मोशेने जाऊन सर्व इस्राएलांना ही वचने सांगितली. तो त्यांना म्हणाला, “मी आज एकशेवीस वर्षांचा आहे; ह्यापुढे मला ये-जा होणार नाही; शिवाय ‘तुला ह्या यार्देनेपलीकडे जायचे नाही,’ असे मला परमेश्वराने सांगितले आहे. तुझा देव परमेश्वर हा तुझ्यापुढे पलीकडे जाईल; तो त्या राष्ट्रांचा तुझ्यासमोर संहार करील व तू त्यांचा ताबा घेशील; परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे यहोशवा तुझ्यापुढे चालेल. परमेश्वराने अमोर्यांचे राजे सीहोन व ओग ह्यांचा व त्यांच्या प्रदेशाचा संहार केला तसाच ह्यांचाही करील. परमेश्वर त्यांना तुमच्या हवाली करील तेव्हा त्यांचे मी तुम्हांला दिलेल्या संपूर्ण आज्ञेप्रमाणे करा. खंबीर हो, हिंमत धर, त्यांना भिऊ नकोस, त्यांना घाबरू नकोस, कारण तुझ्याबरोबर चालणारा तुझा देव परमेश्वर हा आहे; तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही.” मग मोशेने यहोशवाला बोलावून सर्व इस्राएलांदेखत त्याला सांगितले : “खंबीर हो, हिंमत धर, कारण जो देश ह्यांना देण्याची शपथ परमेश्वराने ह्यांच्या पूर्वजांशी केली होती त्यात तुला ह्या लोकांबरोबर जायचे आहे आणि तो त्यांना वतन म्हणून मिळवून द्यायचा आहे. तुझ्यापुढे चालणारा परमेश्वरच आहे; तो तुझ्याबरोबर असेल; तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही; भिऊ नकोस व कचरू नकोस.” मग मोशेने हे नियमशास्त्र लिहून परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे लेवीय याजक आणि इस्राएल लोकांचे सगळे वडील ह्यांच्या स्वाधीन केले. तेव्हा मोशेने त्यांना आज्ञा केली की, “दर सात वर्षांच्या अखेरीस म्हणजे कर्जमाफीच्या ठरावीक वर्षी, मांडवांच्या सणाच्या वेळी, जे स्थान तुझा देव परमेश्वर निवडील तेथे, त्याच्यासमोर सर्व इस्राएल लोक हजर होतील तेव्हा, हे नियमशास्त्र सर्व इस्राएलांना ऐकू येईल असे वाचून दाखव. सर्व लोकांना म्हणजे पुरुष, स्त्रिया, बालके आणि तुझ्या नगरातला उपरा ह्यांना जमव, म्हणजे ते ऐकून शिकतील आणि तुमचा देव परमेश्वर ह्याचे भय धरतील, आणि ह्या नियमशास्त्रातली सर्व वचने काळजीपूर्वक पाळतील; त्यांच्या ज्या पुत्रपौत्रांना ही वचने माहीत नाहीत, तेही ऐकतील आणि यार्देन ओलांडून जो देश तुम्ही वतन करून घेणार आहात त्यात जोपर्यंत तुम्ही राहाल तोपर्यंत तुमचा देव परमेश्वर ह्याचे भय धरायला ते शिकतील.”
अनुवाद 31 वाचा
ऐका अनुवाद 31
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: अनुवाद 31:1-13
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ