होशेय 8
8
मूर्तिपूजेबद्दल इस्राएलाचा निषेध
1मुखाला कर्णा लाव. गरुडासारखा तो परमेश्वराच्या मंदिरावर उतरेल, कारण त्यांनी माझा करार मोडला आहे, माझ्या नियमशास्त्राचे त्यांनी अतिक्रमण केले आहे.
2हे माझ्या देवा, ‘आम्ही इस्राएल तुला ओळखतो’ असे ते माझा धावा करून म्हणतात.
3इस्राएलाने चांगल्याचा धिक्कार केला आहे; शत्रू त्याच्या पाठीस लागेल.
4त्यांनी राजे नेमले आहेत, पण माझ्या विचाराने नेमले नाहीत; त्यांनी अधिपती स्थापले, पण त्यासाठी माझी संमती नव्हती; केवळ नष्ट होण्याकरताच त्यांनी आपणांसाठी आपल्या सोन्यारुप्याच्या मूर्ती केल्या.
5हे शोमरोना, तुझ्या वासरांचा त्याला वीट आहे; त्यांच्यावर माझा राग पेटला आहे; त्यांना निर्दोषता प्राप्त होण्यास किती काळ लागेल!
6कारण हेही इस्राएलाकडूनच झाले; कारागिराने ते (वासरू) केले, ते देव नाही; ह्या शोमरोनाच्या वासराचे तुकडे-तुकडे होतील.
7कारण ते वार्याची पेरणी करून वावटळीची कापणी करतात; त्याला ताट नाही, अंकुराला कणीस येत नाही; आलेच तर ते परके खाऊन टाकतील.
8इस्राएलास गिळून टाकले आहे, राष्ट्रांमध्ये ते आता टाकाऊ भांड्यासारखे झाले आहेत.
9कारण ते अश्शूराकडे वर गेले आहेत; ते स्वच्छंदपणे भटकणार्या रानगाढवासारखे आहेत; एफ्राइमाने देणग्या देऊन दोस्ती केली आहे.
10जरी ते राष्ट्रात देणग्या देत फिरतात तरी मी आता त्यांना एकत्र करीन, ते राजाधिराजाच्या कारभाराने घटत जातील.
11कारण एफ्राइमाने पाप करण्यासाठी पुष्कळ वेद्या केल्या आहेत; ह्या वेद्या पापमूलक झाल्या आहेत.
12मी त्याच्यासाठी आपल्या नियमशास्त्राच्या लाखो आज्ञा लिहिल्या, तरी त्याला त्या परक्याच वाटतात.
13त्यांनी मला केलेली यज्ञार्पणे म्हणजे केवळ मांस अर्पून ते खाणे होय; पण ती परमेश्वर स्वीकारत नाही; आता तो त्यांचा अधर्म स्मरेल व त्यांच्या पापाचे शासन करील; ते मिसरास परत जातील.
14कारण इस्राएलाने आपल्या उत्पन्नकर्त्यास विसरून मंदिरे बांधली आहेत, यहूदाने तटबंदीची नगरे बहुत बांधली आहेत; पण मी त्याच्या नगरांवर अग्नी पाठवीन, तो त्यांचे वाडे खाऊन टाकील.
सध्या निवडलेले:
होशेय 8: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.