YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एस्तेर 9

9
यहूदी आपल्या शत्रूंचा धुव्वा उडवतात
1अदार जो बारावा महिना त्याच्या त्रयोदशीस राजाची आज्ञा व फर्मान अंमलात येऊन यहूदी लोकांवर वरचढ होण्याचा आशेचा दिवस समीप आला, पण सर्व उलट होऊन यहूदी लोक आपल्या वैर्‍यांवर वरचढ झाले;
2आपणांस उपद्रव करू पाहणार्‍या वैर्‍यांना हात दाखवावा म्हणून अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतांतील यहूदी लोक आपापल्या गावी एकत्र झाले; त्यांच्याशी कोणालाही सामना करवेना; त्यांचा सर्व लोकांना धाक बसला.
3प्रांतांचे सरदार, इलाख्याचे अधिपती, प्रांतांचे अधिपती व राज्यकारभार चालवणारे सर्व जण ह्यांनी यहूद्यांना कुमक केली; त्या सर्वांना मर्दखयाचा धाक बसला होता.
4मर्दखयाचा राजदरबारी मोठा मान असून त्याची कीर्ती सर्व प्रांतांतून पसरली होती; मर्दखयाचा महिमा उत्तरोत्तर वाढत गेला.
5इकडे यहूदी लोकांनी आपल्या सर्व शत्रूंवर तलवार चालवून त्यांचा वध व विध्वंस केला; मनास येईल तसा त्यांनी आपल्या विरोध्यांचा समाचार घेतला.
6शूशन राजवाड्यात यहूदी लोकांनी पाचशे लोकांचा वध करून त्यांचा धुव्वा उडवला.
7पर्शन्दाथा, दलफोन, अस्पाथा,
8पोराथा, अदल्या, अरीदाथा, 9पर्मश्ता, अरीसई, अरीदय व वैजाथा,
10हे यहूद्यांचा वैरी हामान बिन हम्मदाथा ह्याचे दहा पुत्र त्यांनी ठार केले, पण लुटीस त्यांनी हात लावला नाही.
11त्या दिवशी शूशन राजवाड्यात ज्यांचा वध झाला त्यांची यादी राजाकडे आणली.
12तेव्हा राजा एस्तेर राणीला म्हणाला, “यहूद्यांनी शूशन राजवाड्यातले पाचशे पुरुष व हामानाचे दहा पुत्र मारून त्यांचा फडशा उडवला आहे; मग राज्याच्या इतर प्रांतांत त्यांनी काय केले असेल ते कोणास ठाऊक! आता आणखी तुझा काही अर्ज आहे काय? तो मंजूर होईल; आणखी काही मागणे आहे काय? त्याप्रमाणे करण्यात येईल.”
13एस्तेर म्हणाली, “राजाची मर्जी असल्यास आजच्या हुकमाप्रमाणे उद्याही करण्यास शूशन येथील यहूद्यांना मुभा असावी आणि हामानाच्या दहा पुत्रांना फाशी देण्याच्या खांबांवर लटकवावे.”
14त्याप्रमाणे करण्याची राजाज्ञा झाली. शूशन येथून फर्मान निघाले व लोकांनी हामानाच्या दहा पुत्रांना फासावर लटकवले.
15शूशन येथील यहूद्यांनी अदार महिन्याच्या चतुर्दशीसही एकत्र होऊन शूशन येथील तीनशे पुरुष मारले; पण त्यांनी लुटीस हात लावला नाही.
पुरीमचा आनंदोत्सव
16राज्यातील निरनिराळे यहूदी एकत्र होऊन आपला प्राण वाचवण्यास उभे राहिले; त्यांनी आपल्या वैर्‍यांपैकी पंचाहत्तर हजार लोकांचा संहार केला व ते वैर्‍यांपासून विसावा पावले; पण त्यांनी लुटीस हात लावला नाही.
17अदार महिन्याच्या त्रयोदशीस हे घडले; त्यांनी चतुर्दशीस विश्रांती घेऊन तो दिवस मेजवानीचा व आनंदोत्सवाचा ठरवला;
18पण शूशन येथले यहूदी तेरावा व चौदावा अशा दोन दिवशी एकत्र झाले आणि पंधराव्या दिवशी त्यांनी विश्रांती घेऊन तो दिवस मेजवानीचा व आनंदोत्सवाचा ठरवला.
19ह्याकरता खेडेगावचे यहूदी जे गावकूस नसलेल्या गावांत राहतात ते अदार महिन्याची चतुर्दशी आनंदोत्सवाचा मंगलदिन व एकमेकांना भेटीची ताटे पाठवण्याचा दिवस ठरवून पाळतात.
20मग मर्दखयाने हे सर्व वृत्त लिहून काढले आणि अहश्वेरोश राजाच्या दूरच्या व जवळच्या सर्व प्रांतांतील यहूदी लोकांना पत्रे पाठवली.
21आणि अदार महिन्याचा चौदावा व पंधरावा हे दिवस वर्षोवर्षी पाळत जावे असे फर्मावले;
22ह्या दिवशी यहूद्यांना आपल्या शत्रूंपासून विसावा प्राप्त झाला, ह्या महिन्यात दु:ख जाऊन आनंद झाला, आणि शोक जाऊन शुभदिन प्राप्त झाला, म्हणून तो पाळावा; हे दिवस आनंदोत्सव करण्यात, एकमेकांना भेटीची ताटे पाठवण्यात व गोरगरिबांना दानधर्म करण्यात घालवावेत.
23यहूदी लोकांनी आरंभ केला होता त्याप्रमाणे व मर्दखयाने त्यांना लिहून पाठवले होते त्याप्रमाणे यहूद्यांनी संप्रदाय चालू करण्याचे कबूल केले;
24सर्व यहूद्यांचा विरोधक अगागी हामान बिन हम्मदाथा ह्याने यहूद्यांचा विध्वंस करण्याचा संकल्प केला असून त्यांचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी त्याने पूर म्हणजे चिठ्ठ्या टाकल्या होत्या;
25पण राजाच्या लक्षात हे प्रकरण येऊन त्याने लेखी हुकूम केला ह्यावरून हामानाने जे कपटकारस्थान यहूदी लोकांविरुद्ध योजले होते ते त्याच्याच माथी उलटले आणि तो व त्याचे पुत्र फाशीच्या खांबांवर टांगण्यात आले.
26ह्यास्तव पूर ह्या शब्दावरून त्या दिवसास पुरीम हे नाव पडले. ह्या पत्रातील मजकुरावरून आणि त्यांनी स्वतः ह्या बाबतीत जे पाहिले होते आणि त्यांच्यावर जे बेतले होते त्यावरूनही,
27यहूदी लोकांनी आपणांसाठी, आपल्या वंशजांसाठी व जे त्यांना सामील झाले होते त्यांच्यासाठी असा अढळ नियम व प्रतिज्ञा केली की, त्या लेखानुसार प्रत्येक वर्षी नेमलेल्या समयानुसार हे दोन दिवस पाळावेत.
28आणि पिढ्यानपिढ्या प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक प्रांतात व प्रत्येक गावात ह्या दिवसांचे स्मरण करून ते पाळण्यात यावेत. ह्या पुरीम सणाचे दिवस पाळण्यास यहूदी लोकांनी चुकू नये; त्यांचे स्मरण आमच्या वंशजांतून कधीही नाहीसे होऊ नये.
29ह्या दुसर्‍या पत्रानुसार पुरीम पाळण्याचे मंजूर व्हावे म्हणून अबीहाइलाची कन्या एस्तेर राणी हिने आणि मर्दखय यहूदी ह्याने आपल्या अधिकाराने फर्मान लिहिले.
30त्याच्या नकला मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या एकशे सत्तावीस प्रांतांतल्या सर्व यहूद्यांना लिहून पाठवल्या; त्यात शांतिप्रद सत्यवचने होती;
31ह्या पत्राचा आशय असा होता की, पुरीमाच्या नेमलेल्या समयी मर्दखय व एस्तेर राणी ह्यांच्या आज्ञेप्रमाणे आणि यहूदी लोकांनी स्वतःसाठी व आपल्या वंशजांसाठी केलेल्या ठरावाप्रमाणे उपवास व विलाप करण्यात यावा.
32पुरीमाच्या संबंधाचा नियम एस्तेरच्या आज्ञेने मुक्रर झाला, आणि हे ग्रंथात लिहून ठेवले.

सध्या निवडलेले:

एस्तेर 9: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन