YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 15:20-27

निर्गम 15:20-27 MARVBSI

मग अहरोनाची बहीण मिर्याम संदेष्ट्री हिने हाती डफ घेतला आणि सर्व स्त्रिया डफ घेऊन तिच्यामागून नाचत चालल्या. आणि मिर्यामेने त्यांच्या गाण्याला ध्रुपद धरले, “परमेश्वराला गीत गा, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे. घोडा व स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहेत.” नंतर मोशेने इस्राएल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे नेले आणि ते शूर नावाच्या रानात जाऊन पोहचले; त्या रानातून तीन दिवस कूच करीत असता त्यांना पाणी कुठे मिळेना. मग मारा नावाच्या एका ठिकाणी ते आले; तेथील पाणी फार कडू असल्यामुळे त्यांना ते पिववेना, म्हणून त्या जागेचे नाव मारा1 असे पडले. तेव्हा “आम्ही काय प्यावे?” असे म्हणून त्यांनी मोशेजवळ कुरकुर केली. त्याने परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने त्याला एक झाड दाखवले, ते त्याने पाण्यात टाकल्यावर पाणी गोड झाले. तेथे परमेश्वराने2 त्यांच्यासाठी विधी व नियम लावून दिला; त्यांना कसोटीस लावले आणि म्हटले, “तू आपला देव परमेश्वर ह्याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिसरी लोकांवर जे रोग मी पाठवले त्यांपैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही; कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. मग ते एलीम येथे आले, तेथे पाण्याचे बारा झरे आणि खजुरीची सत्तर झाडे होती; तेथे पाण्याजवळ त्यांनी तळ दिला.