YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 33:1-20

यहेज्केल 33:1-20 MARVBSI

परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, “मानवपुत्रा, तू आपल्या बांधवांबरोबर बोल. त्यांना सांग की, मी देशावर तलवार आणीन तेव्हा जर देशातल्या लोकांनी आपणांपैकी एकास निवडून पहारेकरी नेमले; देशावर तलवार येत आहे असे पाहून शिंग फुंकून त्याने लोकांना सावध केले; आणि त्या शिंगाचा शब्द ऐकून कोणी सावध झाला नाही म्हणून तलवारीने येऊन त्याला नेले, तर त्याचे रक्त त्याच्याच डोक्यावर राहील. शिंगाचा शब्द ऐकून तो सावध झाला नाही म्हणून त्याचे रक्त त्याच्याच डोक्यावर राहील; तो सावध झाला असता तर त्याने आपला जीव वाचवला असता. पण जर पहारेकर्‍याने तलवार येताना पाहून शिंग वाजवले नाही व लोकांना सावध केले नाही आणि तलवारीने येऊन त्यांपैकी कोणास नेले तर तो आपल्या अधर्मानेच मरेल, तथापि त्याच्या रक्तपाताचा जाब मी त्या पहारेकर्‍याजवळ मागेन. तर हे मानवपुत्रा, मी तुला इस्राएल घराण्याचा पहारेकरी नेमले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यांना सावध कर. हे दुर्जना, तू मरशील असे मी कोणा दुर्जनास म्हटले असता जर त्याला त्याच्या मार्गापासून मागे फिरण्याविषयी तू बोलून त्याला सावध केले नाहीस तर तो आपल्या अधर्मानेच मरेल खरा, पण त्याच्या रक्तपाताचा जाब मी तुझ्याजवळ मागेन. त्या दुर्जनाने आपल्या मार्गावरून मागे फिरावे म्हणून तू त्याला सावध केले असताही तो आपल्या मार्गावरून मागे न फिरल्यास तो आपल्या अधर्मानेच मरेल खरा, पण तू आपल्या जिवाचा बचाव करशील. हे मानवपुत्रा, तू इस्राएल घराण्यास सांग, तुम्ही म्हणता की, ‘आमचे अपराध व आमची पापे ह्यांचा भार आमच्यावर आहे व त्यामुळे आम्ही क्षय पावत आहोत, आम्ही कसे जगणार?’ त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी दुर्जन मरावा ह्यात मला काही संतोष नाही तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे ह्यात मला संतोष आहे; फिरा, आपल्या मार्गावरून मागे फिरा; इस्राएल वंशजहो, तुम्ही का मरता? तर हे मानवपुत्रा, तू आपल्या बांधवांना सांग, नीतिमान पातक करील तर त्याची नीतिमत्ता त्याला मुक्त करणार नाही; आणि दुर्जन आपल्या पापमार्गावरून मागे फिरेल तर त्याच्या दुष्टतेमुळे त्याचे पतन होणार नाही; तसेच नीतिमान पाप करू लागला तर तो आपल्या नीतिमत्तेमुळे वाचणार नाही. मी कोणा नीतिमानास म्हणालो की, ‘तू खास वाचशील,’ आणि त्याने आपल्या नीतिमत्तेवर भिस्त ठेवून दुष्कर्म केले तर त्याची सर्व नीतिमत्ता जमेस धरण्यात येणार नाही; त्याने केलेल्या दुष्कर्मामुळे तो मरेलच. तसेच मी कोणा दुर्जनास म्हणालो की, ‘तू मरशीलच,’ आणि तो आपल्या पापांच्या मार्गावरून फिरून नीती व न्याय आचरील; तो दुर्जन गहाण परत करील, हरण केलेले परत देईल, आणि काहीएक अधर्म न करता जीवनाच्या नियमांप्रमाणे चालेल तर तो जगेलच, मरायचा नाही. त्याने केलेली सर्व पातके त्याच्या हिशेबी धरली जाणार नाहीत; नीतीने व न्यायाने वागत असल्यामुळे तो जगेलच. तरी तुझे बांधव म्हणतात, ‘प्रभूचा मार्ग नीट नाही;’ पण त्यांचेच मार्ग नीट नाहीत. कोणी नीतिमान आपल्या नीतिमत्तेस मुकून पाप करू लागला तर त्यामुळे तो मरेलच. तथापि दुर्जन आपले दुराचरण सोडून नीतीने व न्यायाने वागला तर त्यामुळे तो वाचेल. तरीपण तुम्ही म्हणता की, ‘प्रभूचा मार्ग नीट नाही.’ अहो इस्राएल वंशजांनो, मी तुमचा प्रत्येकाचा न्याय तुमच्या मार्गाप्रमाणे करीन.”