YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 10

10
तोला व याईर हे इस्राएल लोकांचे शास्ते
1अबीमलेखानंतर इस्राएलाचे संरक्षण करायला इस्साखार वंशातील तोला बिन पुवा बिन दोदो हा पुढे आला. तो एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात शामीर येथे राहत असे.
2त्याने तेवीस वर्षे इस्राएलाचा न्यायनिवाडा केला; नंतर तो मृत्यू पावला; त्याला शामीर येथे मूठमाती देण्यात आली.
3त्याच्यानंतर याईर गिलादी हा पुढे आला; त्याने बावीस वर्षे इस्राएलाचा न्यायनिवाडा केला.
4त्याला तीस मुलगे होते, ते तीस गाढवांवर स्वारी करत; गिलाद प्रांतात त्यांची तीस नगरे असून त्यांना आजपर्यंत हव्वोथ-याईर म्हणतात.
5याईर मरण पावला व त्याला कामोन येथे मूठमाती देण्यात आली. अम्मोन्यांच्या हातून इस्राएल लोकांचा छळ 6मग इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले; बआलीम व अष्टारोथ ह्या दैवतांची आणि अराम, सीदोन, मवाब, अम्मोनी व पलिष्टी ह्या सर्वांच्या दैवतांची ते सेवा करू लागले; त्यांनी परमेश्वराचा त्याग केला; त्याची सेवा ते करीनात, 7म्हणून परमेश्वराचा कोप इस्राएलावर भडकला आणि त्याने त्यांना पलिष्ट्यांच्या व अम्मोन्यांच्या हाती दिले.
8यार्देनेच्या पलीकडे अमोर्‍यांच्या देशातील गिलाद प्रांतात राहणार्‍या सर्व इस्राएल लोकांना त्यांनी तेव्हापासून अठरा वर्षे हैराण करून त्यांच्यावर जुलूम केला.
9अम्मोनी लोक यार्देन ओलांडून यहूदा, बन्यामीन व एफ्राइमाचे घराणे ह्यांच्यावर स्वार्‍या करत. ह्यामुळे इस्राएल लोक फार बेजार झाले होते.
10मग इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा करून म्हटले, “आम्ही आमच्या देवाचा त्याग केला आणि बआलदैवतांची सेवा करून आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे.”
11तेव्हा परमेश्वर इस्राएल लोकांना म्हणाला, “मी तुम्हांला मिसरी, अमोरी, अम्मोनी व पलिष्टी ह्यांच्या तावडीतून सोडवले;
12तसेच सीदोनी, अमालेकी व मिद्यानी ह्यांनी तुम्हांला हैराण केले तेव्हा तुम्ही माझा धावा केला आणि मी तुम्हांला त्यांच्या हातून सोडवले, नाही का?
13तरी तुम्ही मला सोडले आणि अन्य देवांची सेवा केली म्हणून ह्यापुढे मी तुमची मुक्तता करणार नाही.
14जा, तुम्ही मानलेल्या दैवतांचा धावा करा. तुमच्या विपत्काली त्यांनी तुम्हांला सोडवावे.”
15तेव्हा इस्राएल लोक परमेश्वराला म्हणाले, “आम्ही पाप केले आहे; तुला बरे दिसेल तसे कर, मात्र आज आमचा बचाव कर, एवढीच आमची विनवणी आहे.”
16मग ते आपल्यातील परके देव टाकून देऊन परमेश्वराची सेवा करू लागले. इस्राएलांचे हाल पाहून त्याच्या मनाला खेद झाला.
17मग अम्मोनी लोकांनी एकत्र जमून गिलाद येथे तळ दिला, तसेच इस्राएल लोकांनी गोळा होऊन मिस्पा येथे तळ दिला.
18गिलादाचे सरदार एकमेकांना विचारू लागले, “अम्मोनी लोकांशी सामना सुरू करायला कोणता मर्द तयार आहे? तोच गिलाद येथील सर्व रहिवाशांचा नेता होईल.”

सध्या निवडलेले:

शास्ते 10: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन