YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 57

57
1नीतिमान नष्ट होतो, पण ते कोणी लक्षात घेत नाही; देवभक्त प्राणास मुकतात, पण अरिष्टामुळे नीतिमान प्राणास मुकतो हा विचार कोणी करत नाही.
2तो शांती पावतो; सरळ मार्गाने चालणारा प्रत्येक जण आपल्या बिछान्यावर शांत पडतो.
3अहो चेटकिणीच्या मुलांनो, जाराच्या व जारिणीच्या वंशजांनो, तुम्ही इकडे जवळ या.
4कोणाची तुम्ही चेष्टा करता? कोणाला तोंड विचकता? कोणाला जीभ काढून दाखवता? तुम्ही अधर्माची संतती, लबाडीचे बीज नाही काय?
5प्रत्येक हिरव्या झाडाखाली, एला झाडांमध्ये तुम्ही मदोन्मत्त होता, ओढ्यांतल्या खडकांच्या कपारीत मुलांना ठार मारता तेच ना तुम्ही?
6ओढ्यातले गुळगुळीत गोटे हाच तुझा वाटा; हाच तुझा भाग; त्यांनाच तू पेयार्पणे व अन्नार्पणे वाहिलीस. असल्या गोष्टी होत असता मला समाधान वाटेल काय?
7मोठ्या उंच पर्वतावर तू आपली खाट घातलीस, तेथेच यज्ञ करण्यास तू वर चढून गेलीस.
8तू आपले स्मारकचिन्ह दरवाजांच्या आड व खांबाच्या आड ठेवले; मला सोडून दुसर्‍यांपुढे तू आपली काया उघडी केलीस; चढून वर गेलीस; तू आपली खाट रुंद केलीस; तू त्यांच्याशी ठराव केलास; त्यांचा संग तुला आवडला; तू शरीरपूजा केलीस.
9तू तेलाने माखून राजाकडे गेलीस, पुष्कळ सुगंधी द्रव्ये तू वाढवलीस, आपले जासूद दूरदूर पाठवलेस, अधोलोकापर्यंत तुझ्या नीचतेचा पल्ला गेला.
10दूरच्या पल्ल्यामुळे तू थकलीस, तरी “आपण आता हात टेकले” असे तू म्हणाली नाहीस; तुला नवा दम आला म्हणून तुला ग्लानी आली नाही.
11कोणाला घाबरून, कोणाला भिऊन तू लबाडी केलीस, माझे स्मरण ठेवले नाहीस, परिणामांची पर्वा केली नाहीस? मी दीर्घ काळ स्तब्ध राहिलो, म्हणूनच का तू माझे भय धरले नाहीस?
12तुझी नीतिमत्ता मी उजेडात आणीन; तुझ्या कर्मांविषयी म्हणशील तर त्यांपासून तुला काहीएक लाभ होणार नाही.
13तू धावा करशील तेव्हा तुझ्या मूर्तींच्या समुदायाने तुला सोडवावे; त्या सगळ्यांना तर वारा उडवून नेईल, एक फुंकर त्यांना घेऊन जाईल; पण जो माझा आश्रय करील तो पृथ्वीचे वतन पावेल आणि माझ्या पवित्र पर्वताचा ताबा घेईल.
14अशी वाणी झाली की, “भर घाला, भर घाला, मार्ग तयार करा; माझ्या लोकांच्या मार्गावरून ठेच लागण्याजोगे असेल ते काढून टाका.”
देवाचे साहाय्य व बरे करणे
15कारण जो उच्च, परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो : “मी उच्च व पवित्रस्थानी वसतो, तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे त्याच्या ठायीही मी वसतो; येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करतो.
16कारण मी सतत वाद करणारा नव्हे, सदा कोप करणारा नव्हे; असतो तर माझ्यापुढे मानवी आत्मा, मी उत्पन्न केलेले मानवप्राणी गलित झाले असते.
17त्याच्या स्वार्थमूलक अधर्मामुळे मी रागावून त्याला ताडन केले, मी विन्मुख झालो, मी त्याच्यावर कोपलो; पण तो आपल्या मनाच्या कलाप्रमाणे वागत गेला.
18मी त्याची चालचर्या पाहिली, मी त्याला सुधारीन; मी त्याला मार्ग दाखवीन, मी त्याचे, त्याच्यातल्या शोकग्रस्तांचे समाधान करीन.
19मी त्याच्या तोंडून आभारवचन उच्चारवीन, जे दूर आहेत व जे जवळ आहेत, त्यांना शांती असो, शांती असो; मी त्यांना सुधारीन असे परमेश्वर म्हणतो.
20दुर्जन खवळलेल्या सागरासारखे आहेत; त्यांच्याने स्थिर राहवत नाही; त्यांच्या लाटा चिखल व गाळ बाहेर टाकतात.
21दुर्जनांना शांती नाही असे माझा देव म्हणतो.”

सध्या निवडलेले:

यशया 57: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन