YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 44:6-28

यशया 44:6-28 MARVBSI

इस्राएलाचा राजा परमेश्वर, त्याचा उद्धारकर्ता, सेनाधीश परमेश्वर म्हणतो : “मी आदी आहे, मी अंत आहे; माझ्यावेगळा देव नाहीच. मी प्राचीन काळच्या लोकांची स्थापना केली तेव्हापासून माझ्यासारखा संदेश प्रकट करणारा कोण आहे? कोणी असला तर त्याने बोलावे व माझ्यापुढे प्रतिपादन करावे; त्यांनी भावी गोष्टी व आता होणार्‍या गोष्टी सांगाव्यात. भयभीत होऊ नका, थरथर कापू नका; मी मागेच तुला हे ऐकवले आहे व कळवले की नाही? तुम्ही माझे साक्षी आहात, माझ्यावेगळा कोणी देव आहे काय? माझ्यावेगळा कोणी दुर्ग नाही; मला कोणी ठाऊक नाही.” कोरीव मूर्ती घडवणारे सर्व शून्यवत आहेत; त्यांचे रम्य विषय काही कामाचे नाहीत; त्याविषयी साक्ष देणार्‍यांना दृष्टी नाही किंवा अक्कल नाही; म्हणून ती देणार्‍यांना लज्जा प्राप्त होईल. हा देव कोणी घडवला? ही मूर्ती कोणी व्यर्थ ओतली? पाहा, त्याचे सर्व अनुयायी फजीत होतील; ही मूर्ती घडवणारे माणसेच आहेत; ते सर्व एकत्र जमोत, पुढे येवोत, भयभीत होवोत, ते सारे लज्जित होवोत. लोहार छिन्नी पाजवतो, तो पेटलेल्या कोळशांनी काम करतो, हातोड्यांनी मूर्तीला आकार आणतो, तो आपल्या बाहुबलाने ती घडतो; त्याला भूक लागते व त्याची शक्ती गळते; तो पाणी प्याला नाही तर व्याकूळ होतो. सुतार सूत धरतो; गेरूने आखणी करतो; तिच्यावर रंधा फिरवतो, व कैवाराने खुणा करतो; आणि ती घरात ठेवण्याजोगी व्हावी म्हणून तिला मनुष्याचा आकार व सौंदर्य देतो. कोणी आपणासाठी गंधसरू तोडतो; सुरू व अल्लोन झाडे घेतो; तो वनवृक्षांतून जून झाडे निवडतो; तो देवदारूचे झाड लावतो आणि पावसाने ते वाढते. ते मनुष्यास सरपणाच्या कामी पडते; त्यातले काही लाकूड घेऊन त्याने तो शेक घेतो; ते पेटवून त्यावर भाकरी भाजतो; तो त्याचा देवही बनवतो व त्याच्या पाया पडतो; तो त्याची कोरीव मूर्ती करतो व तिचे भजनपूजन करतो. त्यातले अर्धे लाकूड तो अग्नीत जाळतो; त्या अर्ध्यावर मांस भाजून खातो व तृप्त होतो; तो शेकताना म्हणतो, “मला ऊब येत आहे, मला शेक लागत आहे.” तो त्याच्या उरलेल्या भागाचा देव घडतो, म्हणजे कोरीव मूर्ती आपल्यासाठी बनवतो; तो तिच्या पाया पडतो, तिचे भजनपूजन करतो; तिची प्रार्थना करतो; तो तिला म्हणतो, “माझे तारण कर, तू माझा देव आहेस.” अशांना कळत नाही, समजत नाही; त्यांचे डोळे लिंपले असल्यामुळे त्यांना दिसत नाही; त्यांची हृदये लिंपली असल्यामुळे त्यांना समजत नाही. कोणी हे ध्यानात आणत नाही; “त्याचा अर्धा भाग आपण अग्नीत जाळला, त्याच्या निखार्‍यांवर भाकर भाजली, मांस भाजून खाल्ले आणि त्याच्या अवशेषाची अमंगल वस्तू मी कशी बनवू? झाडापासून काढलेल्या लाकडाच्या पाया मी कसा पडू?” असे म्हणण्याइतके कोणाला ज्ञान नाही, अक्कल नाही. तो राख भक्षण करतो, त्याचे हृदय मूढ झाल्यामुळे तो बहकला आहे; तो आपला जीव वाचवू शकत नाही; “माझ्या उजव्या हातात आहे ती साक्षात लबाडी नव्हे काय?” असे तो म्हणत नाही. हे याकोबा, हे इस्राएला, ह्या गोष्टी स्मरणात ठेव; तू माझा सेवक आहेस; मी तुला घडले आहे, तू माझा सेवक आहेस; हे इस्राएला, तुझा मला विसर पडायचा नाही. तुझे अपराध धुक्याप्रमाणे, तुझी पातके अभ्राप्रमाणे मी नाहीतशी केली आहेत; माझ्याकडे फीर, कारण मी तुला उद्धरले आहे. हे आकाशा, जयघोष कर, कारण परमेश्वराने हे केले आहे; अहो पृथ्वीच्या अधोभागांनो, हर्षनाद करा; अहो पर्वतांनो, हे वना, त्यातील प्रत्येक वृक्षा, तुम्ही जयजयकार करा; कारण परमेश्वराने याकोबाला उद्धरले आहे; तो इस्राएलाच्या ठायी आपला प्रताप प्रकट करतो. तुझा उद्धारकर्ता, गर्भावस्थेपासून तुला घडणारा परमेश्वर म्हणतो, “मी वस्तुमात्राचा कर्ता परमेश्वर आहे; मी एकट्याने आकाश पसरले, पृथ्वीचा विस्तार केला तेव्हा माझ्याजवळ कोण होते? खोट्या संदेष्ट्यांची चिन्हे खोटी करणारा, दैवज्ञांना वेडे ठरवणारा, ज्ञानी लोकांना मागे सारून त्यांचे ज्ञान मूर्खत्व ठरवणारा मी आहे. मी आपल्या सेवकाचा शब्द खरा करणारा, आपल्या दूतांची संदेशवचने सिद्धीस नेणारा आहे; मी यरुशलेमेविषयी म्हणतो, ‘तिच्यात वस्ती होवो;’ यहूदाच्या नगरांविषयी म्हणतो, ‘ती बांधण्यात येवोत, त्यांच्या उजाड झालेल्या स्थलांचा जीर्णोद्धार मी करीन;’ मी खोल पाण्याच्या डोहास म्हणतो, ‘कोरडा हो, मी तुझे प्रवाह आटवीन;’ मी कोरेशाविषयी म्हणतो, ‘तो माझा मेंढपाळ आहे, तो माझे सर्व मनोरथ सिद्धीस नेईल.’ तो यरुशलेमेविषयी म्हणेल, ‘ती बांधण्यात येईल, मंदिराचा पाया घालण्यात येईल.”’