YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 3:16-27

यहेज्केल 3:16-27 MARVBSI

मग ते सात दिवस लोटल्यावर परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते असे : “मानवपुत्रा, मी तुला इस्राएल घराण्यावर पहारेकरी नेमले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यांना बजावून सांग. ‘तू खातरीने मरशील’ असे मी पातक्यास म्हणालो असता तू जर त्याला बजावले नाही व पातक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून तू त्याला बजावून सांगितले नाहीस, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल; पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन. तू त्या पातक्यास बजावले असून त्याने आपली दुष्टाई व कुमार्ग ही सोडली नाहीत, तर तो आपल्या दुष्टाईमुळे मरेल आणि तू आपला जीव वाचवला असे होईल. तसेच नीतिमान आपली नीतिमत्ता सोडून अधर्म करू लागला व मी त्याच्यापुढे अडथळा ठेवला तर तो मरेल; तू त्याला बजावले नसल्यास तो आपल्या पातकामुळे मरेल व त्याने केलेली नीतिमत्ता जमेस धरण्यात येणार नाही; पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन. पाप करू नये असे तू त्या नीतिमानास बजावले, व त्याने पाप केले नाही, तर त्याने बोध घेतल्यामुळे तो जगेल आणि तू आपला जीव वाचवला असे होईल.” तेव्हा तेथे परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला व तो मला म्हणाला, “ऊठ, खोर्‍यात जा; तेथे मी तुझ्याबरोबर बोलेन.” मग मी उठून खोर्‍यात गेलो तेव्हा खबार नदीजवळ मी पाहिले होते तसे परमेश्वराचे तेज तेथेही माझ्यासमोर उभे होते; तेव्हा मी उपडा पडलो. नंतर आत्म्याने माझ्या ठायी प्रवेश करून मला माझ्या पायांवर उभे केले; त्याने माझ्याबरोबर भाषण करून म्हटले, जा, तू स्वतःला आपल्या घरात कोंडून घे. हे मानवपुत्रा, पाहा, तुला बंधनांनी जखडून बांधतील आणि तुला बाहेर त्या लोकांमध्ये जाता येणार नाही; तुझी जीभ तुझ्या टाळूस चिकटेल असे मी करीन, म्हणजे तू मुका होशील आणि तू त्यांचा निषेधकर्ता होणार नाहीस; कारण ते फितुरी घराणे आहे. तरीपण मी तुझ्याबरोबर बोलेन, तेव्हा मी तुझे तोंड उघडीन, मग तू त्यांना सांग की, ‘प्रभू परमेश्वर म्हणतो’; ज्याला ऐकायचे असेल तो ऐको, ज्याला ऐकायचे नसेल, तो न ऐको; ते तर फितुरी घराणे आहे.