YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 2:7-18

उत्पत्ती 2:7-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यांत जीवनाचा श्वास फुंकला; तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. परमेश्वर देवाने पूर्वेला एदेनात बाग लावली आणि तिच्यात आपण घडवलेल्या मनुष्याला ठेवले. परमेश्वर देवाने दिसण्यात सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातींची झाडे, बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड, आणि बर्‍यावाइटाचे ज्ञान करून देणारे झाड ही जमिनीतून उगववली. बागेला पाणी देण्यासाठी एदेनात एक नदी उगम पावली; तेथून ती निघून तिचे फाटे फुटून चार नद्या झाल्या. पहिलीचे नाव पीशोन; ही सगळ्या हवीला देशाला वेढते; तेथे सोने सापडते; ह्या देशाचे सोने उत्तम असून येथे मोती व गोमेद सापडतात. दुसर्‍या नदीचे नाव गीहोन; ही सगळ्या कूश देशाला वेढते. तिसर्‍या नदीचे नाव हिद्दकेल; ही अश्शूरच्या पूर्वेला वाहते. चौथ्या नदीचे नाव फरात. परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करायला ठेवले. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की, “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बर्‍यावाइटाचे ज्ञान करून देणार्‍या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” मग परमेश्वर देव बोलला, “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही; तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करीन.”

सामायिक करा
उत्पत्ती 2 वाचा

उत्पत्ती 2:7-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जिवंत प्राणी झाला. परमेश्वर देवाने पूर्वेकडे एदेनात एक बाग लावली आणि त्या बागेत आपण घडविलेल्या मनुष्यास ठेवले. परमेश्वर देवाने दिसण्यास सुंदर आणि खाण्यास चांगले फळ देणारे प्रत्येक झाड जमिनीतून उगवले. त्यामध्ये बागेच्या मध्यभागी असलेले जीवनाचे झाड, आणि बऱ्यावाईटाचे ज्ञान देणारे झाड यांचाही समावेश होता. बागेला पाणी देण्यासाठी एदेनातून एक नदी निघाली. तेथून ती विभागली आणि तिच्या चार नद्या झाल्या. पहिल्या नदीचे नाव पीशोन. ही संपूर्ण हवीला देशामधून वाहते, तेथे सोने सापडते. त्या देशाचे सोने चांगल्या प्रतीचे असून तेथे मोती व गोमेद रत्नेसुद्धा सापडतात. दुसऱ्या नदीचे नाव गीहोन आहे. ही सगळ्या कूश देशामधून वाहते. तिसऱ्या नदीचे नाव टायग्रीस. ही अश्शूर देशाच्या पूर्वेस वाहत जाते. चौथ्या नदीचे नाव फरात असे आहे. परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत तिची मशागत करण्यासाठी व बागेची काळजी घेण्यासाठी ठेवले. परमेश्वर देवाने मनुष्यास आज्ञा दिली; तो म्हणाला, “बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तू खुशाल खात जा; परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ तू खाऊ नये, कारण तू ज्या दिवशी त्या झाडाचे फळ खाशील त्याच दिवशी तू नक्कीच मरशील.” नंतर परमेश्वर देव बोलला, “मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी सुसंगत मदतनीस निर्माण करीन.”

सामायिक करा
उत्पत्ती 2 वाचा

उत्पत्ती 2:7-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मग याहवेह परमेश्वराने जमिनीवरील धूळ घेऊन तिचा मनुष्य घडविला व त्याच्या नाकपुड्यांत त्यांनी जीवन देणारा श्वास फुंकला; तेव्हा मनुष्य सजीव प्राणी झाला. नंतर याहवेह परमेश्वराने पूर्वेकडे, एदेनमध्ये एक बाग लावली आणि त्या बागेत आपण घडविलेल्या मनुष्याला ठेवले. याहवेह परमेश्वराने सर्व प्रकारची झाडे जमिनीतून उगवली—डोळ्यांना आनंद देणारे व खाण्यास उत्तम असलेले जीवनवृक्ष आणि बर्‍यावाईटाचे ज्ञान करून देणारा वृक्ष हे देखील बागेच्या मध्यभागी लावले. बागेला पाणी देण्यासाठी एदेनात एक नदी उगम पावली व वाहू लागली आणि ती विभागून तिच्या चार नद्या झाल्या पहिल्या नदीचे नाव पीशोन असून ती सोने असलेल्या हवीला प्रदेशाला वेढा घालून वाहते. त्या प्रदेशातील सोने उत्तम प्रतीचे असून तिथे मोती व गोमेद रत्नेही सापडतात. दुसर्‍या नदीचे नाव गीहोन असून ती कूशच्या सर्व प्रदेशाभोवती वाहत जाते. तिसर्‍या नदीचे नाव हिद्दकेल असून ती अश्शूरच्या पूर्वेस वाहत जाते; आणि चौथ्या नदीचे नाव फरात असे आहे. याहवेह परमेश्वराने मनुष्याला एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेवले. याहवेह परमेश्वराने मनुष्याला आज्ञा केली, “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ तू खुशाल खा; परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणार्‍या वृक्षाचे फळ मात्र तू खाऊ नकोस, कारण ज्या दिवशी तू ते फळ खाशील त्या दिवशी तू निश्चित मरशील.” याहवेह परमेश्वर म्हणाले, “मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी एक योग्य मदतनीस निर्माण करेन.”

सामायिक करा
उत्पत्ती 2 वाचा