YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 30:1-10

अनुवाद 30:1-10 MARVBSI

मी तुझ्यापुढे मांडलेल्या ह्या सर्व गोष्टी म्हणजे हे आशीर्वाद व शाप जेव्हा तुझ्यावर येतील, आणि तुझा देव परमेश्वर तुला ज्या ज्या राष्ट्रांमध्ये घालवून देईल तेथे तू ह्या गोष्टींचे स्मरण करशील, आणि जेव्हा तू आपल्या मुलाबाळांसह संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे वळशील आणि जे काही आज मी तुला सांगितले आहे त्याप्रमाणे त्याची वाणी ऐकशील, तेव्हा तुझा देव परमेश्वर तुझे दास्य निवारील आणि तुझ्यावर दया करून ज्या ज्या राष्ट्रांमध्ये त्याने तुझी पांगापांग केली असेल तेथून तुला पुन्हा एकत्र आणील. तुझे परागंदा झालेले लोक दिगंतापर्यंत विखरले असले तरी तेथून तुझा देव परमेश्वर तुला एकत्र करून आणील; तुझे पूर्वज ज्या देशाचे वतनदार होते त्यात तुझा देव परमेश्वर तुला आणील आणि तू त्या देशाचा वतनदार होशील; तो तुझ्या पूर्वजांपेक्षा तुझे अधिक कल्याण करील आणि तुला अधिक बहुगुणित करील. तुझा देव परमेश्वर तुझ्या हृदयाची व तुझ्या वंशजांच्या हृदयाची सुंता करील, आणि आपण जिवंत राहावे म्हणून तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने प्रेम करशील. पण हे सर्व शाप तुझा देव परमेश्वर तुझा छळ करणार्‍या शत्रूंवर व द्वेष्ट्यांवर आणील. तू तर पुन्हा परमेश्वराची वाणी ऐकशील आणि ज्या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या सर्व पाळशील. तुझा देव परमेश्वर तुझ्या कल्याणासाठी तुझ्या हातचे सर्व काम, तुझ्या पोटचे फळ, तुझ्या गुराढोरांचे वत्स व तुझ्या भूमीचा उपज ह्यांबाबतीत तुझी समृद्धी करील; परमेश्वर जसा तुझ्या पूर्वजांवर प्रसन्न होता तसा तुझ्या कल्याणासाठी तुझ्यावरही पुन्हा प्रसन्न होईल; तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकून ह्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिलेल्या त्याच्या आज्ञा व विधी पाळले आणि आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे आपल्या संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने वळलास तर असे होईल.