यशया 16
16
1अधिपतीस पाठवायचा कोकरांचा नजराणा तुम्ही रानाजवळचे सेला येथून सीयोनकन्येच्या पर्वताकडे रवाना करा.
2कारण कोट्यांतून उडवलेल्या भटकणार्या पाखरांप्रमाणे मवाबाच्या कन्या आर्णोनच्या उतारांजवळ भटकतील.
3“मसलत दे, निर्णय कर; भरदुपारी आपली छाया रात्रीसारखी कर; घालवून दिलेल्यांना लपव, भटकणार्यांना दाखवून देऊ नकोस.
4माझ्या घालवून दिलेल्यांना तुझ्याजवळ राहू दे; मवाबाला लुटारूंपासून आसरा हो; कारण पिळून काढणारा नष्ट झाला आहे; नासधूस बंद झाली आहे; पायमल्ली करणारे देशातून नाहीतसे झाले आहेत.
5वात्सल्याचे सिंहासन स्थापले आहे; त्यावर दाविदाच्या डेर्यात कोणीएक सत्यनिष्ठ विराजमान होईल; तो न्याय करणारा, न्यायप्रिय, नीतिमत्तेत निपुण असा असेल.”
6मवाबाच्या गर्वाविषयी आम्ही ऐकून आहोत; तो मोठा अभिमानी आहे; त्याचा उन्मत्तपणा, त्याचा गर्व व त्याचा क्रोध ह्यांविषयी आम्ही ऐकून आहोत; त्याची बढाई निरर्थक आहे.
7ह्यास्तव मवाब स्वतःविषयी विलाप करील; सर्व लोक शोक करतील, कीर-हरेसेथाच्या मनुकांच्या ढेपांविषयी1 अगदी निराश होऊन तुम्ही उसासा टाकाल.
8हेशबोनाचे मळे व सिब्मेच्या द्राक्षलता ही सुकून गेली आहेत; राष्ट्रांच्या अधिपतींनी तिच्या लतांचे अंकुर खुडून टाकले आहेत. ती याजेरापर्यंत विस्तारली होती, ती रानातही पसरली होती; तिच्या फांद्या चोहोकडे पसरून समुद्रापलीकडे गेल्या होत्या.
9म्हणून मी याजेराच्या विलापाप्रमाणे सिब्मेच्या द्राक्षलतेविषयी विलाप करतो; हे हेशबोना, हे एलाले, मी आपल्या अश्रूंनी तुम्हांला न्हाऊ घालीन. कारण उन्हाळ्यातील तुझ्या फळांच्या व पिकांच्या हंगामाच्या वेळी रणशब्द कानी पडला.
10सुपीक मळ्यातला आनंद व उल्लास नाहीसा झाला; द्राक्षीच्या मळ्यात गायनाचा व हर्षाचा गजर होत नाही; द्राक्षकुंडात द्राक्षे तुडवून कोणी द्राक्षारस काढत नाही; द्राक्षांच्या हंगामातला उत्सवशब्द मी बंद केला आहे.
11ह्यामुळे माझी आतडी मवाबासाठी, माझे काळीज कीर-हरेसासाठी वीणेप्रमाणे नाद करीत आहे.
12मवाब देवदर्शन घेईल आणि उंच स्थानी रडून-रडून थकेल; तो देवघरात प्रार्थना करण्यास जाईल तरी त्याचे काही चालणार नाही.
13मवाबाविषयी गतकाळी परमेश्वराने जे वचन विदित केले ते हे :
14आता परमेश्वर म्हणतो, “सालदाराच्या मुदतीप्रमाणे तीन वर्षांत मवाबाचे वैभव त्याच्या सगळ्या मोठ्या समुदायासह क्षीण होईल; त्याचा अवशेष राहील, पण तो अत्यल्प; म्हणण्यासारखा नसणार.”
सध्या निवडलेले:
यशया 16: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.