YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 11:20-40

इब्री 11:20-40 MARVBSI

इसहाकाने याकोबाला व एसावाला पुढे होणार्‍या गोष्टींविषयीसुद्धा विश्वासाने आशीर्वाद दिला. याकोबाने मरतेवेळेस योसेफाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला; आणि ‘आपल्या काठीच्या टोकावर टेकून देवाला नमन केले.’ योसेफाने मरतेवेळेस इस्राएलाच्या संतानाच्या निघून जाण्याचा उल्लेख विश्वासाने केला व आपल्या अस्थींविषयी आज्ञा केली. ‘मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापांनी विश्वासाने त्याला तीन महिने लपवून ठेवले,’ कारण ते मूल ‘सुंदर आहे असे त्यांनी पाहिले;’ व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही. ‘मोशे प्रौढ झाल्यावर’ त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. ‘ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे’ ही मिसर देशातील धनसंपत्तीपेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले; कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने मिसर देश सोडला; कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. त्याने ‘वल्हांडण सण’ व ‘रक्तसिंचन’ हे विधी विश्वासाने पाळले, ते अशा हेतूने की, प्रथमजन्मलेल्यांचा ‘नाश करणार्‍याने’ त्यांना शिवू नये. जसे कोरड्या भूमीवरून तसे ते विश्वासाने तांबड्या समुद्रातून पार गेले; मिसरी लोक तसेच करण्याचा प्रयत्न करत असता बुडून गेले. विश्वासाने यरीहोच्या गावकुसाभोवती सात दिवस फेर्‍या घालण्यात आल्यावर ते पडले. राहाब कसबिणीने स्नेहभावाने हेरांचा स्वीकार विश्वासाने केल्यामुळे अवज्ञा करणार्‍यांबरोबर तिचा नाश झाला नाही. आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल व संदेष्टे ह्यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. त्यांनी विश्वासाच्या द्वारे राज्ये जिंकली, नीतिमत्त्व आचरले, अभिवचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली, अग्नीची शक्ती नाहीशी केली; ते तलवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बळांचे सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये पळवली. स्त्रियांना त्यांची मृत माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली. आणखी कित्येकांनी आपणांस अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून खंडणी भरून मिळणारी सुटका न स्वीकारता हालहाल सोसले. आणि इतरांना टवाळ्या, मारहाण ह्यांचा आणि बंधने व कैद ह्यांचाही अनुभव आला. त्यांना दगडमार केला, मोहपाशात टाकले, करवतीने चिरले, ते तलवारीच्या धारेने मेले; ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत; ते लाचार, पीडित, त्रासलेले असे होते; त्यांना जग योग्य नव्हते; ते अरण्यांतून, डोंगरांतून, गुहांतून व जमिनीतल्या विवरांतून भटकत राहत असत. ह्या सर्वांबाबत त्यांच्या विश्वासाविषयी चांगली साक्ष दिली असताही त्यांना अभिवचनानुसार फलप्राप्ती झाली नाही; त्यांनी आपणावाचून पूर्ण होऊ नये म्हणून देवाने जे अधिक चांगले ते आपल्यासाठी पूर्वीच नेमले होते.