YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 22:1-16

यहेज्केल 22:1-16 MARVBSI

परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, “मानवपुत्रा, तू न्याय करशील ना? त्या खुनी नगरीचा न्याय करशील ना? त्या वेळी तिला तिची सर्व अमंगळ कृत्ये दाखव. तिला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, अगे नगरी, तुझा काळ येऊन ठेपावा म्हणून तू आपल्यामध्ये रक्तपात करतेस, व आपणांस विटाळण्यासाठी मूर्ती करतेस. स्वत: पाडलेल्या रक्ताने तू आपणास दोषी केलेस, तू केलेल्या मूर्तींनी आपणास विटाळवलेस, तू आपला काळ समीप आणलास, तुझी वर्षे भरली आहेत; म्हणून मी तुला राष्ट्रांच्या निंदेस, सर्व देशांच्या थट्टेस पात्र करीन. ‘तू अभद्र नावाची व बेबंदपणाने भरलेली नगरी आहेस’ असे म्हणून जवळचे व दूरचे तुझा उपहास करतील. पाहा, इस्राएलाचे सर्व सरदार आपापल्या बाहुबलाप्रमाणे रक्तपात करण्यास तुझ्यात राहिले आहेत. तुझ्या ठायी लोक आईबापांना तुच्छ मानतात, तुझ्या ठायी ते परदेशीयांवर जुलूम करतात, तुझ्या ठायी ते अनाथ व विधवा ह्यांना जाचतात. तू माझ्या पवित्र वस्तूंना तुच्छ लेखतेस, तू माझे शब्बाथ अपवित्र लेखले आहेत. तुझ्यात रक्तपात करण्यासाठी निंदक राहत आहेत, ते तुझ्यातल्या डोंगरावर मेजवानी करतात; तुझ्यात बदफैलीने चालतात. तुझ्यात ते बापाची काया उघडी करतात, रजस्वला स्त्री दूर बसली असता तिच्याबरोबर गमन करतात. तुझ्या ठायी कोणी आपल्या शेजार्‍याच्या स्त्रीबरोबर अघोर कर्म करतो, कोणी आपल्या सुनेबरोबर अगम्यगमन करून तिला भ्रष्ट करतो, कोणी आपल्या बहिणीला, आपल्या बापाच्या कन्येला भ्रष्ट करतो, तुझ्या ठायी रक्तपात करावा म्हणून ते लाच घेतात; तू व्याजबट्टा करतेस, जुलूम करून आपल्या शेजार्‍यास नागवतेस व मला विसरली आहेस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. ह्यास्तव पाहा, तू अन्यायाने केलेल्या कमाईमुळे, आणि तुझ्यातल्या रक्तपातामुळे मी आपला हात आपटत आहे. मी तुझा समाचार घेईन त्या दिवशी तुझे हृदय टिकाव धरील काय? तुझे हात दृढ राहतील काय? मी परमेश्वर हे जे बोललो आहे ते मी करीनच. मी राष्ट्रांमध्ये तुझी पांगापांग करीन, देशोदेशी तुझी दाणादाण करीन व तुझ्यातली अशुद्धता नष्ट करीन. तू राष्ट्रांदेखत आपल्याच कृतीने अपवित्र ठरशील; तेव्हा तुला समजेल की मी परमेश्वर आहे.”