मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले तेव्हा ते अहरोनाभोवती जमून त्याला म्हणाले, “ऊठ, आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव; कारण आम्हांला मिसर देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोशे ह्याचे काय झाले हे आम्हांला कळत नाही.” तेव्हा अहरोनाने त्यांना सांगितले की, “तुमच्या स्त्रिया, पुत्र व कन्या ह्यांच्या कानांतील सोन्याची कुंडले काढून माझ्याकडे घेऊन या.” मग सर्व लोकांनी आपल्या कानांतील सोन्याची कुंडले काढून अहरोनाकडे आणली. त्याने ती त्यांच्या हातून घेऊन त्यांचे एक वासरू ओतून त्याला कोरणीने कोरले; तेव्हा ते म्हणू लागले की, “हे इस्राएला, ज्या देवांनी तुला मिसर देशातून आणले आहे तेच हे तुझे देव.” हे पाहून अहरोनाने त्याच्यापुढे एक वेदी बांधली आणि असे जाहीर केले की, उद्या परमेश्वराप्रीत्यर्थ उत्सव करायचा आहे. म्हणून दुसर्या दिवशी लोकांनी पहाटेस उठून होमार्पणे अर्पण केली, शांत्यर्पणे आणली; ते खायलाप्यायला बसले आणि मग उठून खेळू लागले. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “चल, खाली उतर, कारण ज्या तुझ्या लोकांना तू मिसर देशातून आणले ते बिघडले आहेत; ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञा केली होती तो मार्ग लवकरच सोडून ते बहकून गेले आहेत; त्यांनी एक ओतीव वासरू करून त्याची पूजाअर्चा केली. त्याला बली अर्पण केले. ‘हे इस्राएला, ज्यांनी तुला मिसर देशातून आणले आहे तेच हे तुझे देव,’ असे ते म्हणू लागले आहेत.” मग परमेश्वराने मोशेला म्हटले, “मी ह्या लोकांना पाहिले आहे. हे ताठ मानेचे लोक आहेत. तर आता मला आड येऊ नकोस; मी आपला कोप त्यांच्यावर भडकवून त्यांना भस्म करतो; आणि तुझेच एक मोठे राष्ट्र करतो.” तेव्हा मोशे आपला देव परमेश्वर ह्याची काकळूत करून म्हणाला, “हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांना महान सामर्थ्याने व भुजबलाने मिसर देशातून बाहेर आणलेस, त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा? त्यांना डोंगरामध्ये मारून टाकावे आणि पृथ्वीवरून त्यांचा नाश करावा म्हणून त्यांना मिसर देशातून त्याने दुष्ट हेतूने बाहेर आणले असे मिसरी लोकांनी का बोलावे? आपल्या तीव्र कोपापासून फीर, आणि आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याच्या हेतूपासून परावृत्त हो. तुझे दास अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांची आठवण कर; तू त्यांना स्वत:ची शपथ वाहून सांगितले होते की, ‘मी तुमची संतती आकाशातील तार्यांसारखी बहुगुणित करीन आणि ज्या देशाविषयी मी तुम्हांला सांगितले तो सगळा तुमच्या संततीला देईन आणि ती त्यांची निरंतरची वतनदार होईल.’ तेव्हा आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याचा जो परमेश्वराचा हेतू होता, त्यापासून तो परावृत्त झाला.
निर्गम 32 वाचा
ऐका निर्गम 32
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्गम 32:1-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ