हबक्कूक 2
2
हबक्कूकला परमेश्वराचे उत्तर
1मी आपल्या पहार्यावर उभा राहीन, किल्ल्यावर पहारा करीन; तो माझ्याबरोबर काय बोलेल आणि माझ्या गार्हाण्याविषयी त्याला मला काय उत्तर देता येईल ते मी पाहीन.
2मग परमेश्वराने मला उत्तर दिले की, “हा दृष्टान्त लिहून काढ, पाट्यांवर ठळक लिही; म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे.
3कारण हा दृष्टान्त नेमलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करत आहे, तो फसवायचा नाही; त्याला विलंब लागला, तरी त्याची वाट पाहा; तो येईलच, त्याला विलंब लागायचा नाही.
4पाहा, तो गर्वाने फुगला आहे, त्याचा आत्मा त्याच्या ठायी सरळ नाही; नीतिमान तर आपल्या विश्वासाने1 वाचेल.
5शिवाय त्याचा द्राक्षारस दगा देणारा आहे; तो अहंकारी मनुष्य आहे, तो घरी टिकत नाही, त्याने अधोलोकाप्रमाणे आपली लालसा वाढवली आहे. तो मृत्यूसारखा अतृप्त आहे, तो सर्व राष्ट्रांना आपणाजवळ जमा करतो, सर्व लोकांना आपल्यानजीक एकत्र करतो.”
दुष्टांचा धिक्कार
6हे सर्व त्याला कवन, कूटवचन लावून बोलणार नाहीत काय? लोक म्हणतील, “आपला माल नव्हे त्याने जो आपली वृद्धी करतो व गहाणांचा बोजा आपणावर लावून घेतो, त्याला धिक्कार असो; असे कोठवर?”
7तुला चावणारे2 एकाएकी उठावणी करणार नाहीत काय? तुला छळणारे जागे होऊन तू त्यांची लूट होणार नाहीस काय?
8तू पुष्कळ राष्ट्रांना लुटले म्हणून सर्व अवशिष्ट लोक तुला लुटतील; माणसांचा रक्तपात आणि भूमीवर, शहरांवर व त्यांतील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम, ह्यामुळे असे होईल.
9विपत्तीच्या हातातून आपला बचाव व्हावा म्हणून आपले घरटे उंच ठिकाणी करावे, ह्या हेतूने जो आपल्या घराण्यासाठी अन्यायाने नफा मिळवतो त्याला धिक्कार असो.
10तू बहुत राष्ट्रांना नष्ट केल्यामुळे आपल्या घराण्यावर अप्रतिष्ठा आणली आहेस, आपल्या जिवाचा गुन्हेगार झाला आहेस.
11कारण भिंतीचा दगड ओरडेल, इमारतीच्या लाकडातील तुळई त्याला उत्तर देईल.
12जो रक्ताने नगर बांधतो, अधर्माने शहर स्थापतो त्याला धिक्कार असो!
13पाहा, लोकांच्या श्रमाची फलप्राप्ती अग्नीला भक्ष्य होते, राष्ट्रे व्यर्थ शिणतात, हे सेनाधीश परमेश्वर ह्याच्याकडून नव्हे काय?
14कारण जल समुद्राला व्यापून टाकते तशी पृथ्वी परमेश्वराच्या प्रतापाच्या ज्ञानाने भरेल.
15जो आपल्या शेजार्याला मद्य पाजतो त्याला धिक्कार असो! तू त्याची नग्नता पाहावी म्हणून आपला संतप्त क्रोध त्यात मिसळून त्याला मस्त करतोस.
16सन्मानाने नव्हे तर अप्रतिष्ठेने तुझी तृप्ती झाली, तर तूही पी आणि बेसुंत्यांसारखा हो; परमेश्वराच्या उजव्या हातचा प्याला तुझ्याकडे वळेल, तुझ्या वैभवाची अप्रतिष्ठा होईल.
17लबानोनावर केलेला जुलूम तुला घेरील, जनावरांचा झालेला नाश तुला घाबरवील; माणसांचा रक्तपात आणि भूमीवर, शहरांवर व त्यांतील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम ह्यामुळे असे होईल.
18कोरीव मूर्ती ही मूर्तिकाराने कोरून केली ह्यात काय लाभ? खोटा कौल देणार्या ओतीव मूर्तीवर मूर्तिकार, मुक्या मूर्ती करणारा, श्रद्धा ठेवतो ह्यात काय लाभ?
19जो काष्ठास म्हणतो, ‘जागे हो’; मुक्या पाषाणास म्हणतो, ‘ऊठ!’ त्याला धिक्कार असो. त्याला काही शिकवता येईल काय? पाहा, ती मूर्ती सोन्यारुप्याने मढवली आहे, पण आत पाहावे तर जिवाचा पत्ता नाही.
20परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे; सर्व धरित्री त्याच्यापुढे स्तब्ध राहो.
सध्या निवडलेले:
हबक्कूक 2: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.