YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 18:20-31

उत्पत्ती 18:20-31 MARVBSI

मग परमेश्वर म्हणाला, “सदोम व गमोरा ह्यांच्याविषयीची ओरड फारच झाली आहे व खरोखर त्यांचे पाप फार भारी आहे, म्हणून त्यांच्याविषयीची जी ओरड माझ्या कानी आली आहे तशीच त्यांची करणी आहे की काय हे पाहायला मी खाली जातो; तसे नसेल तर मला कळून येईल.” तेथून ते पुरुष वळून सदोमाकडे चालते झाले; पण अब्राहाम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला. अब्राहाम जवळ जाऊन म्हणाला, “तू दुर्जनांबरोबर नीतिमानांचाही संहार खरेच करणार काय? त्या नगरात कदाचित पन्नास नीतिमान असतील तर त्यांचा तू खरेच संहार करणार काय? त्याच्यातल्या पन्नास नीतिमानांसाठी त्या नगराची तू गय करणार नाहीस काय? ह्या प्रकारची कृती तुझ्यापासून दूर राहो. ज्यामुळे नीतिमानाची आणि दुष्टाची सारखीच गत होईल असा दुर्जनाबरोबर नीतिमानाचा वध करणे तुझ्यापासून दूर राहो; सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय?” परमेश्वर म्हणाला, “मला सदोम नगरात पन्नास नीतिमान आढळले तर त्यांच्यासाठी मी त्या सगळ्या स्थलाची गय करीन.” अब्राहाम म्हणाला, “पाहा, मी केवळ धूळ व राख असून प्रभूशी बोलण्याचे मी धाडस करत आहे; कदाचित पन्नासात पाच कमी नीतिमान असतील तर पाच कमी म्हणून तू सर्व नगराचा नाश करशील काय?” तेव्हा तो म्हणाला, “मला तेथे पंचेचाळीस आढळले तर मी त्याचा नाश करणार नाही.” त्याने पुन्हा म्हटले, “तेथे कदाचित चाळीसच आढळले तर?” तो म्हणाला, “त्या चाळिसांकरता मी तसे करणार नाही.” मग तो म्हणाला, “मी बोलतो ह्याचा प्रभूला राग न यावा; तेथे कदाचित तीसच आढळले तर?” तो म्हणाला, “मला तीसच आढळले तर मी तसे करणार नाही.” मग तो म्हणाला, “पाहा, मी प्रभूशी बोलण्याचे धाडस करत आहे; तेथे कदाचित वीसच आढळले तर?” तो म्हणाला, “त्या विसांकरता मी त्याचा नाश करणार नाही.”