यहेज्केल 7
7
अंत आला आहे
1आणखी परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले :
2“प्रभू परमेश्वर इस्राएल देशाला म्हणतो, हे मानवपुत्रा, अंत आला आहे, देशाचा चोहो बाजूंनी अंत आला आहे.
3आता तुझा अंत आला आहे; मी आपला संताप तुझ्यावर भडकवीन, तुझ्या करणीप्रमाणे तुझा न्याय करीन व तुझ्या सर्व अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुला देईन.
4मी तुझ्यावर कृपादृष्टी करणार नाही, मी गय करणार नाही; तर तुझ्या करणीचे प्रतिफळ तुला देईन; तुझ्या अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुझ्यामध्ये दिसेल तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.
5प्रभू परमेश्वर म्हणतो : पाहा, विपत्ती, अपूर्व विपत्ती येत आहे.
6अंत आला आहे, आला आहे! तो तुझ्यासाठी जागृत झाला आहे; पाहा, तो येत आहे.
7देशातल्या रहिवाशा, तुझी घडी भरली आहे; काळ आला आहे; दिवस समीप आला आहे; डोंगरावर हर्ष नव्हे तर धुमाकूळ होणार आहे.
8आता मी आपल्या संतप्त क्रोधाचा तुझ्यावर सत्वर वर्षाव करीन, मी आपल्या क्रोधाची परिपूर्ती तुझ्यावर करीन व तुझ्या आचरणाप्रमाणे तुझा न्याय करीन व तुझ्या सर्व अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुला देईन.
9मी तुझ्यावर कृपादृष्टी करणार नाही; मी तुझी गय करणार नाही; तर तुझ्या आचरणाचे फळ तुला देईन, तुझ्या अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुला देईन; तेव्हा तुला समजेल की मी परमेश्वर तुला मारत आहे.
10पाहा, तो दिवस! पाहा, तो येत आहे! तुझा शिक्षारूप रोपा उगवला आहे, तो फोफावून त्याचा दंड बनला आहे, तो गर्वाने फुलला आहे.
11बलात्कार हा शासनदंड होऊन बसला आहे; त्या लोकांतला कोणीही, त्यांच्या समूहापैकी कोणीही, त्यांच्या धनातले काहीही उरणार नाही; त्यांची काही प्रतिष्ठा राहणार नाही.
12समय आला आहे, दिवस समीप आला आहे; विकत घेणारा आनंद न करो, विकणारा खेद न पावो; कारण त्या सर्व समूहावर क्रोध येत आहे.
13विकणारा जिवंत राहिला तरी तो विकलेल्या भूमीला परत जाणार नाही, कारण हे भाकीत त्या सर्व समूहाविषयीचे आहे, त्यातले काहीही चुकणार नाही; कोणीही आपल्या अधर्माने आपल्या जीवितास बळकटी आणणार नाही.
14ते कर्णा वाजवतात, सर्व तयारी करतात, तरी कोणी युद्धास पुढे सरसावत नाहीत; कारण त्या समूहावर माझा कोप झाला आहे.
15बाहेर तलवार, आत मरी व दुष्काळ; शेतात असलेला तलवारीने मरेल, नगरात असलेल्यास दुष्काळ व मरी ग्रासून टाकतील;
16त्यांतले काही निभावतील ते निभावतील, पण ते सगळे खोर्यातल्या पारव्यांप्रमाणे डोंगरावर आपल्या अधर्मामुळे घुमत राहतील.
17सर्वांचे हात ढिले पडतील; त्यांच्या गुडघ्यांचे पाणी होईल.
18ते कंबरेला गोणपाट गुंडाळतील, दरारा त्यांना व्यापील; त्या सर्वांच्या मुखावर लज्जा असेल व सर्वांची डोकी भादरण्यात येतील.
19ते आपले रुपे रस्त्यांवर फेकून देतील, त्यांना आपले सोने अमंगळ वाटेल; परमेश्वराच्या कोपाच्या दिवशी त्यांच्या सोन्यारुप्याने त्यांचा बचाव होणार नाही; त्यापासून त्यांच्या जिवाची तृप्ती होणार नाही, त्यांचे पोट भरणार नाही, कारण त्यांनी त्यामुळे ठोकर खाऊन अधर्म केला आहे.
20त्यांनी त्यांची केलेली भूषणे दिमाख दाखवण्यासाठी वापरली; त्यांनी त्याच्या अमंगळ मूर्ती व तिरस्करणीय वस्तू आपणांसाठी बनवल्या; म्हणून ते त्यांना अमंगळ वस्तूसमान वाटावे असे मी केले आहे.
21ते मी परदेशीयांना भक्ष्य म्हणून देईन; ते जगातील दुष्टांना लूट म्हणून देईन, ते ते भ्रष्ट करतील.
22मी आपले तोंड त्यांच्यापासून फिरवीन म्हणजे ते लोक माझे भांडार भ्रष्ट करतील; लुटारू त्यात शिरून ते भ्रष्ट करतील.
23बेडी तयार करा, कारण देश रक्तपाताच्या गुन्ह्यांनी भरला आहे, नगर बलात्काराने भरले आहे.
24ह्यास्तव मी परराष्ट्रांतले अधमाधम जन आणीन; ते त्यांची घरे हस्तगत करतील, मी जबरदस्तांचा ताठा मोडीन; त्यांची पवित्र स्थाने भ्रष्ट होतील.
25नाश येत आहे; ते शांती शोधतील, पण ती मुळी नसणार.
26नाशावर नाश येईल, अवईवर अवई उठेल; ते संदेष्ट्यांना दृष्टान्त पाहायला सांगतील, पण याजकांचे नियमशास्त्रज्ञान व वडिलांचे मसलत देण्याचे सामर्थ्य ही नष्ट होतील.
27राजा शोक करील, सरदार दरार्याने व्याप्त होईल, देशातील लोकांचे हात थरथरतील. मी त्यांच्या आचाराप्रमाणे त्यांच्याशी वर्तन करीन, त्यांच्या गुणदोषांप्रमाणे त्यांचा न्याय करीन; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.”
सध्या निवडलेले:
यहेज्केल 7: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.