उज्जीया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूला उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले; त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदिर व्यापून गेले होते. त्याच्या भोवताली सराफीम उभे होते; त्या प्रत्येकाला सहा-सहा पंख होते; दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी व दोहोंनी उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, “पवित्र! पवित्र! पवित्र सेनाधीश परमेश्वर! अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव आहे.”1 घोषणा करणार्यांच्या ह्या वाणीने उंबरठे हालले व मंदिर धुराने भरले. तेव्हा मी म्हणालो, “हायहाय! माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो; आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज ह्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले!” मग एक सराफदूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन माझ्याकडे उडत आला. तो माझ्या ओठांना लावून त्याने म्हटले, “पाहा, ह्याचा स्पर्श तुझ्या ओठांना झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित्त झाले आहे.” तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, “मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?” तेव्हा मी म्हणालो, “हा मी आहे! मला पाठव.” तो म्हणाला, “जा, ह्या लोकांना सांग की : ‘ऐकत राहा पण समजू नका, पाहत राहा, पण जाणू नका.’ ह्या लोकांनी डोळ्यांनी पाहून, कानांनी ऐकून व मनाने समजून माझ्याकडे वळून सुधारू नये म्हणून त्यांचे हृदय जड कर, त्यांचे कान बधिर कर व त्यांचे डोळे चिपडे कर.” मी म्हणालो, “हे प्रभू, असे कोठवर?” तो म्हणाला, “नगरे निर्जन होतील, घरे निर्मनुष्य होतील, जमीन ओसाड व वैराण होईल, परमेश्वर लोकांना दूर घालवून देईल व देशात ओसाड स्थळे बहुत होतील तोवर. त्यात लोकांचा दहावा हिस्सा राहिला तर त्याचाही नाश व्हायचा; तरी एला व अल्लोन ही झाडे तोडल्यावर ज्याप्रमाणे त्यांचा बुंधा राहतो त्याप्रमाणे त्यांचा बुडखा पवित्र बीज असा राहील.”2
यशया 6 वाचा
ऐका यशया 6
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यशया 6:1-13
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ