यहेज्केल 34
34
इस्राएलाच्या मेंढपाळांविषयी भविष्य
1परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
2“मानवपुत्रा, इस्राएलाच्या मेंढपाळांविरुद्ध तू संदेश देऊन त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो : जे इस्राएलाचे मेंढपाळ आपणच चरतात त्यांना धिक्कार असो! मेंढपाळांनी कळपाला चारावे की नाही?
3तुम्ही मेंढरांचे मांदे खाता, त्यांच्या लोकरीची वस्त्रे वापरता; त्यांतली लठ्ठलठ्ठ पाहून कापता, परंतु कळपाला चारत नाही.
4तुम्ही निर्बलांना बलवान करत नाही, रोग्यांना बरे करत नाही, घायाळांचे घाय बांधत नाही, घालवून दिलेल्यांना परत आणत नाही, हरवलेल्यांना शोधत नाही; तर तुम्ही त्यांच्यावर सक्तीने व कडकपणे सत्ता चालवता.
5त्यांना कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांची दाणादाण झाली; ती सर्व वनपशूंना भक्ष्य होऊन त्यांची दाणादाण झाली.
6माझी मेंढरे सर्व डोंगरांवरून, सर्व उंच टेकड्यांवरून भटकत आहेत; देशभर माझी मेंढरे उपलब्ध आहेत; त्यांची कोणाला शुद्ध नाही, कोणी त्यांना शोधत नाही.
7ह्यास्तव मेंढपाळहो, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका :
8प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी मेंढपाळ नसल्यामुळे माझी मेंढरे लुटीस गेली आहेत; माझी मेंढरे सर्व वनपशूंना भक्ष्य झाली आहेत; माझ्या मेंढपाळांना मेंढरांची शुद्ध नाही. मेंढपाळ आपणच चरतात, पण मेंढरांना चारत नाहीत.
9ह्यास्तव मेंढपाळहो, परमेश्वराचे वचन ऐका :
10प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी मेंढपाळांच्या विरुद्ध आहे, त्यांच्यापासून मी आपल्या मेंढरांचा हिशेब मागेन; माझा कळप चारण्याची त्यांना मी बंदी करीन; त्यांना स्वतः चरायला मिळणार नाही; मी आपली मेंढरे त्यांच्या तोंडातून सोडवीन म्हणजे ह्यापुढे ती त्यांना भक्षण करण्यास सापडणार नाहीत.
11कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी स्वतः आपल्या कळपाचा शोध करीन; त्यांना मी हुडकीन.
12जो मेंढपाळ आपल्या दाणादाण झालेल्या मेंढरांमध्ये राहून त्यांना हुडकतो, त्याच्याप्रमाणे मी आपल्या मेंढरांना हुडकीन आणि अभ्राच्छादित व अंधकाराच्या दिवशी त्यांची दाणादाण झाली त्या सर्व ठिकाणांतून त्यांना वाचवून आणीन.
13मी त्यांना राष्ट्रांतून आणीन, निरनिराळ्या देशांतून त्यांना जमा करीन; मी त्यांना स्वदेशी परत आणीन; मी इस्राएलाच्या पर्वतांवर, नाल्यांजवळ व देशातल्या सर्व वसतिस्थानांत त्यांना चारीन.
14मी त्यांना चांगल्या चरणीत चारीन, त्यांची चरण इस्राएलाच्या उंच पहाडांवर होईल; ते तेथे चांगल्या चरणीत बसतील, इस्राएलाच्या पर्वतांवर त्यांना उत्तम चारा मिळेल.
15मी स्वत: माझा कळप चारीन व त्यांची निजण्याबसण्याची सोय करीन असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
16मी हरवलेल्यांना शोधीन, हाकून दिलेल्यांना परत आणीन, घायाळांना शोधीन, हाकून दिलेल्यांना परत आणीन, घायाळांना पट्टी बांधीन, रोग्यांना बळ देईन; पण लठ्ठ व बलिष्ठ ह्यांचा मी नाश करीन; त्यांना मी यथान्याय चारीन.
17प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या कळपा, तुमचे असे होईल; मी मेंढरामेंढरांमध्ये, एडक्याबोकडांमध्ये निवाडा करीन.
18तुम्ही चांगला चारा खाऊन शेष राहिलेला पायांनी तुडवता; तुम्ही स्वच्छ पाणी पिऊन राहिलेले पायांनी गढूळ करता, हे काहीच नाही असे तुम्हांला वाटते काय?
19माझी मेंढरे तुमच्या पायांनी तुडवलेला चारा खातात व तुमच्या पायांनी गढूळ झालेले पाणी पितात.
20ह्यास्तव प्रभू परमेश्वर त्यांना म्हणतो, पाहा, मी, मीच पुष्ट पशू व रोड पशू ह्यांमध्ये निवाडा करीन.
21अशक्त झालेल्यांना तुम्ही आपल्या अंगाने व खांद्याने धक्के देता व आपल्या शिंगांनी हुंदडून हाकून देता;
22म्हणून मी आपल्या कळपाचा बचाव करीन, म्हणजे ते इत:पर दुसर्यांचे भक्ष्य होणार नाहीत; मी मेंढरामेंढरांमध्ये निवाडा करीन.
23त्यांच्यावर मी एक मेंढपाळ नेमून त्यांना चारीन; तो कोण तर माझा सेवक दावीद; तो त्यांना चारील; तो त्यांचा मेंढपाळ होईल.
24मी परमेश्वर त्यांचा देव होईन, व त्यांच्यामध्ये माझा सेवक दावीद अधिपती होईल; मी परमेश्वर हे बोललो आहे.
25मी क्षेमवचन देऊन त्यांच्याबरोबर करार करीन, देशातून दुष्ट पशू नाहीतसे करीन म्हणजे मग ते रानात निर्भय असे राहतील व जंगलात झोप घेतील.
26मी त्यांना व माझ्या डोंगराभोवतालच्या स्थळांना मंगलदायक करीन; पाऊस योग्य ऋतूत पडेल असे मी करीन; मंगलदायक वृष्टी होईल.
27मळ्यातील झाडे फलद्रूप होतील, भूमी आपला उपज देईल व ते आपल्या देशात निर्भयपणे वसतील; मी त्यांच्यावरील जोखडांची बंधने तोडून ज्यांनी त्यांच्याकडून दास्य करून घेतले त्यांच्या हातून त्यांना सोडवीन तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.
28ते ह्यापुढे परराष्ट्रांना भक्ष्य होणार नाहीत; वनपशू त्यांना फाडून खाणार नाहीत; तर ते निर्भय वसतील, कोणी त्यांना भीती घालणार नाही.
29मी त्यांच्यासाठी नावाजण्याजोगी लागवड करीन, म्हणजे पुनरपि त्यांच्या देशावर दुष्काळ येऊन त्यांचा र्हास होणार नाही; त्यांना पुन्हा परराष्ट्रीय लोकांकडून अप्रतिष्ठा सोसावी लागणार नाही.
30तेव्हा मी परमेश्वर त्यांचा देव त्यांच्याबरोबर आहे व इस्राएल घराणे माझी प्रजा आहे हे त्यांना समजेल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
31तुम्ही माझी मेंढरे, माझ्या चरणीतला कळप आहात; तुम्ही मानव आणि मी तुमचा देव आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
सध्या निवडलेले:
यहेज्केल 34: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.