YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 1

1
पातकी राष्ट्र
1यहूदाचे राजे उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या काळात यहूदा व यरुशलेम ह्यांविषयी आमोजाचा पुत्र यशया ह्याला झालेला दृष्टान्त.
2हे आकाशा, ऐक; अगे पृथ्वी, कान दे, कारण परमेश्वर बोलत आहे : “मी मुलांचे पालनपोषण केले, त्यांना लहानाचे मोठे केले तरी ती माझ्याशी फितूर झाली.
3बैल आपल्या धन्याला ओळखतो, गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखतो; पण इस्राएल ओळखत नाही, माझे लोक विचार करीत नाहीत.”
4किती हे पापिष्ट राष्ट्र! दुष्कर्माने भारावलेले लोक, दुर्जनांची संतती! ही आचारभ्रष्ट मुले! ह्यांनी परमेश्वराला सोडले आहे, इस्राएलाच्या पवित्र प्रभूला तुच्छ मानले आहे; ती वियुक्त होऊन मागे फिरली आहेत.
5तुम्ही अधिकाधिक फितून मार का खात राहता? हरएक मस्तक व्यथित झाले आहे, हरएक हृदय ग्लान झाले आहे.
6पायाच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत काहीच धड नाही; जखमा, चेंचरलेले व पुवळलेले घाय आहेत; ते कोणी पिळून काढत नाही, त्यांवर कोणी पट्टी बांधत नाही, कोणी तेलाने नरम करीत नाही.
7तुमचा देश ओसाड आहे; तुमची नगरे अग्नीने जळाली आहेत; तुमची शेते परके लोक तुमच्यादेखत खाऊन टाकत आहेत; परक्यांनी उद्ध्वस्त केल्याप्रमाणे ती ओसाड झाली आहेत.
8सीयोनेची कन्या द्राक्षीच्या मळ्यातल्या खोपीसारखी, काकड्यांच्या बागेतल्या माचाळासारखी, वेढा पडलेल्या नगरासारखी राहिली आहे.
9सेनाधीश परमेश्वराने आमच्यासाठी यत्किंचित शेष राखून ठेवले नसते तर आम्ही सदोमासारखे झालो असतो, गमोर्‍याप्रमाणे बनलो असतो.
खर्‍या पश्‍चात्तापासाठी आवाहन
10सदोमाच्या अधिपतींनो, परमेश्वराचे वचन ऐका; गमोर्‍याच्या लोकांनो, आमच्या देवाच्या नियमशास्त्राकडे कान द्या.
11“परमेश्वर म्हणतो, तुमचे बहुत यज्ञबली माझ्या काय कामाचे? मेंढरांचे होम, पुष्ट वासरांची चरबी ह्यांनी माझी अति तृप्ती झाली आहे; बैल, कोकरे व बोकड ह्यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही.
12तुम्ही माझे दर्शन घेण्यास येताना माझी अंगणे तुडवता, हे तुम्हांला सांगितले कोणी?
13निरर्थक अर्पणे आणखी आणू नका; धूपाचा मला वीट आहे; चंद्रदर्शन, शब्बाथ व मेळे भरवणे मला खपत नाही; सणाचा मेळा हाही अधर्मच होय.
14माझा जीव तुमची चंद्रदर्शने व सण ह्यांचा द्वेष करतो; त्यांचा मला भार झाला आहे; तो सोसून मी थकलो आहे.
15तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्यापुढे डोळे झाकतो; तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही; तुमचे हात रक्ताने भरले आहेत.
16आपणांस धुवा, स्वच्छ करा; माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्मांचे दुष्टपण दूर करा; दुष्टपणा करण्याचे सोडून द्या;
17चांगले करण्यास शिका, नीतीच्या मागे लागा, जुलम्याला ताळ्यावर आणा;1 अनाथाचा न्याय करा; विधवेचा कैवार घ्या.
18परमेश्वर म्हणतो, चला, या, आपण बुद्धिवाद करू; तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील.
19तुम्ही माझे ऐकायला मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फळ खाल;
20तुम्ही अमान्य होऊन बंड कराल तर तलवार तुम्हांला खाऊन टाकील; कारण परमेश्वराच्या तोंडचे हे वचन आहे.”
सीयोनेचा न्याय व उद्धार
21साध्वी नगरी कशी असाध्वी झाली आहे? ती न्यायपूर्ण होती, तिच्यात नीतिमत्ता वसत असे, आता तिच्यात घातकी राहतात.
22तुझे रुपे कीट झाले आहे; तुझ्या द्राक्षारसात पाणी मिसळले आहे.
23तुझे सरदार बंडखोर व चोरांचे साथीदार झाले आहेत; त्यांतील प्रत्येकाला लाचांची आवड आहे. प्रत्येक जण नजराण्यांमागे लागणारा आहे; ते अनाथाचा न्याय करत नाहीत, विधवेची दाद घेत नाहीत.
24ह्यासाठी प्रभू, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा समर्थ देव म्हणतो, “माझ्या शत्रूंचा समाचार घेऊन मी स्वस्थता पावेन, माझ्या वैर्‍यांचा सूड घेईन.
25मी आपला हात तुला लावून क्षार घातल्यासारखा तुझे कीट गाळून नाहीसे करीन, तुझ्यातील सर्व शिसे काढून टाकीन.
26आणि मी तुझ्यावर पूर्वीप्रमाणे न्यायाधीश व आरंभीच्याप्रमाणे मंत्री पुन्हा नेमीन; आणि मग तुला नीतिमत्तेची नगरी, विश्वासू नगरी म्हणतील.”
27सीयोनेचा न्यायाकडून उद्धार होईल व तिच्यातील पापनिवृत्त जन नीतीने उद्धरले जातील.
28बंडखोर व पापी ह्यांचा बरोबरच विध्वंस होईल; परमेश्वराला सोडणारे नष्ट होतील.
29तुमच्या आवडीची जी एलाची झाडे त्यांविषयी ते लज्जित होतील, आणि ज्या बागांवर तुमचे मन बसले होते त्यासंबंधाने तुमच्या तोंडाला काळिमा लागेल.
30कारण तुम्ही पाला सुकून गेलेल्या एलाच्या झाडासारखे, पाणी नसलेल्या बागेसारखे व्हाल.
31बलाढ्य मनुष्य पिंजलेल्या तागासारखा होईल, आणि त्याच्या हातचे काम ठिणगी होईल; ती दोन्ही बरोबरच जळतील, ती कोणी विझवणार नाही.

सध्या निवडलेले:

यशया 1: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन