रदेशांत पाठवून दिले.
30ते तुकडे घेऊन जाणार्‍या लोकांना तो म्हणाला, “तुम्ही सगळ्या इस्राएल लोकांना विचारा, इस्राएल लोक मिसरातून आल्या दिवसापासून आजपर्यंत असे कृत्य घडल्याचे तुम्ही पाहिले आहे काय? ह्यावर विचार करा आणि आपले मत सांगा.” (ते पाहणार्‍या सर्वांनी उद्‍गार काढले, “तेव्हापासून तर आतापर्यंत असले कृत्य घडल्याचे कोणी पाहिले नाही.”)

सध्या निवडलेले:

शास्ते 19: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन