YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 46

46
1प्रभू परमेश्वर म्हणतो, आतील अंगणाचे पूर्वाभिमुख असलेले द्वार कामाचे सहा दिवस बंद असावे; शब्बाथ दिवशी ते उघडे ठेवावे; तसेच चंद्रदर्शनाच्या दिवशीही ते उघडे ठेवावे.
2अधिपतीने बाहेरून दरवाजाच्या देवडीकडे जाणार्‍या मार्गाने यावे; त्याने दरवाजाच्या बाह्यांनजीक उभे राहावे; याजकांनी त्याच्याकडील होमार्पण व शांत्यर्पणे करावीत; मग त्याने दरवाजाच्या उंबरठ्यावरून परमेश्वराला दंडवत घालून बाहेर जावे; हा दरवाजा संध्याकाळपर्यंत बंद करू नये.
3देशाच्या लोकांनी शब्बाथ दिवशी व चंद्रदर्शनी त्या दरवाजावरूनच परमेश्वराला दंडवत घालावे.
4अधिपतीने शब्बाथ दिवशी परमेश्वराला होमार्पण करायचे ते सहा निर्दोष कोकरे व एक निर्दोष एडका ह्यांचे असावे;
5दर एडक्यामागे एक एफा अन्नार्पण करावे व दर कोकरामागे यथाशक्ती अन्नार्पण करावे आणि प्रत्येक एफाबरोबर एक हिनभर तेल अर्पावे.
6चंद्रदर्शनाच्या दिवशी एक निर्दोष गोर्‍हा, सहा निर्दोष कोकरे व एक निर्दोष एडका ही अर्पण करावीत;
7दर गोर्‍ह्यामागे एक एफा व दर एडक्यामागे एक एफा अन्नार्पण सिद्ध करावे; दर कोकरामागे यथाशक्ती अन्नार्पण करावे, आणि प्रत्येक एफाबरोबर एक हिनभर तेल अर्पावे.
8अधिपतीने आत प्रवेश करताना दरवाजाच्या देवडीकडील मार्गाने यावे व त्याच मार्गाने बाहेर जावे.
9सणाच्या दिवशी देशाचे लोक परमेश्वरासमीप येतील तेव्हा त्यांच्यापैकी जो नमन करण्यास उत्तरद्वाराने आत येईल त्याने दक्षिणद्वाराने बाहेर जावे व दक्षिणद्वाराने जो आत येईल त्याने उत्तरद्वाराने बाहेर जावे; ज्या द्वाराने तो येईल त्याच द्वाराने त्याने परत जाऊ नये, तर नीट पुढे जावे.
10ते प्रवेश करीत असता अधिपतीने त्यांच्यात मिसळून आत यावे; ते बाहेर जातानाही त्याने त्यांच्याबरोबर जावे.
11उत्सवांच्या व सणांच्या दिवशी दर गोर्‍ह्यामागे एक एफा अन्नार्पण व दर एडक्यामागे एक एफा अन्नार्पण करावे; दर कोकरामागे यथाशक्ती अन्नार्पण करावे, आणि दर एफाबरोबर एक हिनभर तेल अर्पावे.
12अधिपती परमेश्वराला स्वसंतोषाचे अर्पण म्हणून होमबली किंवा शांत्यर्पणे करील तेव्हा त्याच्यासाठी पूर्वाभिमुख असलेले द्वार उघडावे, आणि शब्बाथ दिवसाच्याप्रमाणे त्याने होमार्पणे व शांत्यर्पणे करावीत; तो बाहेर निघून गेल्यावर द्वार कोणीतरी बंद करावे.
13परमेश्वराला रोज होमार्पण करण्यासाठी एक वर्षाचे निर्दोष असे कोकरू सिद्ध करावे; दररोज सकाळी ते सिद्ध करावे.
14दररोज सकाळी त्याबरोबर अन्नार्पण सिद्ध करावे; गव्हाचे पीठ एक षष्ठांश एफा, व ते नरम करण्यासाठी एक तृतीयांश हिन तेल, असे अन्नार्पण परमेश्वराला करावे; हा सर्वकालचा विधी सतत चालणार आहे.
15ह्या प्रकारे रोज सकाळी कोकरू, अन्नार्पण व तेल असे नित्यक्रमाने होमार्पण सिद्ध करावे.
16प्रभू परमेश्वर म्हणतो, अधिपती आपल्या पुत्रांपैकी कोणाला काही इनाम देईल तर ते त्याच्या वतनातले असल्यामुळे त्याच्या पुत्रांचे होईल; ते त्यांचे वंशपरंपरेने वतन होईल;
17पण तो आपल्या वतनाचा काही भाग आपल्या एखाद्या चाकरास इनाम देईल तर मुक्ततेच्या वर्षापर्यंत तो त्याच्याकडे राहील; मग तो अधिपतीकडे परत जाईल; त्याचे वतन त्याच्या पुत्रांनाच मिळेल.
18आणखी अधिपतीने लोकांचे कोणतेही वतन घेऊन त्यांना घालवून देऊ नये; त्याने आपल्या खाजगी वतनाचा भाग आपल्या पुत्रांना द्यावा; म्हणजे माझ्या लोकांपैकी कोणीही वतनास मुकून परागंदा होणार नाही.”
19मग द्वाराजवळ असलेल्या वाटेने याजकांच्या उत्तराभिमुख पवित्र खोल्यांत त्याने मला नेले; तर तेथे पश्‍चिमेस अगदी बाहेरल्या बाजूंस एक स्थान आढळले.
20तो मला म्हणाला, “याजक दोषार्पणाचे व पापार्पणाचे मांस शिजवतात ते हे स्थळ; अन्नार्पणही तेथेच भाजतात; त्यांनी ती बाहेरच्या अंगणात नेऊ नयेत, म्हणजे त्यांच्या स्पर्शाने लोक पवित्र होणार नाहीत.”
21नंतर त्याने मला बाहेरच्या अंगणात नेले व त्याच्या चार्‍ही कोपर्‍यांतून मला फिरवले तेव्हा त्या अंगणाच्या प्रत्येक कोपर्‍यात आणखी एकेक अंगण दृष्टीस पडले.
22अंगणाच्या चार्‍ही कोपर्‍यांना चाळीस हात लांबीची व तीस हात रुंदीची आवारे होती; ती एका मापाची होती;
23त्या चार्‍हींमध्ये चोहोंकडे चुलाणांच्या रांगा होत्या, आणि ह्या रांगांखाली सभोवार स्वयंपाकाच्या चुली होत्या.
24तो मला म्हणाला, “ह्या पाकशाला आहेत, ह्यांत मंदिराची सेवाचाकरी करणारे इसम लोकांचे यज्ञपशू शिजवतात.”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 46: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन