YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 21:22-34

उत्पत्ती 21:22-34 MARVBSI

त्या सुमारास असे झाले की अबीमलेख व त्याचा सेनापती पीकोल हे अब्राहामाला म्हणाले, “जे काही तुम्ही करता त्यात देव तुमच्याबरोबर आहे. तर तुम्ही मला आता येथे देवाच्या शपथेवर असे म्हणा : मी तुमच्याशी, तुमच्या पुत्रपौत्रांशी कपट करणार नाही, आणि जशी तुम्ही माझ्यावर कृपा केली तशी मी तुमच्यावर व ज्या देशात मी उपरा होऊन राहिलो आहे त्या ह्या देशावर कृपा करीन.” अब्राहाम म्हणाला, “बरे, अशी शपथ मी वाहतो.” मग अबीमलेखाच्या चाकरांनी पाण्याची एक विहीर बळकावली होती त्याबद्दल अब्राहामाने अबीमलेखाला दोष लावला. अबीमलेख म्हणाला, “हे कोणी केले हे मला ठाऊक नाही; तुम्ही मला हे कधी सांगितले नव्हते; आणि मीही हे ऐकले नव्हते, आजच ऐकले.” मग अब्राहामाने मेंढरे व बैल आणून अबीमलेखाला दिले आणि त्या दोघांनी एकमेकांत करार केला. अब्राहामाने कळपातील कोकरांतल्या सात माद्या वेगळ्या काढून ठेवल्या. तेव्हा अबीमलेख अब्राहामास म्हणाला, “तुम्ही ही सात कोकरे वेगळी काढून ठेवली ती कशाला?” तो म्हणाला, “तुम्ही ही सात कोकरे माझ्या हातून घ्यावी, म्हणजे ही विहीर मी खणली आहे अशी माझ्या बाजूने साक्ष पटेल.” ह्यावरून त्या ठिकाणाचे नाव बैर-शेबा (शपथेची विहीर) असे पडले. कारण तेथे त्या दोघांनी शपथ वाहिली. बैर-शेबा येथे त्यांनी करार केल्यावर अबीमलेख व त्याचा सेनापती पीकोल हे निघून पलिष्ट्यांच्या देशात परत गेले. मग अब्राहामाने बैर-शेबा येथे एशेल वृक्ष लावला आणि तेथे सनातन देव परमेश्वर ह्याच्या नावाने प्रार्थना केली. अब्राहाम हा पलिष्ट्यांच्या देशात पुष्कळ दिवस उपरा म्हणून राहिला.