YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 18:20-31

उत्पत्ती 18:20-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग परमेश्वर म्हणाला, “सदोम व गमोरा ह्यांच्याविषयीची ओरड फारच झाली आहे व खरोखर त्यांचे पाप फार भारी आहे, म्हणून त्यांच्याविषयीची जी ओरड माझ्या कानी आली आहे तशीच त्यांची करणी आहे की काय हे पाहायला मी खाली जातो; तसे नसेल तर मला कळून येईल.” तेथून ते पुरुष वळून सदोमाकडे चालते झाले; पण अब्राहाम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला. अब्राहाम जवळ जाऊन म्हणाला, “तू दुर्जनांबरोबर नीतिमानांचाही संहार खरेच करणार काय? त्या नगरात कदाचित पन्नास नीतिमान असतील तर त्यांचा तू खरेच संहार करणार काय? त्याच्यातल्या पन्नास नीतिमानांसाठी त्या नगराची तू गय करणार नाहीस काय? ह्या प्रकारची कृती तुझ्यापासून दूर राहो. ज्यामुळे नीतिमानाची आणि दुष्टाची सारखीच गत होईल असा दुर्जनाबरोबर नीतिमानाचा वध करणे तुझ्यापासून दूर राहो; सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय?” परमेश्वर म्हणाला, “मला सदोम नगरात पन्नास नीतिमान आढळले तर त्यांच्यासाठी मी त्या सगळ्या स्थलाची गय करीन.” अब्राहाम म्हणाला, “पाहा, मी केवळ धूळ व राख असून प्रभूशी बोलण्याचे मी धाडस करत आहे; कदाचित पन्नासात पाच कमी नीतिमान असतील तर पाच कमी म्हणून तू सर्व नगराचा नाश करशील काय?” तेव्हा तो म्हणाला, “मला तेथे पंचेचाळीस आढळले तर मी त्याचा नाश करणार नाही.” त्याने पुन्हा म्हटले, “तेथे कदाचित चाळीसच आढळले तर?” तो म्हणाला, “त्या चाळिसांकरता मी तसे करणार नाही.” मग तो म्हणाला, “मी बोलतो ह्याचा प्रभूला राग न यावा; तेथे कदाचित तीसच आढळले तर?” तो म्हणाला, “मला तीसच आढळले तर मी तसे करणार नाही.” मग तो म्हणाला, “पाहा, मी प्रभूशी बोलण्याचे धाडस करत आहे; तेथे कदाचित वीसच आढळले तर?” तो म्हणाला, “त्या विसांकरता मी त्याचा नाश करणार नाही.”

सामायिक करा
उत्पत्ती 18 वाचा

उत्पत्ती 18:20-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग परमेश्वर म्हणाला, “सदोम व गमोरा यांच्या दुष्टाईचा आक्रोश मोठा आहे, आणि त्यांचे पाप फार गंभीर असल्या कारणाने, मी आता तेथे खाली जाईन आणि त्यांच्या पातकाचा जो बोभाटा माझ्या कानी आला आहे त्याप्रमाणेच त्यांची करणी आहे का हे पाहीन. तसे नसेल तर मला समजेल.” मग ती माणसे तेथून वळून आणि सदोम नगराकडे गेली, परंतु अब्राहाम परमेश्वरापुढे तसाच उभा राहिला. मग अब्राहाम परमेश्वराजवळ जाऊन म्हणाला, “तू दुष्टाबरोबर नीतिमानांचाही नाश करशील काय? कदाचित त्या नगरात पन्नास नीतिमान लोक असतील तर त्या नगराचा तू नाश करणार काय? तू त्या नगरात राहणाऱ्या पन्नास नीतिमान लोकांसाठी नगराचा बचाव करणार नाहीस काय? असे करणे तुझ्यापासून दूर असो. दुष्टाबरोबर नीतिमानाला मारणे म्हणजे नीतिमानाला दुष्टासारखे वागवणे हे तुझ्यापासून दूर असो! जो तू संपूर्ण पृथ्वीचा न्यायाधीश आहेस, तो तू योग्य न्याय करणार नाहीस काय?” परमेश्वर म्हणाला, “या सदोम शहरात मला पन्नास नीतिमान लोक सापडले तरीही त्यांच्यासाठी मी संपूर्ण स्थळाचा बचाव करीन.” अब्राहामाने उत्तर देऊन म्हटले, “पाहा मी केवळ धूळ व राख आहे, तरी प्रभूजवळ बोलायला धजतो! समजा जर पाच लोक कमी असतील म्हणजे फक्त पंचेचाळीसच चांगले लोक असतील तर? त्या पाच कमी असलेल्या लोकांकरता तू सर्व नगराचा नाश करशील काय?” आणि तो म्हणाला, “मला पंचेचाळीस लोक चांगले आढळले तर मी नगराचा नाश करणार नाही.” पुन्हा तो परमेश्वरास म्हणाला, “आणि जर तेथे तुला चाळीसच चांगले लोक आढळले तर? संपूर्ण शहराचा तू नाश करशील काय?” परमेश्वर म्हणाला, “जर मला चाळीसच लोक चांगले आढळले तरीही, मी शहराचा नाश करणार नाही.” तो म्हणाला, “प्रभू, कृपा करून तुला राग न यावा म्हणजे मी बोलेन. तेथे फक्त तीसच मिळाले तर?” परमेश्वर म्हणाला, “जर तीस चांगले लोक असतील तरीही मी तसे करणार नाही.” तो म्हणाला, “मी प्रभूशी बोलायला धजतो! समजा तेथे कदचित वीसच मिळाले तर?” परमेश्वराने उत्तर दिले, “त्या वीसांकरताही मी नगराचा नाश करणार नाही.”

सामायिक करा
उत्पत्ती 18 वाचा