YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 41:25-40

उत्पत्ती 41:25-40 MARVBSI

योसेफ फारोला म्हणाला, “फारोला पडलेले स्वप्न एकच आहे; आपण काय करणार आहोत हे देवाने फारोला कळवले आहे. त्या सात चांगल्या गाई म्हणजे सात वर्षे, आणि सात चांगली कणसे म्हणजेही सात वर्षे; स्वप्न एकच आहे. मागाहून वर आलेल्या सात रोड व कुरूप गाई आणि सुकलेली व पूर्वेच्या वार्‍याने करपलेली सात कणसे ही दुष्काळाची सात वर्षे होत. मी फारोला कळवलेच आहे की देवाने आपण काय करणार हे फारोला दाखवले आहे. पाहा, अवघ्या मिसर देशात मोठ्या सुकाळाची सात वर्षे येत आहेत; आणि त्यानंतर दुष्काळाची सात वर्षे येतील; तेव्हा मिसर देशाला सगळ्या सुकाळाचा विसर पडेल, आणि दुष्काळ देशाला नष्ट करील. पुढे जो दुष्काळ पडणार त्यामुळे पूर्वी सुकाळ होता की नव्हता त्याचे स्मरणही राहणार नाही, एवढा भारी तो होणार. हे स्वप्न फारोला दोनदा पडले; ह्याचे कारण हेच की हे देवाने ठरवले आहे व देव ते लवकरच घडवून आणणार. तर आता फारोने कोणी एखादा चतुर व शहाणा पुरुष पाहून त्याला मिसर देशावर नेमावे; आणि फारोने हे करून देशावर अधिकारी नेमावे आणि सुकाळाच्या सात वर्षांत मिसर देशातील उत्पन्नाचा पंचमांश घ्यावा. ह्या येणार्‍या सुकाळाच्या वर्षांत सर्व प्रकारची अन्नसामग्री गोळा करावी आणि नगरोनगरी अन्नाच्या पुरवठ्यासाठी धान्याचा साठा फारोच्या ताब्यात ठेवावा. मिसर देशावर दुष्काळाची जी सात वर्षे येणार त्यांसाठी ही अन्नाची बेगमी होईल, म्हणजे दुष्काळाने देशाचा नाश होणार नाही.” हे फारोला व त्याच्या सर्व सेवकांना अगदी पटले. तेव्हा फारो आपल्या सेवकांना म्हणाला, “ज्याच्या ठायी देवाचा आत्मा आहे असा ह्या पुरुषासारखा आपल्याला दुसरा कोणी आढळेल काय?” मग फारो योसेफाला म्हणाला, “देवाने तुला ह्या सर्व गोष्टींचे ज्ञान करून दिले आहे त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. तर तू माझ्या घराचा अधिकारी हो; तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल, राजासनापुरताच काय तो मी तुझ्यापेक्षा मोठा.”