निर्गम 20
20
दहा आज्ञा
(अनु. 5:1-21)
1आणि देव हे सर्व शब्द बोलला :
2ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे.
3माझ्याशिवाय तुला वेगळे देव नसावेत.
4आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस.
5त्यांच्या पाया पडू नकोस किंवा त्यांची सेवा करू नकोस; कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे; जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना तिसर्या-चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो;
6आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो.
7तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव व्यर्थ घेऊ नकोस, कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही.
8शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ.
9सहा दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर;
10पण सातवा दिवस तुझा देव परमेश्वर ह्याचा शब्बाथ आहे, म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नकोस; तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझी गुरेढोरे व तुझ्या वेशीच्या आत असलेला उपरा, ह्यांनीही करू नये;
11कारण सहा दिवसांत परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्वकाही निर्माण केले आणि सातव्या दिवशी विसावा घेतला; म्हणून परमेश्वराने शब्बाथ दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला.
12आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील.
13खून करू नकोस.
14व्यभिचार करू नकोस
15चोरी करू नकोस.
16आपल्या शेजार्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नकोस.
17आपल्या शेजार्याच्या घराचा लोभ धरू नकोस, आपल्या शेजार्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नकोस, आपल्या शेजार्याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू ह्यांचा लोभ धरू नकोस.
लोकांना भीती वाटते
(अनु. 5:22-33)
18मेघगर्जना होत आहे, विजा चमकत आहेत, कर्ण्याचा नाद होत आहे आणि पर्वतातून धूर चढत आहे असे सर्व लोकांच्या दृष्टीस पडले तेव्हा त्यांचा थरकाप झाला व ते दूर उभे राहिले,
19आणि मोशेला म्हणाले, “आमच्याशी तूच बोल, म्हणजे आम्ही ऐकू; देव आमच्याशी न बोलो, तो बोलला तर आम्ही मरू.”
20तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका. कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय तुमच्या मनात राहून तुम्ही पाप करू नये ह्यासाठी देव आला आहे.
21लोक दूर उभे राहिले, पण देव निबिड अंधकारात होता, तिकडे मोशे गेला.
वेदीसंबंधी नियम
22तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांना असे सांग : मी तुमच्याशी आकाशातून भाषण केले ते तुम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे.
23तुम्ही माझ्या बरोबरीला दुसरे देव करू नका. आपल्यासाठी सोन्यारुप्याचे देव करू नका.
24माझ्यासाठी एक मातीची वेदी कर आणि तिच्यावर आपली शेरडेमेंढरे व गुरेढोरे ह्यांची होमार्पणे व शांत्यर्पणे कर, जेथे जेथे माझे नामस्मरण व्हावे असे मी करीन, तेथे तेथे मी तुझ्याकडे येऊन तुला आशीर्वाद देईन.
25तू माझ्यासाठी दगडांची वेदी बांधशील तर ती घडलेल्या चिर्यांची नसावी, कारण तू आपले हत्यार दगडाला लावल्यास तो तुझ्याकडून अपवित्र होईल.
26तुझी नग्नता माझ्या वेदीवर दिसून येऊ नये म्हणून तू तिच्यावर पायर्यांनी चढता कामा नये.
सध्या निवडलेले:
निर्गम 20: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.