YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 8:1-15

यशया 8:1-15 MARVBSI

परमेश्वराने मला म्हटले, “एक मोठी पाटी घेऊन तिच्यावर व्यावहारिक लिपीत असे लिही, महेर-शालाल-हाश-बज (लूट त्वरा करते, पारध घाई करते) ह्याविषयी.” उरीया याजक व यबरेख्याचा पुत्र जखर्‍या हे विश्वासू साक्षी ह्यांना मी साक्षीला ठेवतो.” मग मी संदेष्ट्रीशी समागम केला; ती गर्भवती होऊन तिला पुत्र झाला; तेव्हा परमेश्वराने मला म्हटले की, “त्याचे नाव महेर-शालाल-हाश-बज असे ठेव. कारण ह्या मुलाला आई, बाबा, म्हणता येण्यापूर्वीच अश्शूरच्या राजापुढे दिमिष्काचे धन व शोमरोनाची लूट म्हणून घेऊन जातील.” परमेश्वराने मला पुन्हा म्हटले, “हे लोक संथपणाने वाहणारे शिलोहाचे पाणी धिक्कारतात आणि रसीन व रमाल्याचा पुत्र ह्यांच्या सहवासात आनंद पावतात; ह्यास्तव प्रभू त्यांच्यावर फरात नदाच्या जलाचा प्रबल व विपुल ओघ म्हणजे अश्शूरचा राजा ह्याचा सर्व दळभार आणील; तो आपली सर्व पात्रे व तीर भरून वाहील; त्याचा पूर यहूदावर येईल; त्यांना बुडवून तो पुढे वाहील; त्याचे पाणी लोकांच्या गळ्यापर्यंत येईल; हे इम्मानुएला, तो आपले पंख पसरून तुझी सर्व भूमी व्यापून टाकील.” अहो राष्ट्रांनो, दंगल करा, पण तुमचा चुराडा होईल; पृथ्वीवरील दूरच्या देशांनो, कान देऊन ऐका; तुम्ही आपली कंबर बांधा, पण तुमचा चुराडा होईल. मसलत करा, पण ती निष्फळ होईल; विचार प्रकट करा, पण तो टिकणार नाही; कारण आमच्यासन्निध देव आहे.1 परमेश्वराने मला आपल्या हाताने बळकट धरून असे बजावून सांगितले होते की, “ह्या लोकांच्या मार्गाने जाऊ नकोस.” तो म्हणाला : “हे लोक ज्याला बंड म्हणतात त्या सर्वांना बंड बंड म्हणू नका; ज्याला ते भितात त्याला भिऊ नका, घाबरू नका. तर सेनाधीश परमेश्वरालाच पवित्र माना; त्याचेच भय व धाक धरा. म्हणजे तो तुम्हांला पवित्रस्थान होईल; तथापि इस्राएलाच्या उभय घराण्यांत तो ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक आणि यरुशलेमेच्या रहिवाशांना पाश व सापळा असा होईल. त्यांपैकी बहुत लोक ठेचा खातील, पडतील व आपटून छिन्नभिन्न होतील, पाशांत अडकून धरले जातील.”