YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 22:17-31

यहेज्केल 22:17-31 MARVBSI

परमेश्वराचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले की, “मानवपुत्रा, इस्राएल घराणे माझ्या दृष्टीने केवळ गाळ झाले आहे; भट्टीतील पितळ, कथील, लोखंड व शिसे ह्यांसारखे ते सर्व आहेत, ते रुप्यातील गाळ झाले आहेत. ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, तुम्ही सर्व गाळ झाला आहात; म्हणून पाहा, मी तुम्हांला यरुशलेमेत एकत्र करीन. रुपे, पितळ, लोखंड, शिसे व कथील लोक भट्टीत घालतात व ती वितळण्यासाठी अग्नी फुंकून प्रदीप्त करतात त्याप्रमाणे मी आपल्या क्रोधाने व संतापाने तुम्हांला जमा करीन व भट्टीत घालून वितळवीन. मी तुम्हांला जमा करून माझ्या कोपाग्नीचा फुंकर तुमच्यावर घालीन, तेणेकरून तुम्ही भट्टीत वितळून जाल. रुपे भट्टीत वितळते तसे तुम्ही यरुशलेमेत वितळून जाल, तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वराने आपला संताप तुमच्यावर ओतला आहे.” मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, “मानवपुत्रा, ह्या भूमीस सांग, क्रोधदिनी शुद्धी न पावलेली व पर्जन्यवृष्टी न झालेली भूमी तू आहेस. तिच्यात संदेष्ट्यांनी एकोपा केला आहे; भक्ष्य फाडून खाणार्‍या, गर्जणार्‍या सिंहाप्रमाणे ते लोकांचे प्राण ग्रासून टाकतात; ते धन व पैका हरण करतात; ते तिच्या विधवांची संख्या वाढवतात. तिचे याजक माझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन करून माझ्या पवित्र वस्तू भ्रष्ट करतात. पवित्र व अपवित्र ह्यांचा ते काही भेद ठेवत नाहीत; शुद्ध व अशुद्ध ह्यांचा फरक ते शिकवत नाहीत; ते माझ्या शब्बाथांविषयी डोळेझाक करतात; त्यांच्यामध्ये माझा अपमान होतो. तिच्यातले सरदार भक्ष्य फाडून खाणार्‍या लांडग्यांसारखे आहेत; ते अन्यायाने कमाई करण्यासाठी रक्तपात करतात, मानवी प्राण्यांचा विनाश करतात. तिचे संदेष्टे कच्चा चुना त्यांच्याकरता वापरतात; मिथ्या दृष्टान्त पाहून ते त्यांना खोटे शकुन सांगतात व परमेश्वर बोलला नसताही प्रभू परमेश्वर म्हणतो, असे ते बोलतात. देशातील लोक बलात्कार व चोरी करतात. ते दुर्बल व दरिद्री ह्यांना चिरडून टाकतात आणि परदेशीयांवर अन्याय व जुलूम करतात. मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी तट बांधील, कोणी माझ्यासमोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय ह्याची मी वाट पाहिली, पण मला कोणी आढळला नाही. ह्यामुळे त्यांच्यावर मी आपल्या क्रोधाचा वर्षाव करीन; मी आपल्या कोपाग्नीने त्यांना भस्म करीन, त्यांच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्याच शिरी आणीन असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”