YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 48:1-11

यशया 48:1-11 MARVBSI

हे याकोबाच्या घराण्या, ऐक, तुला इस्राएल हे नाव आहे, तू यहूदाच्या झर्‍यातून निघाला आहेस; तू परमेश्वराच्या नामाची शपथ वाहतोस व इस्राएलाच्या देवाचे स्तवन करतोस, पण सत्याने व नीतिमत्तेने नव्हे. ते तर आपणांस पवित्र नगराचे म्हणवतात व इस्राएलाच्या देवाचा आश्रय करतात; त्याचे नाम सेनाधीश परमेश्वर आहे. “मी मागेच पूर्वीच्या गोष्टी सांगितल्या, माझ्या मुखातून त्या निघाल्या, मी त्या कळवल्या; मी त्या अकस्मात करू लागलो, आणि त्या घडून आल्या. तू हट्टी आहेस, तुझ्या मानेचे स्नायू जसे काय लोखंड व तुझे कपाळ जसे काय पितळ आहे हे मला ठाऊक होते. म्हणून हे बहुत काळापूर्वीच तुला कळवले. ते घडण्यापूर्वीच तुला विदित केले; नाहीतर तू म्हणाला असतास की ‘माझ्या मूर्तीने ते केले; माझ्या कोरीव मूर्तीच्या आज्ञेने व माझ्या ओतीव मूर्तीच्या आज्ञेने ते झाले.’ तू हे ऐकले आहेस, हे सर्व पाहा, तुम्हांला हे कबूल करायला नको काय? आतापासून मी नव्या गोष्टी, गुप्त गोष्टी, तुला माहीत नाहीत अशा गोष्टी तुला ऐकवतो. त्या आताच उद्भवल्या, फार मागे नाहीत; त्या तुला आजपर्यंत ठाऊक नव्हत्या, नाही तर तू म्हणतास, ‘पाहा, त्या मला आधीच ठाऊक होत्या.’ तू त्या ऐकल्या नव्हत्या, जाणल्या नव्हत्या; प्राचीन काळापासून तुझे कान उघडले नव्हते, कारण तू विश्वासघातकी आहेस; गर्भवासापासून तुला फितुरी हे नाव पडले आहे, हे मला ठाऊक होते. माझ्या नामाप्रीत्यर्थ मी आपला क्रोध लांबणीवर टाकला; तुझा उच्छेद करू नये म्हणून माझ्या प्रशंसेप्रीत्यर्थ मी स्वतःला आवरले. मी तुला गाळले आहे, पण रुप्याप्रमाणे नव्हे; मी दु:खरूप भट्टीत तुला कसोटीस लावले आहे. माझ्या, केवळ माझ्याचप्रीत्यर्थ हे मी करतो; माझ्या नामाची अप्रतिष्ठा का व्हावी? माझा गौरव मी इतरांना देत नाही.