YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 2:7-18

उत्पत्ती 2:7-18 MARVBSI

मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यांत जीवनाचा श्वास फुंकला; तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. परमेश्वर देवाने पूर्वेला एदेनात बाग लावली आणि तिच्यात आपण घडवलेल्या मनुष्याला ठेवले. परमेश्वर देवाने दिसण्यात सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातींची झाडे, बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड, आणि बर्‍यावाइटाचे ज्ञान करून देणारे झाड ही जमिनीतून उगववली. बागेला पाणी देण्यासाठी एदेनात एक नदी उगम पावली; तेथून ती निघून तिचे फाटे फुटून चार नद्या झाल्या. पहिलीचे नाव पीशोन; ही सगळ्या हवीला देशाला वेढते; तेथे सोने सापडते; ह्या देशाचे सोने उत्तम असून येथे मोती व गोमेद सापडतात. दुसर्‍या नदीचे नाव गीहोन; ही सगळ्या कूश देशाला वेढते. तिसर्‍या नदीचे नाव हिद्दकेल; ही अश्शूरच्या पूर्वेला वाहते. चौथ्या नदीचे नाव फरात. परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करायला ठेवले. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की, “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बर्‍यावाइटाचे ज्ञान करून देणार्‍या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” मग परमेश्वर देव बोलला, “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही; तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करीन.”