YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 19

19
मिसराविषयी देववाणी
1मिसर देशाविषयीची देववाणी; परमेश्वर शीघ्रगती मेघावर आरूढ होऊन मिसराकडे येत आहे; मिसरातील मूर्ती त्याच्यासमोर कापत आहेत आणि मिसराचे हृदय आतल्या आत विरघळत आहे.
2मी मिसर्‍यांवर मिसरी उठवीन; प्रत्येक आपल्या भावाबरोबर व प्रत्येक आपल्या शेजार्‍याबरोबर, नगर नगराशी, राज्य राज्याशी लढेल.
3मिसराच्या अंगची हिंमत खचेल; त्याची मसलत मी व्यर्थ करीन; ते मूर्तींना, मांत्रिकांना, भूतवैद्यांना व गारुड्यांना प्रश्‍न विचारतील.
4मी मिसर्‍यांना एका कठोर धन्याच्या हाती देईन; एक उग्र राजा त्यांच्यावर सत्ता करील असे प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
5समुद्राचे पाणी आटून जाईल, नदी आटून कोरडी होईल.
6नदीच्या फाट्यांना घाण सुटेल; मिसर देशाचे कालवे बारीक होऊन सुकून जातील; बोरू व लव्हाळे सुकून जातील.
7नील नदीजवळची, नील नदीतीरीची कुरणे व नील नदीच्या आसपासची सर्व शेती वाळून जाईल व तिच्यातील सर्वकाही विखरून नाहीसे होईल.
8तेव्हा धीवर शोक करतील; नील नदीत गळ टाकणारे सर्व विलाप करतील; पाण्यावर पाग टाकणारे म्लान होतील.
9पिंजलेल्या तागाचे काम करणारे, कापसाचे विणकाम करणारे काळवंडतील.
10देशाचे स्तंभ भग्न होतील; वेतन घेऊन काम करणार्‍या सर्वांची मने खिन्न होतील.
11सोअनाचे सरदार, फारोचे शहाणे मंत्री निवळ मूर्ख बनले आहेत; त्यांची मसलत पशूच्या समान झाली आहे; “मी शहाण्यांचा पुत्र आहे, मी प्राचीन राजांचा वंशज आहे” असे तुम्ही फारोला कसे म्हणता?
12तुझे शहाणे कोठे आहेत? त्यांनी तुला आता सांगावे. मिसराविषयी सेनाधीश परमेश्वराने काय संकल्प केला आहे हे त्यांना कळू द्या.
13सोअनाचे सरदार मूर्ख बनले आहेत; नोफाचे सरदार फसले आहेत; मिसरी गोत्रांची कोनशिला असे जे, त्यांनी मिसराला बहकवले आहे.
14परमेश्वराने त्यांच्यात भ्रांतवृत्ती घातली आहे; मद्यपी वांती करीत लोळतो तसे त्यांनी मिसर देशाला त्याच्या प्रत्येक कामात बहकवले आहे.
15तेव्हा शीर अथवा शेपूट, झावळी किंवा लव्हाळा ह्यांना करता येईल असे एकही कार्य मिसर देशात उरणार नाही.
16त्या काळी मिसरी लोक बायकांसारखे होतील; सेनाधीश परमेश्वर त्यांच्यावर आपला हात उगारील त्यामुळे ते थरथर कापतील व भयभीत होतील.
17तेव्हा यहूदाची भूमी मिसर देशाला भीतिप्रद होईल; तिचे मिसर देशाजवळ कोणी नाव काढल्यास तो भयग्रस्त होईल; सेनाधीश परमेश्वराने जो संकल्प त्याच्याविषयी योजला आहे त्यामुळे असे होईल.
18त्या दिवशी मिसर देशाची पाच नगरे कनान देशाची भाषा बोलतील; ती सेनाधीश परमेश्वरापुढे एकनिष्ठतेची शपथ वाहतील; त्यांपैकी एकाला ईर-हरेस (विनाशनगर) म्हणतील.
19त्या दिवशी मिसर देशाच्या मध्ये परमेश्वरासाठी वेदी होईल व त्याच्या सीमेवर परमेश्वरासाठी स्तंभ होईल.
20ही मिसर देशात सेनाधीश परमेश्वराचे चिन्ह व साक्ष अशी होतील; आपणांवर जुलूम करणार्‍यांमुळे लोक परमेश्वराचा धावा करतील तेव्हा तो एक उद्धारक व कैवारी पाठवून त्यांना मुक्त करील.
21त्या दिवशी परमेश्वर मिसर्‍यांना आपली ओळख देईल व मिसरी परमेश्वराला ओळखतील; ते यज्ञ व बली अर्पून त्याची उपासना करतील; ते परमेश्वराला नवस करतील व तो फेडतील.
22परमेश्वर मिसर देशास मारील; मारील व बरेही करील; ते परमेश्वराकडे वळतील आणि तो त्यांची विनंती ऐकेल व त्यांना बरे करील.
23त्या दिवशी मिसराहून अश्शूरास हमरस्ता होईल; अश्शूर मिसरात व मिसर अश्शूरात येईलजाईल; मिसर अश्शूराबरोबर उपासना करील.
24त्या दिवशी मिसर व अश्शूर ह्यांचा इस्राएल हा तिसरा सोबती बनेल व पृथ्वीला मंगलप्रद होईल;
25कारण सेनाधीश परमेश्वराने त्यांना हा आशीर्वाद दिला : “माझी प्रजा मिसर धन्य असो; माझ्या हातची कृती अश्शूर धन्य असो; आणि माझे वतन इस्राएल धन्य असो.”

सध्या निवडलेले:

यशया 19: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन