YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 32:9-14

निर्गम 32:9-14 MARVBSI

मग परमेश्वराने मोशेला म्हटले, “मी ह्या लोकांना पाहिले आहे. हे ताठ मानेचे लोक आहेत. तर आता मला आड येऊ नकोस; मी आपला कोप त्यांच्यावर भडकवून त्यांना भस्म करतो; आणि तुझेच एक मोठे राष्ट्र करतो.” तेव्हा मोशे आपला देव परमेश्वर ह्याची काकळूत करून म्हणाला, “हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांना महान सामर्थ्याने व भुजबलाने मिसर देशातून बाहेर आणलेस, त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा? त्यांना डोंगरामध्ये मारून टाकावे आणि पृथ्वीवरून त्यांचा नाश करावा म्हणून त्यांना मिसर देशातून त्याने दुष्ट हेतूने बाहेर आणले असे मिसरी लोकांनी का बोलावे? आपल्या तीव्र कोपापासून फीर, आणि आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याच्या हेतूपासून परावृत्त हो. तुझे दास अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांची आठवण कर; तू त्यांना स्वत:ची शपथ वाहून सांगितले होते की, ‘मी तुमची संतती आकाशातील तार्‍यांसारखी बहुगुणित करीन आणि ज्या देशाविषयी मी तुम्हांला सांगितले तो सगळा तुमच्या संततीला देईन आणि ती त्यांची निरंतरची वतनदार होईल.’ तेव्हा आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याचा जो परमेश्वराचा हेतू होता, त्यापासून तो परावृत्त झाला.