कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, “नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे.” नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरवण्यात येत नाही हे उघड आहे; कारण “नीतिमान विश्वासाने जगेल.” नियमशास्त्र तर विश्वासाचे नव्हे; परंतु “जो त्यातील कृत्ये आचरतो तो त्यांच्या योगे जगेल.” आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले; “जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे” असा शास्त्रलेख आहे; ह्यात उद्देश हा की, अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा; म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. बंधुजनहो, मी व्यावहारिक दृष्टीने बोलतो; माणसांनी देखील कायम केलेला करार कोणी रद्द करत नाही किंवा त्यात भर घालत नाही. अब्राहामाला व त्याच्या संतानाला ती अभिवचने सांगितली होती. “संतानांना” असे पुष्कळ जणांसंबंधाने तो म्हणत नाही; तर “तुझ्या संतानाला” असे एकाविषयी तो म्हणत आहे, आणि तो एक ख्रिस्त आहे. मी असे म्हणतो की, देवाने अगोदरच [ख्रिस्ताच्या ठायी] कायम केलेला करार चारशेतीस वर्षांनंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे संपुष्टात येऊन त्यामुळे अभिवचन रद्द होत नाही. कारण वतन जर नियमशास्त्राने प्राप्त होते, तर ते ह्यापुढे अभिवचनाने होणार नाही; पण अब्राहामाला देवाने ते कृपेने अभिवचनाच्या द्वारे दिले आहे. तर मग नियमशास्त्र कशासाठी? ज्या संतानाला वचन दिले ते येईपर्यंत नियमशास्त्र हे उल्लंघनांमुळे लावून देण्यात आले; ते मध्यस्थाच्या हस्ते देवदूतांच्या द्वारे नेमून देण्यात आले. मध्यस्थ हा एकाचा नसतो; आणि देव तर एक आहे. तर मग नियमशास्त्र देवाच्या वचनांविरुद्ध आहे काय? कधीच नाही. कारण जीवन देण्यास समर्थ असे नियमशास्त्र देण्यात आले असते तर नीतिमत्त्व खरोखरच नियमशास्त्राने प्राप्त झाले असते. तरी शास्त्राने सर्वांना पापामध्ये कोंडून ठेवले आहे; ह्यात उद्देश हा की, विश्वास ठेवणार्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यात यावे. हा जो विश्वास प्रकट होणार होता तो येण्यापूर्वी त्यासाठी आपण कोंडलेले असता आपल्याला नियमशास्त्राधीन असे रखवालीत ठेवले होते. ह्यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरवले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहचवणारे बालरक्षक होते. परंतु आता विश्वासाचे आगमन झाले आहे म्हणून आपण ह्यापुढे बालरक्षकाच्या अधीन नाही. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. कारण तुमच्यामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. यहूदी व हेल्लेणी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री, हा भेदच नाही; कारण तुम्ही सर्व जण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहात; आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहामाचे संतान आणि अभिवचनानुसार वारस आहात.
गलतीकरांस पत्र 3 वाचा
ऐका गलतीकरांस पत्र 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गलतीकरांस पत्र 3:10-29
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ