यशया 61
61
सीयोनेच्या उद्धाराचे शुभवृत्त
1प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे; कारण दीनांना शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे; भग्नहृदयी जनांना पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांना मुक्तता व बंदिवानांना बंधमोचन विदित करावे;
2परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा; सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे;
3सीयोनेतील शोकग्रस्तांना राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्यांना शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे; खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे; ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यांना नीतिमत्तेचे वृक्ष परमेश्वराने लावलेले रोप म्हणता यावे म्हणून त्याने मला पाठवले आहे.
4ते पुरातन काळची मोडतोड बांधून काढतील, आपल्या वाडवडिलांच्या वेळची खिंडारे भरून काढतील; उजाड नगरे व पूर्वीच्या पिढ्यांची ओसाड स्थळे पुन्हा वसवतील.
5परके उभे राहून तुमचे कळप चारतील. परदेशी तुमचे नांगरे व द्राक्षांचे मळे लावणारे होतील.
6तुम्हांला तर परमेश्वराचे याजक असे नाव पडेल, लोक तुम्हांला आमच्या देवाचे सेवक म्हणतील; राष्ट्रांची संपत्ती तुम्ही भोगाल, त्यांचे वैभव तुम्हांला प्राप्त झाल्याचा अभिमान वाहाल.
7तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हांला दुप्पट मिळेल; आपल्या उपमर्दाबद्दल मिळालेल्या वतनभागानेच ते आनंद पावतील; असे ते आपल्या देशात दुप्पट वतन पावतील; त्यांना सार्वकालिक आनंद प्राप्त होईल.
8“कारण मला, परमेश्वराला न्याय प्रिय आहे, अन्यायाच्या लुटीचा मला वीट आहे; मी त्यांना खातरीने प्रतिफळ देईन; त्यांच्याशी सार्वकालिक करार करीन.
9अन्य राष्ट्रांत त्यांचा वंश, देशोदेशीच्या लोकांत त्यांची संतती प्रख्यात होईल; परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती ही असे त्यांना पाहणारे कबूल करतील.”
10मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव उल्लासतो; कारण जसा नवरा शेलापागोटे लेऊन स्वत:ला याजकासारखा मंडित करतो व नवरी जशी अलंकारांनी स्वत:ला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत; मला नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादले आहे.
11कारण भूमी जशी आपले अंकुर उगवते, मळा जसा आपणात पेरलेले बीज उगवेसे करतो, तसा प्रभू परमेश्वर सर्व राष्ट्रांदेखत नीतिमत्ता व कीर्ती अंकुरित करील.
सध्या निवडलेले:
यशया 61: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.