नंतर अकराव्या वर्षी महिन्याच्या प्रतिपदेस, परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते हे :
“मानवपुत्रा, सोर यरुशलेमेविषयी म्हणत आहे, ‘अहा! जी केवळ राष्ट्रांचे प्रवेशद्वार अशी होती ती मोडून गेली आहे आणि आता लोकप्रवाह माझ्याकडे वळला आहे; ती उजाड झाली आहे, म्हणून आता माझी भरभराट होणार आहे;’
ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, अगे सोरे, मी तुझ्याविरुद्ध आहे, समुद्र आपल्या लाटा लोटतो त्याप्रमाणे मी तुझ्यावर बहुत राष्ट्रे लोटीन.
ते सोरेच्या तटांचा विध्वंस करतील व तिचे बुरूज पाडून टाकतील; मी तिच्यावरील माती खरडून काढून तिचा उघडा खडक करीन.
ती समुद्रात जाळी पसरण्याचे ठिकाण होईल; मी हे म्हटले आहे असे परमेश्वर म्हणतो; लूट म्हणून ती राष्ट्रांच्या हाती लागेल.
तिच्या भूप्रदेशात असलेल्या तिच्या कन्या तलवारीने ठार होतील; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.
कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी बाबेलचा राजा, राजाधिराज नबुखद्रेस्सर, ह्याला उत्तरेहून घोडे, रथ, स्वार व मोठे दळ ह्यांसह सोरेवर आणीन.
भूप्रदेशातल्या तुझ्या कन्यांना तो तलवारीने वधील; तो तुझ्याविरुद्ध बुरूज बांधील, मोर्चा रचील व तुझ्याविरुद्ध ढालींचा कोट उभारील.
तो तुझ्या तटांना आपली आघातयंत्रे लावील, आपल्या हत्यारांनी तुझे बुरूज पाडून टाकील.
त्याचे घोडे इतके येतील की, त्यांनी उडवलेल्या धुळीने तू झाकून जाशील; तटबंदीची नगरे फोडून आत शिरतात तसे तो तुझ्या वेशीतून आत शिरेल, तेव्हा स्वार, चाके व रथ ह्यांच्या आवाजाने तुझे तट हादरतील.
तो आपल्या घोड्यांच्या टापांनी तुझे सर्व रस्ते तुडवील; तो तुझे लोक तलवारीने ठार मारील, तुझे मजबूत स्तंभ जमीनदोस्त होतील.
ते तुझी संपत्ती लुटतील, तुझा माल लुटतील; तुझे तट उद्ध्वस्त करतील, तुझे रंगमहाल पाडून टाकतील; तुझे पाषाण, लाकूड, माती वगैरे सर्वकाही पाण्यात बुडवून टाकतील.
मी तुझ्या गीतांचा ध्वनी बंद पाडीन, तुझ्या वीणांचा सूर पुन्हा ऐकू येणार नाही.
मी तुझा उघडा खडक करून तुला जाळे पसरण्याचे ठिकाण करीन; तुला पुन्हा बांधणार नाहीत; मी परमेश्वराने हे म्हटले आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.