YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 41:1-14

उत्पत्ती 41:1-14 MARVBSI

पुरी दोन वर्षे लोटल्यावर फारोला स्वप्न पडले की आपण नील नदीच्या काठी उभे असताना सात सुंदर व धष्टपुष्ट गाई नदीतून बाहेर निघून लव्हाळ्यात चरू लागल्या. पुढे पाहतो तर त्यांच्यामागून कुरूप व दुबळ्या अशा आणखी सात गाई नदीतून निघाल्या आणि त्या पहिल्या गाईंजवळ नदीकाठी उभ्या राहिल्या. तेव्हा कुरूप व दुबळ्या गाईंनी त्या सुंदर व धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकले. त्यानंतर फारो जागा झाला. मग तो पुन: झोपी गेला असता त्याला दुसर्‍यांदा स्वप्न पडले की, एकाच ताटाला सात चांगली भरदार कणसे आली; आणि पाहा, त्यांच्यामागून खुरटलेली व पूर्वेच्या वार्‍याने करपलेली अशी सात कणसे निघाली. त्या खुरटलेल्या कणसांनी ती सात चांगली भरदार कणसे गिळून टाकली. मग फारो जागा झाला आणि पाहतो तर ते स्वप्न होते. सकाळी फारोचे चित्त अस्वस्थ झाले, आणि त्याने मिसर देशातील अवघे ज्योतिषी व पंडित ह्यांना बोलावले; फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली, पण फारोला त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नव्हता. तेव्हा प्यालेबरदारांचा नायक फारोला म्हणाला, “माझ्या अपराधांची आज मला आठवण होत आहे. फारोची आपल्या सेवकांवर इतराजी झाली तेव्हा त्याने मला व आचार्‍यांच्या नायकाला गारद्यांच्या सरदाराच्या वाड्यात कैदेत ठेवले होते. तेव्हा एकाच रात्री आम्हा दोघांना, मला व त्याला लागू पडतील अशा अर्थाची स्वप्ने पडली; तेथे त्या गारद्यांच्या सरदाराचा दास कोणी इब्री तरुण पुरुष आमच्याबरोबर होता, त्याला आम्ही आपापली स्वप्ने सांगितली व त्याने त्यांचा अर्थ आम्हांला सांगितला; त्याने प्रत्येकाच्या स्वप्नानुसार अर्थ सांगितला. त्याने आम्हांला अर्थ सांगितला तसेच घडून आले; मला आपल्या हुद्द्यावर पूर्ववत रुजू केले आणि त्याला फाशी दिले.” मग फारोने योसेफाला बोलावणे पाठवले, तेव्हा त्याला तत्क्षणी बंदिखान्यातून बाहेर आणले; आणि तो आपले मुंडन करून व वस्त्रे बदलून फारोपुढे आला.