YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 52

52
सीयोनेची बंदिवासातून सुटका
1हे सीयोने, जागी हो; आपल्या बलाने युक्त हो; हे यरुशलेमे, पवित्र नगरी, आपली सुंदर वस्त्रे परिधान कर; कारण ह्यापुढे बेसुंती किंवा अशुद्ध असा कोणी तुझ्या ठायी प्रवेश करणार नाही.
2अंगाची धूळ झाड; हे यरुशलेमे, उठून बस; सीयोनेच्या बंदिवान कन्ये, आपल्या गळ्याची बंधने सोडून टाक.
3कारण परमेश्वर म्हणतो की : “मोलावाचून तुम्हांला विकले आणि पैक्यावाचून तुमची मुक्तता होणार.
4कारण प्रभू परमेश्वर म्हणतो की माझे लोक मिसर देशात जाऊन राहिले; अश्शूरानेही विनाकारण त्यांच्यावर जुलूम केला.
5परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांना फुकट धरून नेले आहे, आणि आता मी येथे काय करू? परमेश्वर म्हणतो, त्यांच्यावर प्रभूत्व करणारे गर्जना करीत आहेत, दिवसभर एकसारखी माझ्या नामाची निंदा होत आहे.
6म्हणून माझ्या लोकांना माझ्या नामाची ओळख होईल, आणि मग मी तुमच्याजवळ आहे असे बोलणारा तोच मी आहे असे ते त्या दिवशी जाणतील.”
7जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करतो, शुभवृत्त विदित करतो, तारण जाहीर करतो, “तुझा देव राज्य करीत आहे” असे सीयोनेस म्हणतो, त्याचे पाय पर्वतांवरून येताना किती मनोरम दिसतात.
8तुझ्या जागल्यांचा हा शब्द ऐक, ते एकदम उच्च स्वराने गात आहेत; कारण परमेश्वर सीयोनेस परत येत आहे हे ते प्रत्यक्ष पाहत आहेत.
9यरुशलेमेच्या उद्ध्वस्त झालेल्या स्थलांनो, आनंदघोष करा, सर्व मिळून गा; कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, त्याने यरुशलेमेस उद्धरले आहे.
10परमेश्वराने सर्व राष्ट्रांपुढे आपल्या पवित्र हाताची अस्तनी मागे सारली आहे;1 सगळ्या दिगंतांना आमच्या देवाने केलेले तारण दिसून येत आहे.
11निघा, निघा, तेथून निघून जा; अशुद्ध वस्तूला शिवू नका; तिच्यामधून निघून जा; परमेश्वराची पात्रे वाह-णार्‍यांनो, तुम्ही आपणांस शुद्ध करा.
12तुम्हांला घाईघाईने निघावे लागणार नाही, पळ काढावा लागणार नाही; कारण परमेश्वर तुमचा पुढारी आहे; इस्राएलाचा देव तुमचा पाठीराखा आहे.
परमेश्वराच्या सेवकाचा दु:खभोग
13पाहा, माझा सेवक सुज्ञतेने वर्तेल, तो थोर व उन्नत होईल, तो अत्युच्च होईल.
14ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले (त्याचा चेहरा मनुष्याच्या चेहर्‍यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्यजातीच्या स्वरूपासारखे नव्हते इतका तो विरूप होता),
15त्याप्रमाणे तो अनेक राष्ट्रांना दचकायला लावील;2 राजे त्याला पाहून आपली तोंडे बंद करतील; कारण कोणी सांगितल्या नाहीत असल्या गोष्टी ते पाहतील; त्यांच्या कानी पडल्या नाहीत असल्या गोष्टी त्यांना कळतील.

सध्या निवडलेले:

यशया 52: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन