होशेय 5
5
इस्राएलास बेइमानीबद्दल शिक्षा
1याजकांनो, ऐका; हे इस्राएलाच्या घराण्या, लक्ष दे; हे राजघराण्या, कान दे; कारण तुम्हांला शासन होणार; तुम्ही मिस्पा येथे पाश, ताबोरावर पसरलेले जाळे असे झाला आहात.
2फितुरी लोक भ्रष्टाचारात बुडून गेले आहेत; तर त्या सर्वांना शासन करणारा मी आहे.
3एफ्राइमाला मी ओळखतो, इस्राएल माझ्यापासून लपलेला नाही; हे एफ्राइमा, तू व्यभिचार केला आहेस; इस्राएल भ्रष्ट झाला आहे.
4त्यांची कर्मे त्यांना आपल्या देवाकडे वळू देत नाहीत, कारण अनाचारबुद्धी त्यांच्या ठायी आहे, परमेश्वराला ते ओळखत नाहीत.
5इस्राएलाचे जो भूषण तो त्याच्यासमक्ष त्याच्याविरुद्ध साक्ष देतो, म्हणून इस्राएल व एफ्राईम आपल्या पापामुळे अडखळून पडतील, यहूदाही त्यांच्याबरोबर अडखळून पडेल.
6ते आपली मेंढरे व गुरे घेऊन परमेश्वराचा आश्रय करण्यास येतील, पण तो त्यांना सापडणार नाही, तो त्यांना अंतरला आहे.
7ते परमेश्वराबरोबर बेइमान झाले आहेत, कारण त्यांना झालेली मुले परकी आहेत; आता चंद्रदर्शन होताच ते आपल्या वतनभागांसह गडप होतील.
8गिबात शिंग फुंका, रामात कर्णा वाजवा; तुझ्यामागे, हे बन्यामिना! असा रणशब्द बेथ-आवेन येथे करा.
9शासनाच्या दिवशी एफ्राईम ओसाड होईल; ही खातरीने होणारी गोष्ट मी इस्राएलाच्या वंशांना कळवली आहे.
10यहूदाचे सरदार शेताची मेर सारणार्यांसारखे झाले आहेत; मी त्यांच्यावर पाण्याप्रमाणे आपल्या क्रोधाचा वर्षाव करीन.
11एफ्राइमाला पीडा झाली आहे, त्याच्या हक्काची पायमल्ली झाली आहे; कारण तो स्वेच्छेने शून्याच्या मागे लागला.
12ह्यास्तव मी एफ्राइमास कसरीसारखा व यहूदाच्या घराण्यास किडीसारखा झालो आहे.
13एफ्राइमाने आपला रोग पाहिला व यहूदाने आपली जखम पाहिली तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे गेला व यारेब राजास त्याने निरोप पाठवला; पण त्याला तुम्हांला बरे करता येणार नाही, तुमची जखम बरी करता येणार नाही.
14कारण मी एफ्राइमास सिंहासारखा व यहूदाच्या घराण्यास तरुण सिंहासारखा होईन; मी फाडून टाकीन आणि परत जाईन, तो मीच; मी त्याला घेऊन जाईन, आणि सोडवणारा कोणी असणार नाही.
इस्राएलाच्या पश्चात्तापाचा खोटेपणा
15ते आपल्या दोषाचे फळ भोगून माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होईपर्यंत मी आपल्या स्थानी जाऊन राहीन; ते आपल्या संकटसमयी माझा धावा कळकळीने करून म्हणतील :
सध्या निवडलेले:
होशेय 5: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.