YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 3:1-15

यहेज्केल 3:1-15 MARVBSI

तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुझ्यापुढे जे आले आहे ते सेवन कर; हा पट सेवन कर व जाऊन इस्राएल घराण्याबरोबर बोल.” तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला तो पट सेवन करायला लावले. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, “जो पट मी तुला देतो तो पोटात जाऊ दे, त्याने आपली आतडी भर.” मी तो सेवन केला तेव्हा तो माझ्या तोंडात मधासारखा मधुर लागला. मग तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, जा, इस्राएल घराण्याकडे जा आणि त्यांच्याजवळ माझी वचने बोल. कारण बाबर ओठांच्या व जड जिभेच्या लोकांकडे नव्हे, तर इस्राएल घराण्याकडे मी तुला पाठवतो;” ज्यांची बोली तुला समजत नाही अशी बाबर ओठांची व जड जिभेची अनेक राष्ट्रे आहेत, त्यांच्याकडे मी तुला पाठवत नाही. त्यांच्याकडे मी तुला पाठवले असते तर खरोखर त्यांनी तुझे ऐकले असते. पण इस्राएल घराणे तुझे ऐकणार नाही, कारण माझे ते ऐकणार नाहीत; इस्राएलाचे सगळे घराणे कठीण कपाळाचे व कठीण हृदयाचे आहे. पाहा, मी त्यांच्या मुद्रेसारखी तुझी मुद्रा वज्रप्राय करतो. त्यांच्या कपाळासारखे तुझे कपाळ कठीण करतो. मी तुझे डोके गारगोटीपेक्षा वज्रप्राय कठीण करतो; त्यांना तू भिऊ नकोस, त्यांच्या कटाक्षांनी कापू नकोस; ती तर फितुरी जात आहे.” आणखी तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, जी सर्व वचने मी तुला सांगतो ती आपल्या हृदयात साठव, ती कानाने ऐक. जा, पकडून नेलेल्या तुझ्या लोकांच्या वंशजांकडे जाऊन त्यांच्याशी बोल; त्यांना सांग की प्रभू परमेश्वर असे म्हणतो; मग ते तुझे ऐकोत किंवा न ऐकोत.” तेव्हा आत्म्याने मला उचलून धरले आणि माझ्यामागून त्याच्या स्थानातून, परमेश्वराच्या वैभवाचा धन्यवाद असो, असा प्रचंड वेगाचा शब्द झालेला मी ऐकला. आणि त्या प्राण्यांचे पंख एकमेकांना लागत त्यांचा आवाज आणि त्यांच्या बाजूंना असलेल्या चाकांचा आवाज, असा प्रचंड वेगाचा शब्द मी ऐकला. मग आत्म्याने मला उचलून धरले, मी आपल्या मनाच्या संतापाने क्लेश पावलो, तेव्हा परमेश्वराचा वरदहस्त जोराने माझ्यावर आला. त्यानंतर धरून नेलेले लोक राहत असत तेथे त्यांच्याकडे खबार नदीच्या तीरी तेल-अबीब ह्या ठिकाणी मी आलो आणि ते बसले होते तेथे मी बसलो; भयचकित होऊन सात दिवस त्यांच्यामध्ये मी बसून राहिलो.