YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 5:15-23

निर्गम 5:15-23 MARVBSI

तेव्हा इस्राएल लोकांचे नायक फारोकडे जाऊन ओरड करून म्हणाले, “आपण आपल्या दासांशी असे का वागता? आपल्या दासांना गवत देत नाहीत तरी ते आम्हांला म्हणतात, विटा करा; पाहा, आपल्या दासांना मार मिळत आहे; पण दोष आपल्या लोकांचा आहे.” तो म्हणाला, “तुम्ही आळशी आहात आळशी, म्हणूनच तुम्ही म्हणता, आम्हांला जाऊ द्यावे, आमच्या परमेश्वराप्रीत्यर्थ आम्हांला यज्ञ करू द्यावा. आता जा आणि आपले काम करा; तुम्हांला गवत काही मिळायचे नाही, आणि विटा तर नेहमीच्या इतक्याच करून दिल्या पाहिजेत. विटा व रोजचे काम ह्यांत तुम्ही काही कमी करता कामा नये.” असे इस्राएलांच्या नायकांना बजावण्यात आले तेव्हा आपण फार पेचात आहोत असे त्यांच्या लक्षात आले; ते फारोकडून निघाले तेव्हा मोशे व अहरोन त्यांची वाट पाहत उभे होते ते त्यांना आढळले. तेव्हा ते त्यांना म्हणाले, “परमेश्वर तुम्हांला पाहून घेवो; फारोच्या दृष्टीने व त्याच्या चाकरांच्याही दृष्टीने तुम्ही आम्हांला आमची किळस येईल असे केले आहे; आम्हांला मारून टाकण्यासाठी तुम्ही त्यांच्या हातात जशी काय तलवारच दिली आहे.” मग मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, “प्रभू, तू ह्या लोकांचे का वाईट केले आहे? मला तू त्यांच्याकडे पाठवले ते काय म्हणून? मी तुझ्या नावाने बोलण्यासाठी फारोकडे आलो तेव्हापासून तो ह्या लोकांना पिडीत आहे; तू आपल्या लोकांची सोडवणूक तर मुळीच केली नाहीस.”