YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 31:1-13

अनुवाद 31:1-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग मोशेने सर्व इस्राएलांना ही वचने सांगितली. तो म्हणाला, “मी आता एकशेवीस वर्षाचा आहे. माझ्याने आता तुमचे नेतृत्व होत नाही. शिवाय यार्देन नदीपलीकडे जायचे नाही असे, परमेश्वराने मला सांगितले आहे. तुमचा देव परमेश्वर हा तुम्हास साथ देईल. तुमच्यासाठी तो इतर राष्ट्रांना पराभूत करील. त्यांच्याकडून तुम्ही त्या प्रदेशाचा ताबा घ्याल. पण परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे यहोशवा तुमचे नेतृत्व करील. अमोऱ्यांचे राजे सीहोन आणि ओग यांचा परमेश्वराने संहार केला. तसेच तो यावेळी तुमच्यासाठी करील. या राष्ट्रांचा पराभव करण्यात परमेश्वराचे तुम्हास साहाय्य होईल. पण त्यावेळी, मी सांगितले तसे तुम्ही वागले पाहिजे. शौर्य दाखवा. खंबीर पणाने वागा. त्या लोकांची भीती बाळगू नका! कारण प्रत्यक्ष तुमचा देव परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. तो तुम्हास अंतर देणार नाही, तुमची साथ सोडणार नाही” मग मोशेने यहोशवाला बोलावले. सर्वांसमक्ष त्यास सांगितले, “खंबीर राहा आणि शौर्य गाजव. या लोकांच्या पूर्वजांना परमेश्वराने जी भूमी द्यायचे कबूल केले आहे, तेथे तू त्यांना नेणार आहेस. ती काबीज करायला या इस्राएलांना तू मदत कर. परमेश्वर तुमच्या सोबतीला तुमच्यापुढेच चालणार आहे. तो तुम्हास सोडून जाणार नाही, तुम्हास अंतर देणार नाही. तेव्हा भिऊ नको आणि निर्भय राहा.” नंतर मोशेने सर्व नियमशास्त्र लिहून याजकांना दिले. हे याजक लेवी वंशातील होते. परमेश्वराच्या कराराचा कोश वाहण्याचे काम त्यांचे होते. इस्राएलाच्या वडिलधाऱ्या लोकांसही मोशेने हे नियमशास्त्र दिले. मग मोशे वडीलधाऱ्या लोकांशी बोलला. तो म्हणाला, “प्रत्येक सात वर्षांच्या अखेरीला म्हणजेच कर्ज माफीच्या ठराविक वर्षी मंडपाच्या सणाच्या वेळी ही शिकवण तुम्ही सर्वांना वाचून दाखवा. यावेळी सर्व इस्राएलांनी तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांच्यासाठी निवडलेल्या पवित्र निवासस्थानी जमावे. तेव्हा त्यांना ऐकू जाईल अशा पद्धतीने तुम्ही हे नियमशास्त्र वाचून दाखवावे. पुरुष, स्त्रिया, लहान मुले, गावातील परकीय अशा सर्वांना यावेळी एकत्र आणावे. त्यांनी ही शिकवण ऐकावी, परमेश्वर देवाचे भय धरावे या शिकवणीचे जीवनात आचरण करावे. ज्या पुढच्या पिढीला ही शिकवण माहीत नव्हती त्यांना ती माहीत होईल. लवकरच तुम्ही यार्देन ओलांडून जो देश आपलासा करायला चालला आहात तेथे ही मुलेबाळेही तुमचा देव परमेश्वर ह्याज विषयीचे भय धरण्यास तो शिकवील.”

सामायिक करा
अनुवाद 31 वाचा

अनुवाद 31:1-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मोशेने या गोष्टी सर्व इस्राएली लोकांना जाऊन सांगितल्या: “मी आता एकशेवीस वर्षांचा झालो आहे आणि मी येथून पुढे तुमचे नेतृत्व करू शकणार नाही. कारण ‘तू यार्देन नदी ओलांडू नये,’ असे याहवेहने मला सांगितले आहे. परंतु याहवेह तुमचे परमेश्वर स्वतःच तुमच्या आधी यार्देन नदी ओलांडतील. ते या राष्ट्रांचा तुमच्यापुढे नाश करतील आणि तुम्ही त्यांच्या भूमीचा ताबा घ्याल. याहवेहने म्हटल्याप्रमाणे यहोशुआ देखील यार्देन नदी ओलांडून तुमच्यापुढे जाईल. आणि ज्याप्रमाणे याहवेहने अमोर्‍यांचे राजे सीहोन आणि ओगचा नाश केला, त्याचप्रमाणे या देशातील राष्ट्रांचा ते नाश करतील. याहवेह त्यांना तुमच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्याशी ते सर्व करावे ज्याची आज्ञा मी तुम्हाला दिलेली आहे. खंबीर व्हा आणि हिंमत धरा. त्यांना भिऊ नका वा घाबरू नका, कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्याबरोबर जातील; ते तुम्हाला कधीही सोडणार नाही किंवा त्यागणार नाही.” मग मोशेने यहोशुआला बोलाविले आणि सर्व इस्राएली लोकांसमक्ष त्याला सांगितले, “खंबीर हो आणि हिंमत धर, कारण या लोकांच्या पूर्वजांना याहवेहने वचनपूर्वक देऊ केलेल्या देशात तू त्यांच्यासह जावे आणि ती भूमी त्यांचे वतन म्हणून त्यांना विभागून द्यावी. याहवेह स्वतः तुझ्यापुढे चालतील आणि तुझ्याबरोबर राहतील; ते तुला कधीही सोडणार नाही किंवा त्यागणार नाहीत. भिऊ नकोस; निरुत्साही होऊ नकोस.” नंतर मोशेने हे संपूर्ण नियमशास्त्र लिहिले आणि याहवेहच्या कराराचे कोश वाहणाऱ्या लेवीय याजकांना आणि इस्राएली लोकांच्या वडीलजनांना दिले. मग मोशेने त्यांना आज्ञा दिली: “प्रत्येक सातव्या वर्षाच्या शेवटी, कर्ज माफीच्या वर्षी, मंडपांच्या उत्सवात, याहवेह तुमच्या परमेश्वराने निवडलेल्या ठिकाणी जेव्हा सर्व इस्राएली लोक उपस्थित होतील, तेव्हा हे नियमशास्त्र त्यांना ऐकू जाईल असे वाचावे. लोकांना एकत्र करा—पुरुष, स्त्रिया आणि मुले आणि तुमच्या नगरात राहत असलेले परदेशी—म्हणजे ते ऐकतील आणि याहवेह तुमच्या परमेश्वराचे भय बाळगण्यास शिकतील व या नियमशास्त्रामधील सर्व वचने काळजीपूर्वक पाळतील. त्यांची बालके, ज्यांना हे नियमशास्त्र ठाऊक नाही, त्यांनीही यार्देन नदी ओलांडून, त्या वचनदत्त देशात, जी भूमी ताब्यात घेण्यास तुम्ही जात आहात तिथे जोपर्यंत राहाल, तोपर्यंत हे ऐकावे आणि याहवेह तुमच्या परमेश्वराचे भय बाळगण्यास शिकावे.”

सामायिक करा
अनुवाद 31 वाचा

अनुवाद 31:1-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मोशेने जाऊन सर्व इस्राएलांना ही वचने सांगितली. तो त्यांना म्हणाला, “मी आज एकशेवीस वर्षांचा आहे; ह्यापुढे मला ये-जा होणार नाही; शिवाय ‘तुला ह्या यार्देनेपलीकडे जायचे नाही,’ असे मला परमेश्वराने सांगितले आहे. तुझा देव परमेश्वर हा तुझ्यापुढे पलीकडे जाईल; तो त्या राष्ट्रांचा तुझ्यासमोर संहार करील व तू त्यांचा ताबा घेशील; परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे यहोशवा तुझ्यापुढे चालेल. परमेश्वराने अमोर्‍यांचे राजे सीहोन व ओग ह्यांचा व त्यांच्या प्रदेशाचा संहार केला तसाच ह्यांचाही करील. परमेश्वर त्यांना तुमच्या हवाली करील तेव्हा त्यांचे मी तुम्हांला दिलेल्या संपूर्ण आज्ञेप्रमाणे करा. खंबीर हो, हिंमत धर, त्यांना भिऊ नकोस, त्यांना घाबरू नकोस, कारण तुझ्याबरोबर चालणारा तुझा देव परमेश्वर हा आहे; तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही.” मग मोशेने यहोशवाला बोलावून सर्व इस्राएलांदेखत त्याला सांगितले : “खंबीर हो, हिंमत धर, कारण जो देश ह्यांना देण्याची शपथ परमेश्वराने ह्यांच्या पूर्वजांशी केली होती त्यात तुला ह्या लोकांबरोबर जायचे आहे आणि तो त्यांना वतन म्हणून मिळवून द्यायचा आहे. तुझ्यापुढे चालणारा परमेश्वरच आहे; तो तुझ्याबरोबर असेल; तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही; भिऊ नकोस व कचरू नकोस.” मग मोशेने हे नियमशास्त्र लिहून परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे लेवीय याजक आणि इस्राएल लोकांचे सगळे वडील ह्यांच्या स्वाधीन केले. तेव्हा मोशेने त्यांना आज्ञा केली की, “दर सात वर्षांच्या अखेरीस म्हणजे कर्जमाफीच्या ठरावीक वर्षी, मांडवांच्या सणाच्या वेळी, जे स्थान तुझा देव परमेश्वर निवडील तेथे, त्याच्यासमोर सर्व इस्राएल लोक हजर होतील तेव्हा, हे नियमशास्त्र सर्व इस्राएलांना ऐकू येईल असे वाचून दाखव. सर्व लोकांना म्हणजे पुरुष, स्त्रिया, बालके आणि तुझ्या नगरातला उपरा ह्यांना जमव, म्हणजे ते ऐकून शिकतील आणि तुमचा देव परमेश्वर ह्याचे भय धरतील, आणि ह्या नियमशास्त्रातली सर्व वचने काळजीपूर्वक पाळतील; त्यांच्या ज्या पुत्रपौत्रांना ही वचने माहीत नाहीत, तेही ऐकतील आणि यार्देन ओलांडून जो देश तुम्ही वतन करून घेणार आहात त्यात जोपर्यंत तुम्ही राहाल तोपर्यंत तुमचा देव परमेश्वर ह्याचे भय धरायला ते शिकतील.”

सामायिक करा
अनुवाद 31 वाचा