निर्गम 33
33
वचनदत्त देशाकडे जाण्याची आज्ञा
1मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू व जे लोक तू मिसर देशातून आणले आहेत असे तुम्ही येथून निघून मार्गस्थ व्हा; व जो देश तुझ्या संततीला देईन असे अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना मी शपथपूर्वक सांगितले होते, त्या देशाकडे जा.
2मी तुझ्यापुढे एक दूत पाठवीन आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ह्यांना तेथून घालवून देईन.
3दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशाकडे तू जा; तथापि तुम्ही ताठ मानेचे लोक असल्यामुळे मी तुमच्याबरोबर येणार नाही; आलो तर वाटेतच मी तुम्हांला भस्म करीन.”
4लोक हे अशुभ वर्तमान ऐकून विलाप करू लागले; व कोणीही आपले दागदागिने अंगावर घातले नाहीत.
5परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांना सांग की, तुम्ही ताठ मानेचे लोक आहात; मी पळभर तुमच्याबरोबर असलो तरी मी तुम्हांला भस्म करीन; म्हणून तुम्ही आपले दागदागिने आपल्या अंगावरून उतरवून ठेवा, म्हणजे तुमचे काय करायचे ते मी पाहीन.”
6ह्यामुळे होरेब पर्वतापासून पुढे इस्राएल लोक दागिन्यांवाचून राहिले. दर्शनमंडप 7मोशे छावणीबाहेर बर्याच अंतरावर तंबू नेऊन उभा करी व त्याला तो दर्शनमंडप1 म्हणे. कोणाला परमेश्वराकडे काही विचारायचे असले म्हणजे तो छावणीबाहेरील त्या दर्शनमंडपाकडे जात असे.
8आणि असे व्हायचे की, जेव्हा मोशे त्या मंडपाकडे जात असे तेव्हा सर्व लोक उठून आपापल्या तंबूच्या दारात उभे राहत आणि तो मंडपात प्रवेश करीपर्यंत त्याच्याकडे निरखून पाहत राहत.
9मोशे मंडपात प्रवेश करी तेव्हा मेघस्तंभ उतरून मंडपाच्या दारापुढे उभा राही आणि परमेश्वर मोशेशी भाषण करीत असे.
10त्या मंडपाच्या दाराशी मेघस्तंभ उभा आहे असे सर्व लोक पाहत तेव्हा ते सगळे उठून आपापल्या तंबूच्या दाराशी दंडवत घालत.
11मित्राशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोलत असे. मोशे छावणीकडे परत जात असे, तरी त्याचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा, हा तरुण पुरुष मंडप सोडून बाहेर येत नसे. परमेश्वराच्या समक्षतेचे आश्वासन 12मोशे परमेश्वराला म्हणाला, “पाहा, तू मला म्हणतोस की, ‘ह्या लोकांना घेऊन जा’; पण तू माझ्याबरोबर कोणाला पाठवणार हे मला अजून कळवले नाहीस. तरी तू म्हटले आहेस की, ‘मी तुला व्यक्तिश: नावाने ओळखतो, आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे.’
13आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास, तुझे मार्ग मला दाखव, म्हणजे मला तुझी ओळख पटेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. हे राष्ट्र तुझी प्रजा आहे हे लक्षात घे.”
14परमेश्वर म्हणाला, “मी स्वत: येईन आणि तुला विसावा देईन.”
15तो त्याला म्हणाला, “तू स्वत: येत नसलास तर आम्हांला येथून पुढे नेऊ नकोस.
16तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या प्रजेवर झाली आहे हे कशावरून समजावे? तू आमच्याबरोबर आल्याने मी व तुझे प्रजाजन पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपेक्षा वेगळे झालो आहोत ह्यावरूनच ते समजायचे ना?”
17मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “हे जे तू सांगितले आहेस तेही मी करीन; कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्तिश: नावाने ओळखत आहे.”
18तो म्हणाला, “कृपा करून मला तुझे तेज दाखव.”
19तो म्हणाला, “मी आपले सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन; तुझ्यासमोर ‘परमेश्वर’ ह्या नावाची मी घोषणा करीन; ज्याच्यावर कृपा करावी असे वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावी असे वाटेल त्याच्यावर दया करीन.
20तरीपण” तो म्हणाला की, “तुला माझे मुख पाहवणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही.”
21परमेश्वर म्हणाला, “माझ्याकडे एक जागा आहे; येथे ह्या खडकावर उभा राहा;
22असे होईल की, माझे तेज जवळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन; मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन;
23मग मी आपला हात काढून घेईन आणि तुला पाठमोरा दिसेन; पण माझे मुख दिसायचे नाही.”
सध्या निवडलेले:
निर्गम 33: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.