YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 7

7
आहाजाला यशयाचा पहिला संदेश
1यहूदाचा राजा आहाज बिन योथाम बिन उज्जीया ह्याच्या दिवसांत असे झाले की अरामाचा राजा रसीन व इस्राएलाचा राजा पेकह बिन रमाल्या हे यरुशलेमेबरोबर लढण्यास चढाई करून गेले, परंतु त्यांची त्यावर काही सरशी झाली नाही.
2‘अरामाची एफ्राइमाशी जूट झाली आहे’ असे दाविदाच्या घराण्याला कळवण्यात आले तेव्हा रानातील वृक्ष वार्‍याने कापतात तसे त्याचे मन व त्याच्या लोकांची मने कंपित झाली.
3तेव्हा परमेश्वर यशयाला म्हणाला, “तू आपला पुत्र शआर-याशूब (अवशेष परत येईल) ह्याला बरोबर घेऊन वरच्या तळ्याचा नळ जेथे संपतो तेथे परटाच्या शेताच्या वाटेवर आहाजाला भेटायला जा;
4आणि त्याला सांग की, ‘सावध हो व शांत राहा; भिऊ नकोस; ह्या दोन कोलितांच्या उरलेल्या धुमसणार्‍या शेपटांमुळे म्हणजे क्रोधाने भडकलेले अरामी रसीन व रमाल्याचा पुत्र ह्यांच्यामुळे तुझे मन खचू देऊ नकोस.
5अराम, एफ्राईम व रमाल्याचा पुत्र ह्यांनी तुझ्याविरुद्ध दुष्ट संकल्प केला आहे की,
6आपण यहूदावर चालून जाऊन त्यांना धाक घालू, तटबंदी फोडून तो घेऊ आणि ताबेलाच्या पुत्राची त्यामध्ये राजा म्हणून स्थापना करू.
7प्रभू परमेश्वर म्हणतो : हे सफळ व्हायचे नाही, हे घडायचे नाही.
8अरामाचे शीर दिमिष्क व दिमिष्काचे शीर रसीन. (पासष्ट वर्षे झाली नाहीत तोच एफ्राईम भंग पावेल व त्याचे राष्ट्रत्व राहणार नाही.)
9एफ्राइमाचे शीर शोमरोन व शोमरोनाचे शीर रमाल्याचा पुत्र. तुम्ही भाव ठेवणार नाही तर तुमचा निभाव लागणार नाही.”’
इम्मानुएलसंबंधी यशयाचा संदेश
10परमेश्वर आहाजास आणखी म्हणाला :
11“तुझा देव परमेश्वर ह्याच्याकडे तू आपणासाठी चिन्ह माग; ते खाली अधोलोकात असो किंवा वर उर्ध्वलोकात असो.”
12आहाज म्हणाला, “मी मागणार नाही, मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही.”
13तेव्हा तो म्हणाला, “हे दाविदाच्या घराण्या, मी सांगतो ते ऐक : तुम्ही मनुष्याला कंटाळा आणता हे थोडे झाले म्हणून माझ्या देवालाही कंटाळवता काय?
14ह्यास्तव प्रभू स्वत: तुम्हांला चिन्ह देत आहे; पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल (आमच्यासन्निध देव) असे ठेवील.
15वाईट टाकावे व चांगले घ्यावे हे त्याला समजू लागले म्हणजे तो लोणी व मध सेवन करील.
16कारण वाईट टाकावे व चांगले घ्यावे हे त्या मुलाला समजू लागण्यापूर्वी ज्या दोन राजांच्या भीतीने तू घाबरला आहेस त्यांचा देश उजाड होईल.
17एफ्राईम यहूदापासून वेगळा झाला तेव्हापासून आले नाहीत असे दिवस परमेश्वर तुला, तुझ्या लोकांना व तुझ्या बापाच्या घराण्याला आणील; म्हणजे अश्शूरच्या राजाला तुझ्यावर आणील.”
18त्या दिवशी असे होईल की मिसरी नदीच्या फाट्यांच्या शेवटांस असलेल्या माशा व अश्शूर देशात असलेल्या मधमाशा ह्यांना परमेश्वर शीळ घालून बोलावील.
19त्या सगळ्या येऊन खडकाळ खोर्‍यांत, खडकांच्या कपारींत, सगळ्या काटेरी झुडपांत व सर्व कुरणांत उतरतील.
20त्या नदीपलीकडल्या देशातील भाड्याच्या वस्तर्‍याने, म्हणजे अश्शूरच्या राजाच्या योगाने, प्रभू डोक्याचे व पायांचे केस मुंडील; तो वस्तरा दाढीही काढून टाकील.
21त्या दिवशी असे होईल की एकेक मनुष्य एकेक कालवड व दोन-दोन मेंढ्या पाळील;
22त्या पुष्कळ दूध देतील म्हणून तो लोणी खाईल; देशात शेष राहिलेला प्रत्येक जण लोणी व मध खाईल.
23त्या दिवशी असे होईल की जेथे जेथे हजार रुपये किमतीचे हजार द्राक्षींचे वेल असत तेथे तेथे काटेकुटे होतील.
24तेथे धनुष्यबाण घेऊन लोक जातील; कारण सगळा देश कंटकमय होईल.
25ज्या टेकड्यांवर कुदळींनी खणीत त्या सगळ्यांवर काटेर्‍यांच्या भीतीने तू जाणार नाहीस, तर त्या ठिकाणी गुरेढोरे चरतील व शेरडेमेंढरे फिरतील.”

सध्या निवडलेले:

यशया 7: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन