YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 65

65
बंडखोरांना शासन
1“जे मला विचारत नसत त्यांना मी दर्शन दिले; माझा धावा करत नसत त्यांना मी प्राप्त झालो. ज्यांना माझे नाम प्राप्त झालेले नव्हते त्यांना मी म्हणालो, ‘पाहा मी आहे, हा मी आहे.’
2जो चांगला नाही अशा मार्गाने स्वच्छंदपणे चालणार्‍या फितुरी लोकांपुढे मी आपले हात नित्य केले;
3माझ्यासमक्ष बागांत यज्ञ करून व विटांवर धूप जाळून मला क्षोभ आणणारे असे हे लोक आहेत.
4ते कबरांमध्ये राहतात, गुप्त स्थानी रात्र काढतात; डुकराचे मांस खातात, अमंगळ पदार्थांचा रस त्यांच्या पात्रांत असतो;
5ते म्हणतात, ‘हां! जवळ येऊ नकोस; तुझ्यापेक्षा मी पवित्र आहे.’ ते माझ्या नाकात धुरासारखे, सतत पेटलेल्या अग्नीसारखे आहेत.
6पाहा, माझ्यासमोर हा लेख आहे; मी पारिपत्य करीपर्यंत उगा राहणार नाही, प्रतिफळ त्यांच्या पदरी मोजून घालीन;
7तुमच्या दुष्कर्मांचे आणि तुमच्या वाडवडिलांनी पर्वतावर धूप जाळला व टेकड्यांवर माझा अपमान केला त्या दुष्कर्मांचे फळ मी त्यांना देईन,” असे परमेश्वर म्हणतो; “मी आधी त्यांच्या कर्मांचे फळ त्यांच्या पदरी मोजून घालीन.”
8परमेश्वर असे म्हणतो, “द्राक्षांच्या घोसात नवा द्राक्षारस दृष्टीस पडला असता ‘त्यात लाभ आहे म्हणून ह्याचा नाश करू नका’ असे लोक म्हणतात; त्याप्रमाणे मी आपल्या सेवकांस्तव करीन; मी अवघ्यांचा नाश करणार नाही.
9मी याकोबातून संतान, यहूदातून माझ्या पर्वतांचा वारस उत्पन्न करीन; माझे निवडलेले त्याचे वतन पावतील, माझे सेवक तेथे वस्ती करतील.
10माझा धावा करणार्‍या लोकांसाठी शारोन कळप चारण्याचे कुरण होईल, अखोराचे खोरे गुरांचा गोठा होईल.
11पण तुम्ही परमेश्वराला सोडले; जे तुम्ही माझ्या पवित्र पर्वताची पर्वा करत नाही, गादासाठी (भाग्यदेवतेसाठी) मेजवानी तयार करता, मनीसाठी (कर्मदेवतेसाठी) मिश्रित पेयांचे प्याले भरून ठेवता,
12त्या तुम्हांला तलवार नेमली आहे; तुम्ही सगळे वधासाठी खाली वाकाल; कारण मी हाक मारली तरी तुम्ही उत्तर दिले नाही; मी बोललो तरी तुम्ही ऐकले नाही; माझ्या दृष्टीने जे वाईट ते तुम्ही केले, जे मला नापसंत ते तुम्ही पसंत केले.”
13ह्याकरिता प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, माझे सेवक खातील, पण तुम्ही उपाशी राहाल; माझे सेवक पितील, पण तुम्ही तान्हेले राहाल; पाहा, माझे सेवक आनंद करतील पण तुम्ही फजीत व्हाल;
14पाहा, माझे सेवक हर्षित चित्ताने जयजयकार करतील, पण तुम्ही खिन्न चित्ताने ओरडाल, भग्नहृदयी होऊन आकांत कराल.
15तुम्ही आपले नाव मागे ठेवाल त्याचा उपयोग माझे निवडलेले लोक शाप देण्याकडे करून म्हणतील की प्रभू परमेश्वर तुला जिवे मारील; तो आपल्या सेवकांना दुसरे नाव ठेवील;
16म्हणून देशातला जो आपणास धन्य म्हणवील तो सत्य देवाच्या नामाने आपणास तसा म्हणवील; देशातला जो शपथ वाहील तो ती सत्य देवाच्या नामाची वाहील; कारण पूर्वीच्या कष्टांचा विसर पडला आहे व ते माझ्या दृष्टिआड झाले आहेत.
नवे आकाश व नवी पृथ्वी
17“पाहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करतो; पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत.
18परंतु जे मी उत्पन्न करतो त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्लास पावा; पाहा, मी यरुशलेम उल्लासमय, तिचे लोक आनंदमय करतो.
19मी यरुशलेमेविषयी उल्लास पावेन, माझ्या लोकांविषयी आनंद पावेन, तिच्यात शोकाचा व आकांताचा शब्द पुन्हा ऐकू येणार नाही.
20ह्यापुढे थोडे दिवस वाचणारे अर्भक तिच्यात जन्मास येणार नाही. जो पुर्‍या आयुष्याचा होणार नाही असा म्हातारा तिच्यात असणार नाही; तेथील जो कोणी तरुणपणी मरेल तो शंभर वर्षांचा होऊन मरेल.
21ते घरे बांधून त्यांत राहतील. द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील.
22ते घरे बांधतील आणि त्यांत दुसरे राहतील, ते लावणी करतील आणि फळ दुसरे खातील, असे व्हायचे नाही; कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल व माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगतील.
23त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत, संकट तत्काळ गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाहीत, कारण परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती संतती आहे व त्यांची मुले त्यांच्याजवळ राहतील.
24त्यांनी हाक मारण्यापूर्वी मी उत्तर देईन, ते बोलत आहेत तोच मी त्यांचे ऐकेन, असे होईल.
25तेव्हा लांडगा व कोकरू एकत्र चरतील, सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल; सर्पाचे खाणे धूळ होईल. माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत. नासधूस करणार नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.

सध्या निवडलेले:

यशया 65: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन