अब्राहामाने दुसरी बायको केली, तिचे नाव कटूरा. तिला त्याच्यापासून जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूह हे मुलगे झाले. यक्षानास शबा व ददान हे झाले; आणि ददानाचे मुलगे अश्शूरी, लटूशी व लऊमी हे होते. मिद्यानाचे मुलगे एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा हे होते. हा सर्व कटूरेचा वंश. अब्राहामाने आपले सर्वस्व इसहाकाला दिले. पण अब्राहामाच्या उपपत्नी होत्या. त्यांच्या मुलांना त्याने देणग्या देऊन आपल्या हयातीतच आपला मुलगा इसहाक ह्याच्यापासून वेगळे करून पूर्वेकडे पूर्वदेशी लावून दिले. अब्राहामाच्या आयुष्याची वर्षे एकशे पंचाहत्तर होती. अब्राहाम पुर्या वयाचा चांगला म्हातारा होऊन मरण पावला व आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला. मग त्याचे मुलगे इसहाक व इश्माएल ह्यांनी त्याला एफ्रोन बिन सोहर हित्ती ह्याच्या मम्रेसमोरील शेतातल्या मकपेलाच्या गुहेत पुरले. हे शेत अब्राहामाने हेथींपासून विकत घेतले होते, आणि तेथेच अब्राहाम व त्याची बायको सारा ह्यांना पुरले. अब्राहामाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा इसहाक ह्याला देवाने आशीर्वादित केले; इसहाक हा त्या वेळी लहाय-रोई विहिरीजवळ राहत असे. सारेची मिसरी दासी हागार हिच्यापासून अब्राहामाला इश्माएल नावाचा मुलगा झाला, त्याची वंशावळ ही : इश्माएलच्या मुलांची नावे त्यांच्या वंशाप्रमाणे ही होत : नबायोथ हा इश्माएलचा पहिला मुलगा आणि केदार, अदबील, मिबसाम, मिश्मा, दुमा, मस्सा, हदद, तेमा, यतूर, नापीश व केदमा हे इश्माएलचे मुलगे; त्यांच्या गावांवरून व त्यांच्या गोटांवरून त्यांना पडलेली ही नावे. हे आपापल्या वंशाचे बारा सरदार होते. इश्माएलच्या आयुष्याची वर्षे एकशे सदतीस झाल्यावर तो मरण पावला व आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला. त्याचे वंशज हवीलापासून शूर देशापर्यंत वस्ती करून राहिले; हा देश मिसरासमोर असून अश्शूराकडे जाताना लागतो; ह्याप्रमाणे तो आपल्या भाऊबंदांच्या देखत पूर्वेस जाऊन राहिला.
उत्पत्ती 25 वाचा
ऐका उत्पत्ती 25
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 25:1-18
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ