YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 24:1-14

यहेज्केल 24:1-14 MARVBSI

नंतर नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दशमीस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, “मानवपुत्रा, तू ही तारीख, आजची तारीख लिहून ठेव; ह्या तारखेस बाबेलचा राजा यरुशलेमेवर जाऊन पडला आहे. ह्या फितुरी घराण्यास दाखला देऊन असे म्हण, प्रभू परमेश्वर म्हणतो, एक कढई चुलीवर चढव; ती चढवल्यावर तिच्यात पाणी ओत. मांड्या व खांदे असे मांसाचे चांगले चांगले तुकडे जमा करून तिच्यात टाक; तिच्यात निवडक हाडे भर. कळपातून एक चांगले मेंढरू निवडून घे; हाडे शिजवण्यासाठी खाली लाकडांची रास कर; ते चांगले शिजू दे; त्यातील हाडेही चांगली शिजू दे. ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, ह्या खुनी नगरीला धिक्कार असो! ती गंज चढलेल्या कढईसारखी आहे, तिचा गंज निघत नाही; तिच्यातला एकेक तुकडा बाहेर काढ, त्यावर चिठ्ठ्या टाकायच्या नाहीत. कारण तिने रक्तपात केला आहे, त्या रक्ताने ती भरली आहे, ते तिने उघड्या खडकावर पडू दिले आहे; धुळीने ते झाकू नये म्हणून तिने ते जमिनीवर पडू दिले नाही. संताप येऊन सूड उगवावा ह्यासाठी तिने रक्त पाडले आहे, ते झाकता येऊ नये म्हणून ते उघड्या खडकावर पडावे असे मी केले आहे. ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, ह्या खुनी नगरीला धिक्कार असो! मी सरपणाचा ढीगही मोठा करीन. लाकडे भरपूर घाल, आग चांगली पेटव, मांस चांगले शिजव, रस्सा चांगला घट्ट होऊ दे, हाडेही भाजून काढ. मग विस्तवावर कढई रिकामीच ठेव म्हणजे तिचे पितळ तप्त व धगधगीत होऊन तिचा मळ आतल्याआत जळेल, तिचा गंज निघून जाईल. ती श्रम करून करून भागली तरी तिच्यावर दाट बसलेला गंज निघून गेला नाही; गंजासहित तिला आगीत टाका. तुझी अशुद्धता पाहावी तर ती भयंकर आहे; मी तुला स्वच्छ करू पाहिले तरी तू स्वच्छ झाली नाहीस; तुझ्यावरील माझ्या संतापाची तृप्ती झाल्यावाचून तू शुद्ध व्हायची नाहीस. मी परमेश्वर हे बोललो आहे; हे घडेलच, हे मी करीनच; मी मागे हटणार नाही, गय करणार नाही, ह्याचा मला अनुताप होणार नाही; तुझ्या आचारांनुसार, तुझ्या कर्मांनुसार, ते तुझा न्याय करतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”