यहेज्केल 22
22
यरुशलेमेची पापे
1परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
2“मानवपुत्रा, तू न्याय करशील ना? त्या खुनी नगरीचा न्याय करशील ना? त्या वेळी तिला तिची सर्व अमंगळ कृत्ये दाखव.
3तिला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, अगे नगरी, तुझा काळ येऊन ठेपावा म्हणून तू आपल्यामध्ये रक्तपात करतेस, व आपणांस विटाळण्यासाठी मूर्ती करतेस.
4स्वत: पाडलेल्या रक्ताने तू आपणास दोषी केलेस, तू केलेल्या मूर्तींनी आपणास विटाळवलेस, तू आपला काळ समीप आणलास, तुझी वर्षे भरली आहेत; म्हणून मी तुला राष्ट्रांच्या निंदेस, सर्व देशांच्या थट्टेस पात्र करीन.
5‘तू अभद्र नावाची व बेबंदपणाने भरलेली नगरी आहेस’ असे म्हणून जवळचे व दूरचे तुझा उपहास करतील.
6पाहा, इस्राएलाचे सर्व सरदार आपापल्या बाहुबलाप्रमाणे रक्तपात करण्यास तुझ्यात राहिले आहेत.
7तुझ्या ठायी लोक आईबापांना तुच्छ मानतात, तुझ्या ठायी ते परदेशीयांवर जुलूम करतात, तुझ्या ठायी ते अनाथ व विधवा ह्यांना जाचतात.
8तू माझ्या पवित्र वस्तूंना तुच्छ लेखतेस, तू माझे शब्बाथ अपवित्र लेखले आहेत.
9तुझ्यात रक्तपात करण्यासाठी निंदक राहत आहेत, ते तुझ्यातल्या डोंगरावर मेजवानी करतात; तुझ्यात बदफैलीने चालतात.
10तुझ्यात ते बापाची काया उघडी करतात, रजस्वला स्त्री दूर बसली असता तिच्याबरोबर गमन करतात.
11तुझ्या ठायी कोणी आपल्या शेजार्याच्या स्त्रीबरोबर अघोर कर्म करतो, कोणी आपल्या सुनेबरोबर अगम्यगमन करून तिला भ्रष्ट करतो, कोणी आपल्या बहिणीला, आपल्या बापाच्या कन्येला भ्रष्ट करतो,
12तुझ्या ठायी रक्तपात करावा म्हणून ते लाच घेतात; तू व्याजबट्टा करतेस, जुलूम करून आपल्या शेजार्यास नागवतेस व मला विसरली आहेस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
13ह्यास्तव पाहा, तू अन्यायाने केलेल्या कमाईमुळे, आणि तुझ्यातल्या रक्तपातामुळे मी आपला हात आपटत आहे.
14मी तुझा समाचार घेईन त्या दिवशी तुझे हृदय टिकाव धरील काय? तुझे हात दृढ राहतील काय? मी परमेश्वर हे जे बोललो आहे ते मी करीनच.
15मी राष्ट्रांमध्ये तुझी पांगापांग करीन, देशोदेशी तुझी दाणादाण करीन व तुझ्यातली अशुद्धता नष्ट करीन.
16तू राष्ट्रांदेखत आपल्याच कृतीने अपवित्र ठरशील; तेव्हा तुला समजेल की मी परमेश्वर आहे.”
17परमेश्वराचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले की,
18“मानवपुत्रा, इस्राएल घराणे माझ्या दृष्टीने केवळ गाळ झाले आहे; भट्टीतील पितळ, कथील, लोखंड व शिसे ह्यांसारखे ते सर्व आहेत, ते रुप्यातील गाळ झाले आहेत.
19ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, तुम्ही सर्व गाळ झाला आहात; म्हणून पाहा, मी तुम्हांला यरुशलेमेत एकत्र करीन.
20रुपे, पितळ, लोखंड, शिसे व कथील लोक भट्टीत घालतात व ती वितळण्यासाठी अग्नी फुंकून प्रदीप्त करतात त्याप्रमाणे मी आपल्या क्रोधाने व संतापाने तुम्हांला जमा करीन व भट्टीत घालून वितळवीन.
21मी तुम्हांला जमा करून माझ्या कोपाग्नीचा फुंकर तुमच्यावर घालीन, तेणेकरून तुम्ही भट्टीत वितळून जाल.
22रुपे भट्टीत वितळते तसे तुम्ही यरुशलेमेत वितळून जाल, तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वराने आपला संताप तुमच्यावर ओतला आहे.”
23मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
24“मानवपुत्रा, ह्या भूमीस सांग, क्रोधदिनी शुद्धी न पावलेली व पर्जन्यवृष्टी न झालेली भूमी तू आहेस.
25तिच्यात संदेष्ट्यांनी एकोपा केला आहे; भक्ष्य फाडून खाणार्या, गर्जणार्या सिंहाप्रमाणे ते लोकांचे प्राण ग्रासून टाकतात; ते धन व पैका हरण करतात; ते तिच्या विधवांची संख्या वाढवतात.
26तिचे याजक माझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन करून माझ्या पवित्र वस्तू भ्रष्ट करतात. पवित्र व अपवित्र ह्यांचा ते काही भेद ठेवत नाहीत; शुद्ध व अशुद्ध ह्यांचा फरक ते शिकवत नाहीत; ते माझ्या शब्बाथांविषयी डोळेझाक करतात; त्यांच्यामध्ये माझा अपमान होतो.
27तिच्यातले सरदार भक्ष्य फाडून खाणार्या लांडग्यांसारखे आहेत; ते अन्यायाने कमाई करण्यासाठी रक्तपात करतात, मानवी प्राण्यांचा विनाश करतात.
28तिचे संदेष्टे कच्चा चुना त्यांच्याकरता वापरतात; मिथ्या दृष्टान्त पाहून ते त्यांना खोटे शकुन सांगतात व परमेश्वर बोलला नसताही प्रभू परमेश्वर म्हणतो, असे ते बोलतात.
29देशातील लोक बलात्कार व चोरी करतात. ते दुर्बल व दरिद्री ह्यांना चिरडून टाकतात आणि परदेशीयांवर अन्याय व जुलूम करतात.
30मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी तट बांधील, कोणी माझ्यासमोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय ह्याची मी वाट पाहिली, पण मला कोणी आढळला नाही.
31ह्यामुळे त्यांच्यावर मी आपल्या क्रोधाचा वर्षाव करीन; मी आपल्या कोपाग्नीने त्यांना भस्म करीन, त्यांच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्याच शिरी आणीन असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
सध्या निवडलेले:
यहेज्केल 22: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.